रविवार, २९ जुलै, २०१८

हसऱ्या रेषा...!

गूढ-गंभीर विसंगती दर्शविणारा आशय असो कि चि. वी. जोशी, पु. ल. देशपांडे यांचा निर्मळ विनोद असो, त्याला आपल्या बोलक्या, हसऱ्या चित्रांनी एक निराळाच आयाम प्राप्त करून दिला तो शि. द. फडणीस या महाराष्ट्राच्या जागतिक कीर्ती मिळविणाऱ्या व्यंगचित्रकाराने! व्यंगचित्र हे टीकात्मक, कुणाला तरी दूषण देणारे अथवा कुठल्यातरी शारीरिक व्यंगावर व्यक्तिश: आक्रमण करणारे असते हा समज खोटा ठरवला तो शिदंच्या अत्यंत लोभस, निरागस, निर्विष अशा, सामान्य माणसांच्या आयुष्यातील सामान्य घटनांच्या एका मार्मिक पद्धतीने केलेल्या निरीक्षणाने!
मग कधी ते गाण्याचा रियाज करणारी आपली आई का रडतेय हे न उमजून तिला शांत करण्यासाठी आपली खेळणी देवू करणारे निरागस बालक असेल, कधी मालकीण झोपलीय त्यामुळे आपली उपासमार नको म्हणून स्वत:च दुधाचे भांडे दुधवाल्यापुढे धरणारी मनीमाऊ असेल, पाय लांब करण्यात निपुण असलेला एक भक्त देवदर्शनाचे वेळी आपल्या चपला एका पायाने सांभाळीत असेल तर दुसरा पोलीस शिपाई दोन्ही हात पिशव्यांमध्ये गुंतलेले असल्याने साहेब समोर दिसताच एका पायानेच सलाम ठोकत औचित्यभंग होणार नाही याची दक्षता घेत असलेला दिसेल. किंवा ‘बकरी पाला खाते’ या अत्यंत आदिम, साध्या सोप्या सामान्यज्ञानातून साधलेला तरीही, तत्वचिंतक जे हजार शब्दातून सांगू शकणार नाही असे एक विसंगतीपूर्ण जागतिक सत्य, केवळ एका छोट्याशा, कुठेही घडू शकणाऱ्या, वरवर विनोदी वाटणाऱ्या पण मूलत: तात्विक असणाऱ्या प्रसंगातून दृग्गोचर होते. 
आज शि. द. सरांचा ९३वा वाढदिवस म्हणजे सरांच्या शतकाला अवघ्या ७ धावा हव्या आहेत. अर्थात सरांची ही अवखळ अर्कचित्रे शतकोत्तरही पहायला मिळावी ही अपेक्षा आहेच. कारण एक वर्ष उलटतांना ज्यांची खरोखर वाढ होते आणि समाजाला आनंदी, समाधानी, सर्वसमावेशक आणि वर्धिष्णू राहण्यासाठी ज्यांच्या विवेकी अभिव्यक्तींची निरंतर गरज आहे अशा संस्कृती समृद्ध करणाऱ्या प्रतीभावंतांनाच...
‘जीवेम शरदः शतम्
बुध्येम शरदः शतम् ।। 

अर्थात 'आपल्याला शंभर वर्षे (तरी) निरामय आयुष्य लाभो आणि शंभर वर्षे बुद्धी शाबित राहो आणि ज्ञानार्जन सुरु राहो’ ही प्रार्थना शोभते आणि लाभते देखील; त्यासाठी कुठल्याही अनुयायाची, चेल्याची अथवा ‘शुभचिंतका’ने फ्लेक्स लावायची गरज नाही...!

सर, आम्हाला अजून खूप समज यायची आहे, खूप शिकायचे आहे आणि माणूस म्हणून उत्क्रांत होतांना सम्यक संवेदनशीलता वाढवणे फार गरजेचे आहे. तेव्हा आपल्या बोलक्या आणि हसऱ्या रेषा आम्हांला अजून खूप काळ लागणार आहेत... त्या आपण समाजमनावर उमटवत रहाव्या ही प्रार्थना आणि सदिच्छा...!

शुक्रवार, २७ जुलै, २०१८

लाखो इथले गुरू...

आज आषाढ पौर्णिमा. महर्षी व्यास - ज्यांना हिंदू धर्माचे आद्य गुरु मानले जाते आणि ज्यांनी ४ वेद, १८ पुराणे, महाभारत आणि भगवद्गीता रचली अशी मान्यता आहे अशा व्यासमहर्षींची पौर्णिमा - अर्थात गुरु पौर्णिमा!

