मंगळवार, ८ जानेवारी, २०१९

अभिव्यक्ती...?


सावित्रीच्या लेकींचा अजूनही
होतो पुजाऱ्यांना विटाळ आहे,
सृजन टाकाऊ मानणाऱ्या
राष्ट्राला रूढींचा किटाळ आहे!

साहित्याचे 'राज'-कारण होतांना
सूज्ञ संभावितांचे बकध्यान आहे,
परंपरांच्या जाज्वल्य अभिमानाचे
स्वर मौन अन् खङग म्यान आहे!

पुरोगामी महाराष्ट्राची देखील
एक गूढरम्य रहस्यकथा आहे,
झुंडशाहीने संस्कृतीची कुचंबणा
अन संवेदनांची मूक व्यथा आहे!

विकासाच्या गंगेत सारेच नाहता
विषमतेचाही होत विकास आहे,
धनाढ्यांच्या लहरी भव्यदिव्यतेने
विस्थापितांचे जगणे भकास आहे!

इंडियाच्या बेगडी झगमगाटात
अनास्थेची तार झंकारत आहे,
साऱ्यांचा पोशिंदा भारतीय मात्र
मृत्यूच्या छायेत हुंकारत आहे!

माध्यमांच्या पंगु लांगुलचालनात
समाजमाध्यमांची चलती आहे,
जल्पकांचे थवे पोसणाऱ्यांची
आभासी बातमी भलती आहे!

'मना'ला कष्ट होतातच अन
सद्बुद्धीचीही क्षती आहे,
विवेकाची कास सोडता
माणुसकीची दुर्गती आहे!
-------------------------

यवतमाळ येथे 11 ते 13 जानेवारीला होणाऱ्या 92व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटक म्हणून ज्येष्ठ साहित्यिका नयनतारा सहगल यांना आमंत्रित करण्यात आले होते. मात्र त्यांच्या निवडीवरून झालेल्या वादानंतर संमेलनाच्या आयोजकांनी सहगल यांना उपस्थित राहण्यास नकार कळवला. पण, पुन्हा साहित्यिकांच्या दबावापुढे साहित्य महामंडळ झुकले. संमेलनाच्या व्यासपीठावरून उद्धाटनाच्या भाषणाद्वारे नयनतारा सहगल जी भूमिका मांडणार होत्या तीचा मराठी अनुवाद इथे वाचा.

मंगळवार, १ जानेवारी, २०१९

नववर्षाभिनंदन!


उपजे ते नाशे ।
नाशले पुनरपि दिसे ।
हे घटिकायंत्र तैसे ।
परिभ्रमे गा II

- संत ज्ञानेश्वर

संस्कृती कुठलीही असो, प्रत्येक शेवट नवीन सुरवात असते ही प्रकृती...! म्हणूनच...

कुणालाही कमी लेखू नये, मानू नये लहान,
एकत्र येता सानथोर कार्य साकारते महान.
पळांच्या होता घटिका, घटिकांचे दिसमास,
साऱ्यांच्या एकजूटीने पालटते वर्षाचे पान!

व्यक्ती, सृष्टी आणि समष्टीच्या एकात्म सहप्रवासासाठी प्रार्थना आणि शुभकामना...!

कुठलीच हारजीत अंतिम नसते,
घाव कुठला बाळगत खंत नाही.
मानवा ध्यानीमनी असू दे कायम,
शुरआतका होता कभी अंत नहीं!