मंगळवार, २७ फेब्रुवारी, २०१८

एक तरी ओवी अनुभवावी...!
आज २७ फेब्रुवारी २०१८, मराठीतील ऋषितुल्य कवि विष्णू वामन शिरवाडकर अर्थात कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जन्मदिवस! या निमित्ताने हा दिवस 'मराठी भाषा दिवस' म्हणून पाळण्याची प्रथा सुरू झाली. मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी मराठी भाषाप्रेमींची मागणी आहे. अभिजातता म्हणजे काय याची चर्चा आपण येथे वाचली असेल तर अभिजातातेची व्याख्या व्यक्तीसापेक्ष आहे हे आधी मान्य करायला हवे. त्यापुढे जाऊन भाषेला अभिजात दर्जा मिळणे (वा मिळविणे) म्हणजे नेमके काय आणि तो असा मागून मिळत असतो काय याचा सविस्तर उहापोह करता येईल.

राजा शुद्धोदन आणि राणी महामायेचा राजपुत्र गौतमाने त्याला ‘बुद्ध’ म्हणावे म्हणून विपश्यना केली नव्हती, ज्ञानदेवांनी त्यांना ‘माऊली’ म्हणावे म्हणून पसायदान मागितले नव्हते, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला ‘जाणता राजा’ म्हणावे म्हणून आज्ञापत्रे लिहिली नव्हती, रवींद्रनाथांना ‘गुरुदेव’ ही पदवी मागावी लागली नव्हती तसेच टिळक ‘लोकमान्य’ आणि गांधीजी ‘महात्मा’ सरकार दरबारी अर्ज करून झाले नव्हते. ज्या गोष्टी सर्वसामान्य माणसे मनोभावे स्वीकारतात आणि अनुकूल लोकाश्रय मिळवून जनमानसात रुजतात त्यासाठी मागण्या, याचना, विनंत्या किंवा अर्ज करावे लागत नाहीत; त्या कळीचे उमलून फुल व्हावे एवढ्या सहजभावाने परिणामास जातात.

अभिजातता संबंधी प्रकटनाच्या समारोपात आम्ही, सन्मित्र डॉक्टर चिंगरे यांचे निरीक्षण, ‘कुठल्याही निर्मिती प्रक्रियेतील प्रामाणिक प्रयत्नांचे सातत्य म्हणजे अभिजातता!’, आणि आम्हाला या विषयाचे प्रतीकात्मक रूपक म्हणून दृष्टांत देणाऱ्या 'वडाच्या पारंब्यां'चा उल्लेख वाचकांस स्मरत असेल. या दोन्हीचा संदर्भ ‘एखाद्या गोष्टीचे जाणीवपूर्वक सातत्य आणि प्रगल्भ समृद्धी तिच्या शाश्वततेकडे प्रवासास अनुकूल ठरते’ हे प्रमेय सुनिश्चित करण्यात सहाय्यभूत ठरावे.

तेव्हा, ‘अभिजात दर्जा’ची ओरड करण्यापेक्षा काही मुलभूत गोष्टी समजून उमजून केल्या तर ‘अमृतातेही पैजा जिंकणारी’ माऊलीची ‘कवतिकाची बोली’ अभिजात झाल्याशिवाय राहील काय? काय आहेत या मुलभूत गोष्टी -

१. मुलांना इंग्रजी शाळेत घालण्याचा अट्टाहास त्यांची अवस्था ‘घरका ना घाटका’ अशी करतो हे आता त्या मुलांनाही पूर्णत: कळून चुकले आहे. गुगल सिमेंटिक्सच्या युगात विश्व-भाषेचा बडेजाव जसा उरला नाही तसेच, भारतातील दक्षिण राज्ये आणि रशिया, जपान, जर्मनी अशा बलाढ्य राष्ट्रांचे आपापल्या मातृभाषेवरील निष्ठेने काहीही नुकसान झाले नाही, उलट उत्कर्षच झाला हा इतिहास आहे. तेव्हा मातृभाषेतून शिक्षण हे प्रगतीस मारक नसते उलटपक्षी पूरकच असते हा मानसशास्त्रीय सिद्धांत व त्याची सभोवताली नित्य दिसणारी प्रमाणे मन:पूर्वक स्वीकारली पाहिजेत.