अखण्डमण्डलाकारं व्याप्तं येन चराचरम् ।

तत्पदं दर्शितं येन तस्मै श्रीगुरवे नमः ॥

श्री गुरु दत्ताने २४ गुरु केले हे आपण वाचले. मनुष्यही कशाकशापासून कायकाय शिकू शकतो हेही आपण बघितले. कला क्षेत्रातील विविध अविष्कार जसे कविता, गायन, नृत्य, अभिनय यांतील गुरु हे एका अर्थाने विश्वगुरुच असतात कारण हे अविष्कार जेवढे अभिजात तेवढेच सर्वंकष, सर्वव्यापी असतात. शब्दांमागील भाव आणि सुरांमधील मार्दव हे रंग-रूप, राहणीमान, भाषा, प्रांत, संस्कृती या सगळ्याच्या पलीकडे जाऊन केवळ मानवी भावविश्वाशी तादात्म्य पावणारे असते. म्हणूनच या द्वारे मानवी संस्कृतीस समृद्ध करणारे योगदान हे विश्वरूप ठरते.

मराठी ही मुळातच अत्यंत समृद्ध आणि अमृताशी पैजा जिंकणारी सुमधुर भाषा! साक्षात ज्ञानदेव माऊलींपासून आजच्या अत्यंत संवेदनशील आणि प्रतिभावंत नवकविंपर्यंत सर्व रचनाकारांनी मराठीच्या मुळच्या वैभवात भरच घातली. यापैकी एक गुरुतुल्य लेखक, कवि, गीतकार म्हणजे ग. दि. माडगुळकर. त्यांची रचना 'बिन भिंतींची उघडी शाळा' ही मुलांना हसत खेळत काही शिकविण्याबरोबरच शाळा कशी असावी आणि ज्ञानोपासक 'विद्यार्थी' कसे व्हावे याचा उत्तम धडा देते. गदिमांनी हे गीत रचले आणि त्याला स्वरसाज चढविला दुसऱ्या गुरुतुल्य गायक-संगीतकार बाबुजींनी!

'बाबूजी' अर्थात सुधीर फडके या स्वर्गीय प्रतिभेचे लेणे लाभलेल्या आणि एकापेक्षा एक सुमधुर आणि अविस्मरणीय गाणी मराठी भावजगतास देणाऱ्या स्वरांच्या बादशहाचे जन्मशताब्दीवर्ष दोनच दिवसांपूर्वी सुरु झाले. त्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमांना ठिकठकाणी होणारी तुडुंब गर्दी ही जेवढी मराठी रसिकत्वाची साक्ष देते तेवढीच 'बाबूजी' या नावाचे गारुड इतक्या वर्षात तसूभरही कमी झालेले नाही, उलट वाढतेच आहे, हेही सिद्ध करते.

या दोन ऋषितुल्य शब्द-स्वर-गुरूंच्या स्पर्शाने समृद्ध झालेले हे निसर्गाचे ज्ञानगीत, गुरूपौर्णिमेनिमित्त...!


बिन भिंतीची शाळा... 

बिन भिंतीची उघडी शाळा
लाखो इथले गुरू
झाडे, वेली, पशु, पाखरे
यांशी गोष्टी करू...

बघू बंगला या मुंग्यांचा,
सूर ऐकुया या भुंग्यांचा
फुलाफुलांचे रंग दाखवील
फिरते फुलपाखरू
बिन भिंतीची उघडी शाळा
लाखो इथले गुरू...

सुगरण बांधी उलटा वाडा,
पाण्यावरती चाले घोडा
मासोळीसम बिन पायांचे
बेडकिचे लेकरू
बिन भिंतीची उघडी शाळा
लाखो इथले गुरू...

कसा जोंधळा रानी रुजतो,
उंदीरमामा कोठे निजतो
खबदाडातील खजिना त्याचा
फस्त खाऊनी करू
बिन भिंतीची उघडी शाळा
लाखो इथले गुरू...

भल्या सकाळी उन्हात न्हाऊ,
कड्या दुपारी पऱ्ह्यात पोहू
मिळेल तेथून घेउन विद्या
अखंड साठा करु
बिन भिंतीची उघडी शाळा
लाखो इथले गुरू...!

गुरुवार, २६ जुलै, २०१८

सजा...!

"किसी दुसरें शायरका कलाम सुनाईये.
एक शायरको इससे जादा खूबसूरत सजा क्या हो सकती हैं...!"
सलाम...!

सोमवार, २३ जुलै, २०१८

आमचाही 'कणा'...!


काल धुळ्याला आपल्या लाडक्या दाबके सरांचा सन्मान सोहळा अतिशय उत्साहात, आनंदात आणि कृतार्थ भावाने संपन्न झाला. बालवाडीपासून पदव्युत्तर शिक्षणापर्यंत 'शत प्रतिशत हजेरी'मध्ये गुण मिळविणारा मी या समारंभास हजर राहू शकलो नाही याची खंत आहे आणि विषादही! दाबके सरांचे विद्यार्थी अक्षरश: जगभर विखुरलेले असल्याने आणखीनही बऱ्याच जणांना काल हजेरी लावता आली नसेल. अशा सगळ्या, 'नाईलाजाने अनुपस्थित' विद्यार्थ्यांच्या अव्यक्त भावना अनुल्लेखित राहू नये म्हणून हे मनोगत...


"सर, आम्हाला या कौतुक सोहळ्याचे प्रत्यक्ष दर्शन घ्यायला यायला जमले नसले तरी वारकऱ्याच्या हृदयात पांडुरंग जसा नित्य वास करतो तसे तुम्ही आमच्या ध्यानीमनी सदोदित असता. आमची शाळा आणि आपल्यासारख्या गुरुमाऊलींनी दिलेले बाळकडू यामुळेच आम्ही आजच्या गळेकापू स्पर्धेच्या विधिनिषेधशून्य जगात मूल्ये टिकवून आहोत. जगात आम्ही कुठेही असलो तरी आषाढीच्या मुहूर्तावर आम्हाला आमच्या पंढरीचे – धुळ्याचे – वेध लागलेले असतात. या वर्षी मुख्यमंत्र्यांप्रमाणे आम्हालाही पंढरीची वारी घडू शकली नसली तरी आम्ही देखील आमच्या देवघरात आमचा विठ्ठल पुजला आणि आहोत तेथून त्याला साष्टांग दंडवत घातला... तो पोचला म्हणून आशीर्वाद द्यावा आणि आम्ही कायमच आपले शिष्य होतो, आहोत व राहू म्हणून मार्गदर्शन करावे. आपल्याकडून आमच्यासारखे अजून अनेक विद्यार्थी (परीक्षार्थी नव्हे!) घडायचे आहेत म्हणून आपल्या निरामय शतकोत्तर आयुष्यासाठी पांडुरंग चरणी मन:पूर्वक प्रार्थना!


गुरु-शिष्याच्या अजोड, अनन्य आणि अलौकिक भावबंधावर कुसुमाग्रजांनी ‘कणा’ हा अजरामर काव्याविष्कार करून ठेवला आहे. आजच्या या हृदयस्पर्शी प्रसंगी कविश्रेष्ठांची क्षमा मागून आमचाही ‘कणा’...

विसरला नाहीत न सर आम्हाला येवू न शकलो आम्ही
कशामुळे ते आम्ही सांगू नये, विचारणार नाहीच तुम्ही

क्षणभरच का होईना झाली असती हृद्य भेट पुन्हा
अपराध असेल आमचा हा पण केला नाही गुन्हा

दिवसभर मन होते सैरभैर डोके नव्हते ताळ्यावर
लक्ष वारकऱ्याचे सारे विठूमाउलीच्या हिंदोळ्यावर

खंत वाटली, विषाद दाटला, चित्त भिरभिरे झाले
पापणी भिजली अलगद अन टोचले व्यथेचे भाले 

विहिरीतून जगरहाटीच्या मडके आपले भरतो आहे
जगणे समजून घेतांना जिंकण्यात रोजच हरतो आहे

माऊसकडे हात जाताच हसत हसत उठला
‘लाईक’ नको सर, जरासा एकटेपणा वाटला

मिळवले बाहेर सगळे तरी आत रितेपणा साठला
'शेअर’ करावे वाटले म्हणून तळ मनाचा गाठला

फार काही नकोय सर, टिकवलाय ताठ कणा...
कान पिळून मार्दवाने 'आत्मसन्मान जप' म्हणा!


पोस्टमधील सर्व छायाचित्रे व सरांच्या मनोगताची ध्वनिचित्रफित सन्मित्र दिनेश चंद्रात्रे यांच्या सौजन्याने... आभार!

गुरुवार, १९ जुलै, २०१८

'भलत्या' उंचीचे खडाष्टक!