२. मराठी शाळा बंद करण्याऐवजी आधी पालकांना त्यांच्याबद्दल आपुलकी, विश्वास आणि बांधिलकी वाटेल आणि विद्यार्थ्यांना प्रेम, अभिमान आणि कृतार्थता वाटेल असे त्यांचे स्वरूप बदलायला हवे. भाषा हे केवळ माध्यम आहे आणि मूळ उद्दिष्ट ज्ञान मिळविणे हे आहे या विचाराची मशागत केली तर शाळांचे वर्गीकरण हे भाषावार न होता प्रतवार होईल आणि चांगल्या मराठी शाळांकडे अभिजनांचा ओघ सुरु होण्यास मदत होईल. शाळांचे अर्थकारण आणि दर्जा हे आधुनिक युगात आणि नवीन शिक्षणपद्धतीत परस्परावलंबी असल्याने, दर्जावर काम केल्यास अर्थकारण यथावकाश सुरळीत होईल हा विश्वास बाळगूनच काम करावे लागेल.

३. हे झाले धोरणात्मक आणि संस्थात्मक निर्णय आणि त्यांच्या अंमलबजावणीचे, पण नागरिक म्हणून आपली काही जबबदारी आहे की नाही? त्यातील पहिली आणि महत्वाची म्हणजे आपण आपले सर्व व्यवहार मराठीतून करणे आणि त्याची लाज नव्हे तर अभिमान बाळगणे. ज्ञानराज माऊली आणि युगप्रवर्तक जाणता राजा शिवाजी यांच्या भाषेची त्यांच्या वारसांनाच लाज वाटत असेल तर अभिजात दर्जा सोडा, ती भाषा तरी टिकेल काय? बरे, भाषेचे हे उपयोजनही कसे असावे? समर्थ म्हणतात तसे,


शुद्ध नेटके ल्याहावे शुद्ध शोधावे I
शोधून शुद्ध वाचावे चुको नये II


४. दुसरी जबाबदारी म्हणजे जास्तीत जास्त मराठी पुस्तके, शक्यतो विकत घेवून, वाचणे जेणेकरून मराठीत अधिकाधिक दर्जेदार साहित्य निर्मितीस पोषक वातावरण निर्मिती होईल आणि मराठी सारस्वतास अशी काही रत्ने मिळतील कि त्यांचा अनुवाद इतर भाषात होईल. आज अशी किती मराठी पुस्तके आपण सांगू शकतो ज्यांचा अनुवाद इतर भाषांत झालाय?

५. तिसरी आणि महत्वाची कटिबद्धता म्हणजे आपण जे लेखन करतो, अगदी भ्रमणध्वनीवरील संदेशाच्या रुपात का होईना, ते देवनागरीत आणि व्याकरण, विरामचिन्हे आणि केवळ मराठीस लाभलेले चिन्हे यांचा सुयोग्य वापर करून लिहू अशी मनाशी खुणगाठ बांधणे - प्रतिज्ञा, शपथ किंवा आश्वासन नको. विवेकी माणूस आपल्या मनाशी शक्यतो प्रामाणिक राहण्याचा प्रयत्न करतो आणि जेवढे व्यासपीठ मोठे तेवढे मोठे आश्वासन देतो आणि जेवढे आश्वासन मोठे तेवढी मोठी त्याची योजना होते, जी फसण्यासाठीच असते! तेंव्हा तसले काही न करता केवळ मनोमन दृढनिश्चय करू या...