छायाचित्रे - मिलिंद क्षीरसागर, संस्थापक, शिवाजी ट्रेल, पुणे

उंची न गाठू आम्ही बसूनी
इतिहासाच्या खांद्यावरही
मिरवू खुजेपणाच आमचा
         वटवृक्षाच्या फांद्यांवरही  II १ II

आम्ही सेवक, दास आम्ही
श्रेयाच्या सुंदोपसुंदित मग्न
संस्कृती आमची शान असे
          भले उरली छिन्न विच्छिन्न  II २ II

आबाळ बळीराजाची होता
पीके नासली दूध ते सांडले
धनिकांची वाढे संपत्ती अन
         खड्ड्यांनी बहुतांस कांडले II ३ II

कोण राजे नी कोण महात्मा
आम्हां त्यांची कशास पत्रास
जातीपातीचे आम्ही सत्तार्थी
         घेतो संख्याबळाचा अदमास II ४ II

जाणता आमचा राजा तो अन
गुरु आमचा असे तथागत बुद्ध
स्थाने मैदाने रस्ते नावाजू भले
          पुकारित आम्ही आपसात युद्ध  II ५ II

आज्ञापत्रे आम्हांस न उमजती
विसरलो मूर्ख लक्षणे कधीची
दुर्योधनाचे वारस आम्ही अन
         ऋषीचे कूळ आमच्या दधीचि II ६ II

मुलुखमैदान म्हणुनी मिरवल्या
तोफांचा आज उपयोग अक्षम्य
आभाळाएवढे दुर्गवैभव पोरके
         वाद ‘भलत्याच’ उंचीचे अगम्य II ७ II

असामान्य राजा रयतेचा
'दुर्गवैभव' त्याची परंपरा
जपू या ‘आज्ञे’ने त्याच्या
         पुतळ्याची उंची विसरा II ८ II

शनिवार, १४ जुलै, २०१८

आषाढ...?

'आषाढस्य प्रथम दिवसे...' या कालिदासाने मेघदूतात अजरामर करून ठेवलेल्या काव्यपंक्तींच्या भांडवलावर, 'वर्षा'च्या या काळात, कावळ्याच्या छत्र्यांबरोबर अनेक कवी (आणि कवयित्रीही) उगवत असतात आणि कालिदासाला न्यूनगंड देण्याचा पुरेपूर प्रयत्न करीत असतात. ही प्रथा अतिशय प्राचीन असून (कदाचित कालिदासाच्याही पूर्वीपासून) काही अभिनव प्रयोग या निमित्ते साहित्य शारदेस समृद्ध करीत आले आहेत. व्हॉट्सऍप विद्यापीठातून नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार असाच एक प्रयोग इ.स. १९७८ साली झाला होता आणि आपल्या 'जिप्सी' मित्राच्या या 'लज्जत'दार कारागिरीचे, कुठेही डाग पडू न देता, 'ईज्जत'दारपणे भाजके समीक्षण करण्यात शब्दप्रभूंनी खुसखुशीत खमंगपणा आणला होता. प्रस्तुत लेखकास सदर मजकूर कुठेही शंकास्पद, बनावट अथवा खोडसाळ न वाटता, अत्यंत मार्मिक, अभिरुचीपूर्ण तथा उद्बोधक वाटल्याने, 'जसे प्राप्त झाले तसे' येणेप्रमाणे प्रकाशीत करीत आहो, मजकूरातील तपशिलांची सत्यता जिज्ञासूंनीं तपासून बघावी, रसिकांनी मूळ काव्यप्रतिभा आणि विडंबनातील 'लालित्य' याची 'मौज' अनुभवावी आणि पुन्हा एकदा 'तुझिया जातीचा मिळो आम्हां कुणी...' म्हणून विश्वेश्वरास साकडे घालावे! चित्राखालील मजकुराचे श्रेय आणखीन जबाबदारी मूळ संशोधकाची आणि संपादकाची जो या क्षणी तरी आम्हांस अज्ञात आहे, कुणाला ठाव-ठिकाणा माहित असल्यास कळवावे, सदर रत्नपारखी राजहंसाबरोबर आपलेही जाहीर आभार मानण्यात येतील. इति विज्ञापना I
  

कवी मंगेश पाडगांवकर बरीच वर्षं 'लिज्जत पापड' कंपनीच्या जाहिरातींसाठी कविता लिहीत असत (कवितांचा पापडांशी किंवा त्या कंपनीशी काही संबंध नसे, मात्र कवितेच्या निमित्तानी लोक जाहिरातही वाचतील, या अपेक्षेनी कंपनीनी हे धोरण राबवलं होतं). तर, १९७८ सालच्या 'ललित' नियतकालिकाच्या जून महिन्याच्या अंकात "आनंदाचा घनू" ही त्यांची कविता छापून आली :

आनंदाचा घनू...
बरसला अंगावरी आज आनंदाचा घनू...

आज मन गगनात
आणि गगन मनात
माझे प्राण इंद्रधनू...

रंग श्रवणासि आले
सूर सुवासिक झाले
झाली बासरीच तनू...

नभ झाले मनभोर
मनभर निळे मोर
आणि आतुरल्या धेनू...

कोसळला प्राणभर
सावळा हा अनावर जैसा देवकीनंदनू...

याचं पु.ल.देशपांडेंनी विडंबन केलं, ते 'ललित'च्याच जुलैच्या अंकात, मूळ कवितेसह (मूळ कविता पान २८वर, अन् विडंबन पान २९वर) छापलं...


"पाऊसू पापडू आणि एकू गीतू"

{कविवर्य श्री मंगेश पाडगावकर यांना त्याच्या 'लिज्जत' पुरस्कृत "आनंदाचा घनू" या वर्षा(सन) गीताला 'सलाम' करून}
भूमिका : चुलीवर भाजत टाकलेला पापड आणि वहीवर जुळवत टाकलेली कविता ह्या, महिला गृहउद्योग व काव्योपासना अशा द्वंद्वात सापडलेल्या स्त्रीच्या पापडाची आणि कवितेची अवस्था काय झाली, ते टिपण्याचा एक नम्र प्रयत्न.


येता आषाढू आषाढू लागे पावसाची झडू
आले माझिया मनात आपणही गीत पाडू !

साला बादचा शिरस्ता पाळतात कविजनू
येता पाऊस पिंजती छान कवितेचा धनू !

शब्द कापूस कापूस कसे काढती पिंजूनू...
- घनू, इंद्रधनू, प्राणू, मोरू, देवकीनंदनू,

मनू, गगनू, श्रवणू आणि बासरीची तनू
शब्द टप्पोरे टप्पोरे बोंडे कापसाची जणू !

पडो अथवा न पडो दारी पाण्याचा टिप्पूसू,
स्वस्थ बसवेल कसे येता आषाढाचा मासू?

घनू गरजो, बरसो, भरो विहिरी गटारू
दिसो घनघोर घटा, गळो छप्परू टप्परू !

हाती धरिताचि पेनू गळे शाईतुनी गीतू...
- गीतातल्या पावसाशी माझी जडलीसे प्रीतू !

झरे कवितेची ओळू, होते गीताचीच शाई !
- सॉरी, शाईचेच गीत - किंवा कशाचे काहीही !

हंबरत्या धेनूबिनू, पंख पिसारून मोरू
मेघूबिघू यथासांग, रांग धरूनिया तरू...

- आणि अचानक कैसा धूर कोंदला खोलीतू !
राही अधुरे अयाई माझे पावसाचे गीतू...

आली जाग एकाएकी नाकी शिरताचि घाणू -
करपली चुलीवरी तिथे पापडाची तनू !

कसा वाटोळा वाटोळा स्वर्णवर्णाचा लिज्जतू...
झाला कोळपून काळा, गेली इज्जतू इज्जतू !

- झड पावसाची आली, इथे गीतही भिज्जतू,
आता कुणासंगे घालू उगा हुज्जतू हुज्जतू ?

कवयित्री - सौ.तरंगिणी ठिपके

प्रिय संपादक महाराज,

अलीकडेच क-हाड - पुणे एष्टीत आम्हाला ही कविता लिहिलेला कागद सापडला. कवयित्रींच्या क-हाड कवयित्री संमेलनात पावसामुळे भिजलेल्या -आणि काव्यगायनाचा चान्स न मिळाल्यामुळे भाजलेल्याही- भावना ध्यानात घेऊन ही कविता आपल्या लोकप्रिय मासिकात छापावी अशी विनंती आहे. 

...आणखीही अश्या ब-याच कवितांचे कागद त्याच एष्टीत सापडले आहेत; पाठवू का ?

आपला नम्र
पु. ल. देशपांडे


'प्रत्यक्षाहून विडंबन किचकट' अशी 'जाणीव जागृती' करणाऱ्या दोन्ही महारथींना साष्टांग दंडवत आणि त्यांच्या जगावेगळ्या 'मैत्रा'स सलाम!