दिसामाजी काहीतरी ते लिहावे। प्रसंगी अखंडित वाचीत जावे II

आज मराठी भाषा दिवसाचे औचित्य साधून दोन कविता वाचू या, कविवर्य कुसुमाग्रजांच्या जन्मदिनानिमित्त त्यांची ‘नट’, आणि विंदांच्या जन्मशताब्दीनिमित्त त्यांची, मराठी भाषा आणि शब्दांचे वैभव आणि सामर्थ्य दर्शविणारी १. 

नट – कुसुमाग्रज

नांदीनंतर
पडदा उघडला
तेव्हा मी तुडुंब भरलेला होतो
हजारो रंगीबेरंगी शब्दांनी,
शरीरभर रोरावणा-या
असंख्य आविर्भावांनी
भीतींनी, आशांनी, अपेक्षांनी;
आता
भरतवाक्य संपल्यावर
प्रयाणाची तयारी करीत
मी उभा आहे
रंगमंचावर, एकटा,
समोरच्या प्रेक्षालयाप्रमाणेच
संपूर्ण रिकामा.

मी उच्चारलेले
काही शब्द, अजूनही
प्रेक्षालयातील धूसर
मंदप्रकाशित हवेवर
पिंजारलेल्या कापसासारखे
तरंगत आहेत,
माझे काही आविर्भाव
रिकाम्या खुर्च्यांच्या हातांना,
बिलगून बसले आहेत,
मी निर्माण केलेले
हर्षविमर्षाचे क्षण
पावसाने फांद्दांवर ठेवलेल्या
थेंबांसारखे
भिंतींच्या कोप-यावर
थरथरत आहेत
अजूनही.
हा एक दिलासा
माझ्या रितेपणाला,
नाटक संपल्याची खंत-
ती आहेच.
नाटक नव्हे, तीन तासांचे
एक अर्करूप अस्तित्व
संपले आहे.
पण संपले आहे ते फक्त
इथे - माझ्याजवळ.
माझ्या त्या अस्तित्वाच्या
कणिका घेउन
हजार प्रेक्षक घरी गेले आहेत;
मी एक होतो
तो अंशाअंशाने
हजारांच्या जीवनात
- कदाचित स्मरणातही -
वाटला गेलो आहे.


१ – विंदा करंदीकर

अस्तित्वकोनाचा
विकास होऊन
एक दिवस
येतील, येतील
अस्तित्वाच्या
दोन्ही भुजा
एका रेषेत;
जाणीव, जगत
होतील एक;
राहील उभा
काळाचा द्विभाजक
आणि बनेल
विश्व निर्ब्रह्म
सरळ कोनाच्या
साक्षात्कारांत! 

अस्तित्वकोनाचा
विकास साधताना
गरोदर भाषेला
लागतात डोहाळे
सगुण शब्दांचे. 

पाहिजेत शब्द
करडे, काळे
रसाळ, रटाळ
रेखीव, रांगडे
चपळ, लंगडे
प्रगाढ, प्रशांत
पाहिजेत शब्द
जहाल, ज्वलंत 

पाहिजेत शब्द
ओंगळ, ओवळे
सात्विक, सोवळे
चेंगट, हट्टी
तर्कटी, मर्कटी
सुखरूप, स्वादिष्ट
पाहिजेत शब्द
गरोदर, गर्विष्ठ 

पाहिजेत शब्द
बकुळीच्या कुशीतले
दर्याच्या मिशीतले
पाहिजेत शब्दः
पहाटेच्या ओटीतले
थडग्याच्या मिठीतले 

पाहिजेत शब्द
मुसमुसणारे
धुसफुसणारे
कुजबुजणारे
पाहिजेत शब्द:
कडकडणारे! 

पाहिजेत शब्दः
विश्वाला आळवणारे
अणूला उचलणारे
रक्तांत मिसळणारे
गरोदर भाषेला
लागतात डोहाळे
सगुण शब्दांचे 

कारण शब्दांनिच
अमूर्त आशयाचे
मूर्त ध्वनीशी
लागते मंगल
आणि वाढतात
विचार - विकार
वर्गाच्या क्रमाने;
होतात जाणिवा
जागृत, समृद्ध!