मंगळवार, १० जुलै, २०१८

मूलमंत्र

लिंक्डइन, फेसबुक आणि ट्विटर यांची आकडेवारी गृहीत धरली तर मला ‘परिचित’ मानणारे आज जगात साधारण तीनेक हजार तरी लोक असावेत. जे मला प्रत्यक्षात ओळखतात त्यांची संख्या हजारभर मानली तर, समोर आलेच तर ओळखतील किंवा ओळख देतील (दुर्दम्य आशावाद!) असे पाचेकशे मानायला हरकत नाही. जे मला मित्र समजतात आणि कधीमधी दर्शनही देतात असे शंभरेक तरी भरावेत. तथापि ज्यांना मी मित्र समजतो आणि माझ्या असे समजण्याला ज्यांचे अनुमोदन तर आहेच पण ज्यांच्याशी वन्स-इन-अ-ब्ल्यू-मून, फेस-टू-फेस, विदाऊट-फेसबुक तोंडाला फेस येईतो चर्चाही घडते असे निदान २५ असायला हवेत. म्हणजे महिन्यातील ५ संध्याकाळी कुटुंबासाठी राखून ठेवल्या तरी, ‘रोज एक’ या हिशोबाने प्रत्येक मित्राला माझ्यासाठी महिन्यातून एकदाच, वर्षातून फक्त बारा संध्याकाळी वेळ काढावा लागेल! अर्थात यातील किती लोक मला मी आहे तसा माझ्या सर्व गुण(?)अवगुणांसह स्वीकारतात (आणि अर्थातच व्हाईसे व्हर्सा) व माझा किती लोकांशी संवाद आहे असा प्रश्न विचारला तर, मला तरी, निरुत्तर व्हायला होईल. ही सगळी सांख्यिकी आज कुठल्या निमित्ते मोजली आणि मांडली जातेय, तर प्रश्न संवादाचा (किंवा त्याच्या अभावाचा) आहे म्हणून!

संवाद दोन प्रकाराने होऊ शकतो – व्यक्त होऊन आणि अव्यक्त राहूनही. व्यक्त होण्याची माध्यमे म्हणजे बोलून आणि लिहून, तर अव्यक्त संवाद हा केवळ सहवास आणि सहभावनेने (सहानुभूतीने नव्हे!) शक्य होतो. बोलण्यामध्ये प्रत्यक्ष भेटून समोरासमोर फेस-टू-फेस बोलणे हाही एक पर्याय असतो! (पंधरा-वीस वर्षांपूर्वीपर्यंत हा एकमेव आणि, सोयीस्कर किंवा निरुपायाचा नव्हे तर, आवडीचा पर्याय होता!) दूरध्वनी होते पण त्यांचा वापर बऱ्याचदा फक्त भेटण्याचे ठिकाण आणि वेळ ठरविण्यासाठी असायचा. दुसरी व्यक्ती ‘पोहंचके बाहर’ असेल आणि अगदीच भेटणे शक्य नसेल तेव्हाच हे ‘यांत्रिक’ संभाषण थोडे लांबायचे. माध्यमक्रांतीनंतर संवादाची केवळ साधने आणि साधकच नव्हे तर साध्यही बदलले आणि भलत्याच गोष्टींचे विद्युतवेगाने प्रसारण होऊन पर्यावरणीय ग्लोबल वार्मिंगला एक निराळेच भावनिक परिमाण बहाल करत ते मनुष्य संबंधास बाधक ठरू लागले! शिवाय बदलत्या मूल्यव्यवस्थेत ऊर्ध्वगामी सामाजिक स्तराच्या अहमहिकेमध्ये मानव्याच्या मुलभूत मूल्यांची अधोगामी वाटचाल मनुष्यास दुष्टचक्रात अधिकच खोलवर रुतवत गेली. परिणामी बोलणे हे यांत्रिक (पक्षी: मधुसेवनासाठी या फुलावरून त्या फुलावर भ्रमण करित भ्रमणध्वनीला कर्णयंत्र लावून किंवा दूरस्थ राहून दूरध्वनीवरून) होत गेले आणि आधुनिक उपकरणांनी नॉइस कॅन्सलेशनच्या नावाखाली बाहेरच्या अनिष्ट आवाजांबरोबर आतलेही बरेचसे इष्ट आवाज कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (आर्टीफिशियल इंटेलिजन्स, यू नो!) जोरावर स्वयंप्रज्ञेने कॅन्सल करून टाकले; उरले ते औपचारिक आणि व्यावहारिक ध्वनी आणि त्यांच्या गोंगाटात संवेदनांचे असहाय्य अस्फुट स्फुंदणे!

अमिताभने आपल्या विशिष्ट शैलीने हिंदी चित्रपट सृष्टीच्या इतिहासात एक माईलस्टोन करून ठेवलेल्या ‘अग्निपथ’ या सिनेमात त्याचे पात्र ‘विजय दिनानाथ चौहान’, दूरध्वनी अर्थात टेलिफोन या उपकरणाबद्दल आपले एक अनुभवसिद्ध निरीक्षण नोंदवते. ‘...गलत चीज बनाया ये टेलिफोन. उधरसे आदमी सोचता कुछ है, बोलता कुछ है, करता कुछ है!’ तद्दन फिल्मी आणि रंजनाचा भरपूर मसाला लावून खारवलेले असले तरी, मला हे ‘तत्वज्ञान’ समर्थांच्या मूर्खांच्या लक्षणाइतकेच मर्मग्राही वाटते. शिवाय पदोपदी येणाऱ्या अनुभवांनी त्याची सत्यता पटते आणि तीव्रता अधिकच खुपते. मुळात कारणाशिवाय आणि मनमोकळे असे संभाषण या उपकरणाद्वारे होऊ शकते ही शक्यताच मुळी मला फारशी मानवत नाही. माणूस जेव्हा समोर असतो (प्रत्यक्ष याची देही याची डोळा स्वरुपात, कुठल्याही गैजेटच्या स्क्रीनवर नव्हे) तेव्हा त्याच्या निकट असण्यातून, विविध विभ्रमातून, त्याच्या अस्तित्वाच्या पंचेद्रीयांना जाणवीणाऱ्या देहभानातून जो एक शब्दांपलीकडला संवाद घडत असतो, तो कुठलेही अत्याधुनिक उपकरण जसे कालत्रयी घडवू शकत नाही तसेच प्रकटनातील सच्चेपणा आणि इतर भाव ओळखण्याच्या संवादकौशल्यातील कसोट्याही तपासू शकत नाही! जिज्ञासूंनी सगुणातून निर्गुण साधना अभ्यासल्यास, निर्गुण, निराकार ईश्वराच्या प्राप्तीसाठी देखील सगुणाची आराधना का व कशी करावे लागते याचे संतांनी अतिशय सटीक व समर्पक पद्धतीने केलेले निरुपण पहावे.

तेव्हा ‘अंतर राखून बोलणे’ या तात्विक संकल्पनेचा आधुनिक व्यावहारिक अवतार असलेल्या ‘फोन’ या साधनाच्या मदतीने होणारा संवाद बऱ्याचदा ‘फोनी’ ठरतो आणि कित्येकदा तो तसा असतोही. त्यामुळे प्रत्यक्ष भेटून बोलणे याला हा फोनी पर्याय फारसा परिणामकारक नाही.

आता दुसरा पर्याय म्हणजे लिखित संवाद! ‘पत्र म्हणजे अर्धी भेट’ असे रुजविणाऱ्या काळाचे संस्कार लाभल्याने आम्हाला आजही पत्र हा प्रत्यक्ष भेटीला त्यातला त्यात चांगला पर्याय वाटतो आणि दुधाची तहान ताकावर भागविल्यासारखे वाटते, दोन्ही गोष्टी प्रकृतीला पोषकच. इतर कुठल्याही आधुनिक माध्यमातून संवाद हा शीतपेयांसारखा जितका शोषक (म्हणजे आधी पिणाऱ्याने ते बाटलीतले द्रव शोषायचे आणि उर्वरित आयुष्य ते द्रव त्याला शोषणार) तितकाच थंड आणि अपायकारक. परंतु आजच्या इमोटीकॉन्सच्या काळात कोण कागद पेन घेऊन लिहायला बसणार? त्यात किती वेळेचा अपव्यय! बरं, लिहिलं समजा पत्र मनाचा दृढनिश्चय करून तर ते पाठवायला कुरियर, पोस्ट करावे लागणार. त्यात वेळेबरोबर पैशांचा भुर्दंडही. आणि एवढे करून ते जिच्या नावे लिहिले त्या व्यक्तीच्याच हातात पडेल कि नाही, केंव्हा पडेल, काय समजेल काय नाही समजणार, पत्राच्या येथून तेथे 'पौष्टिक' प्रवासाच्या काळात, सदर व्यक्तीने आपला ब्ल्यू टूथ ऑन केल्यास सान्निध्यामुळे नवीनच मित्र-मैत्रिणी लाभल्या असल्यास या पत्राची त्याच्या लेखी किंमत किती आणि प्रतिसादाचा उल्हास किती...? किती विवंचना? मुळात स्वत:च्या आयुष्यात इतक्या कटकटी, त्यात हे विकतचे दुखणे कोण घेतो? त्यापेक्षा फेसबुक, व्हॉट्सएप कसे सहज, सोपे आणि सुटसुटीत. आपल्यासाठी कुणीतरी काहीतरी रोज खरडून धाडत असतेच, तीच सदिच्छा, प्रबोधनपर तत्वज्ञान किंवा जगाचे कल्याण आणि विद्वेषाचे राजकारण करणारे सारेच मजकूर फारशी शहानिशा न करता, आपल्याला हवी ती पिवळी तोंडे घालून पाठवून द्यावे... आहे काय नाही काय? एका उद्दात सामाजिक कार्यास हातभार लावल्याचे सात्विक समाधान आणि वर सगळ्याच कॉमन मित्रांशी रेग्युलर टचमध्ये राहिल्याचा बोनस; याला म्हणतात स्मार्ट फोनचा अतिस्मार्ट वापर!

पूर्वी विपुल, अर्थपूर्ण आणि ज्ञानाधारित अनुभवांचे लेखन व्हायचे तेव्हा देखील ‘इति लेखन सीमा’ असे म्हणून लेखनातून संवादाच्या मर्यादा स्पष्ट केल्या जायच्या आणि अधिक सखोल चर्चेसाठी आणि त्या योगे होणाऱ्या गाठभेटीसाठी सुचवले जायचे. त्या सूचक उद्गारांनाच भेटीचे निमंत्रण समजण्यास कुणाचीही कुठलीही सामाजिक प्रतिष्ठा आड येत नसे. आज अशा प्रकारचे लेखन इतिहास संशोधक मंडळात विपुल असले तरी कुठल्याही वर्तमान लेखनव्यवहारात सापडणे दुरापास्त. अत्यंत सुमार व अनर्थकारक अर्धवट आशय, रोमन लिपी, देवनागरी भाषा, व्याकरणाचा आनंद आणि जणू अंगण सजवायला रांगोळी घालावी अशी त्या पिवळ्तोंड्या इमोजींची पखरण हा आजच्या मराठी अति शीघ्र संवादाचा लसावी आहे! आणि याच पद्धतीने मराठी भाषा अभिजात व्हावी म्हणून प्रयत्न करणाऱ्या समाजमाध्यम धुरीणांचा बाणेदारपणा तर्खडकरांसह साक्षात रामशास्त्र्यांनाही धडकी भरवेल. अर्थात हा मुद्दा भाषा शुचितेचा झाला, आपण संवादाबद्दल बोलत(?) होतो!

एकूणच संवादाचा असा (पिवळा?) तोंडवळा होण्यास कारणीभूत असलेले मूळ माणसाच्या भौतिक जगण्याच्या आणि समृद्धीच्या हव्यासापायी नको इतके गुंतून पडण्यात शोधता येईल. इंग्रजीत ज्याला रैट रेस म्हणतात त्या जगरहाटीच्या धबडग्यात जगणे राहून जातेय आणि करायच्या राहून गेलेल्या गोष्टींची ‘बकेट लिस्ट’ वाढत जाऊन त्यांना निवांतपणी करण्याच्या यादीत पुढे पुढे ढकलले जातेय. पण हा ‘नंतर’ सगळ्यांना लाभणार आहे? किती वर्षाचं आयुष्य असणार आहे आपलं? ६०, ७०, ८०, ९०, १००... १०२ नॉट आउट? आणि जे काही असेल ते कशासाठी आणि कसे जगायचे आहे? मुळात कुणासाठी? कुटुंबाच्या स्थैर्यासाठी पैसा, पैशासाठी नोकरी-व्यवसाय, त्यासाठी काम, कामासाठी वेळ, एवढं करूनही पैसा आणि वेळ दोन्ही पुरत नाही म्हणून ताण, ताणातून वाद-विवाद-विसंवाद, त्यातून वैफल्य, ते घालविण्यासाठी नको नको ते उपाय... याला जीवन ऐसे नाव? ज्या गोष्टी कराव्याशा वाटतात त्या करता येत नाहीत आणि ज्या मुळीच कराव्याशा वाटत नाहीत त्या चुकत नाहीत. कराव्याशा वाटणाऱ्या गोष्टी दीर्घायुष्याच्या भरोशावर पुढे ढकलता येतात पण न कराव्याशा गोष्टी सतत करत राहिल्याने दीर्घायुष्याची शक्यता कमी कमी होत जाते, असे हे दुष्टचक्र! भेदावे कसे हा यक्षप्रश्न...

त्याचे मी माझ्यासाठी मराठीत शोधलेले उत्तर... 

एक पैशाची भाकरी,
एक पैशाचे फूल.
भाकरीसाठी चाकरी,
फूल जगण्याचे मूळ...!

आणि जपानी भाषेत याला म्हणतात आय्-का-गाय् म्हणजे इतिकर्तव्यता, आपल्याला जे आवडते ते करून शतायुषी होण्याचा कानमंत्र! बघा, ऐका, शिका, समजून घ्या, जमलाच तर आचरणात आणा म्हणजे आपण भेटत राहू! केवळ दीर्घायुषीच नाही तर सुखी समाधानी राहू...!