रविवार, २८ एप्रिल, २०१९

मनुष्यजन्म...!


माणसाच्या आयुष्याचे ध्येय काय, माणसाला नेमके काय आणि कसे साध्य करायचे आहे या बद्दलचे A Life of Purpose हे चिंतन मी परवाच ‘रिसर्च गेट’वर प्रकाशित केले, ते इथे वाचू शकता. पण मुळात माणूस इतर पाळीव प्राण्यांच्या तुलनेत इतके जास्त का जगतो आणि त्याने तसेच जगणे का अपेक्षित आहे या बद्दलची एक रंजक बोधकथा, जी स्पष्ट करते की मुळात तुमच्या आयुष्यातील बरीचशी वर्षे ही तुमची नाहीतच...

ब्रह्मदेवाने सृष्टी निर्माण केली. समुद्र, नद्या, हिरवीगार कुरणे, वाहता वारा, खळाळते पाणी आणि या सगळ्यांना अखंड उर्जा पुरविणारा तेजस्वी सूर्य! एवढे झाल्यावर चित्र तर सुंदर सजले पण त्यात जीव आहे असे काही वाटे ना. काही चालते-बोलते-हलते सजीव प्राणी या सृष्टीला अधिकच बहार आणतील अशा कल्पनेने ब्रह्मदेवाने काही विशिष्ट कार्य करू शकतील असे प्राणी घडवायचे ठरविले.

सर्वप्रथम ब्रह्मदेवाने तयार केला एक घोडा – अत्यंत उर्जाशील, मेहनती, वेगवान आणि आपल्या स्वाराला वायुवेगाने येथून तिथे पोहचविणारा. त्याला आयुष्य दिले २० वर्षांचे! घोडा म्हणाला, ‘देवा, मला एव्हढे धावपळीचे आयुष्य देताय तर ते १० वर्षांचे पुरे, १० काढून घ्या.’ देव म्हणाला, ‘ठीक, तू म्हणतोस तर तसे...’

मग देवाने तयार केला एक बैल – अत्यंत कामसू, कष्टाळू, इमानी आणि मिळेल त्यावर गुजराण करीत आपल्या धन्यासाठी पडेल ते कष्ट करणारा. त्याला आयुष्य दिले ५० वर्षांचे! बैल म्हणाला, ‘देवा, दया करा. मला एव्हढे कष्टाचे आयुष्य देताय तर निदान ते लांबवू तरी नका, २० वर्षे पुरे, ३० कमी करा.’ देव म्हणाला, ‘ठीक, जशी तुझी मर्जी.’

या नंतर देवाने निर्मिती केली कुत्र्याची! कुत्र्याने मिळेल ते खायचे होते, मालकाच्या चीजवस्तूंची राखण करायची होती आणि दारावर बसून येणाऱ्याजाणाऱ्यावर नजर ठेवायची होती आणि वेळप्रसंगी भुंकायचे होते, आयुष्य २५ वर्षे. कुत्राही म्हणाला २५ वर्षे खूप होतात १५ ठीक आहेत, देवाने त्याचीही १० वर्षे काढून घेतली.

नंतर देवाने घडविला वानर अर्थात माकड! त्याला सांगितले तुझ्या पाठीला कायम बाक राहील, तू फक्त केळी खाशील, इथून तिथे उड्या मारशील आणि माकडचेष्टा करून इतरांचे मनोरंजन करीत २० वर्षे जगशील. माकड म्हणाले, ‘देवा, २० वर्षे खूप होतात, १० पुरे, १० परत घ्या.’ देव म्हणाला, ‘ठीक, जशी तुझी इच्छा.’

एवढ्या सगळ्या निर्मितीनंतर देवाने माणूस घडवायला घेतला... देवाला माणूस हा सर्व प्राण्यात उत्तम, श्रेष्ठ आणि रचनात्मक हवा होता. देवाने माणसाला सर्वपथम दोन पायावर ताठ उभे राहण्याचे वरदान दिले ज्यामुळे माणसाचा पाठीचा कणा पृथ्वीशी काटकोनात ऊर्ध्वगामी म्हणजे आकाशाकडे पहाणारा सरळ झाडाप्रमाणे घडला. या एका बदलामुळे पुढे अनेक उत्क्रांतीच्या पातळ्या शक्य झाल्या. देवाने माणसाला सांगितले ‘तू माझा मानसपुत्र आहेस तू या सर्व प्राण्यांचा स्वामी असशील, हे सर्व तुझी सेवा करतील. तू खा, पी, मजा कर, आनंदात रहा, सृजनशील कलाकार हो आणि अधून मधून माझे नामस्मरण कर. तुला मी २० वर्षे आयुष्य देतोय...’

अशा सुखासीन आणि ऐषारामाच्या आयुष्याच्या कल्पनेने, मुळातच लोभी असलेल्या माणसाला स्वामित्वाच्या आणि स्वर्गसुखाच्या कल्पनेचा मोह पडला, तो तक्रारीच्या सुरात देवाला म्हणाला, ‘फक्त २० वर्षे? प्रभू, मला जगण्याचे सुख भोगण्यास २० वर्षे फारच कमी होतात. तुम्ही असं करा ना, ते घोड्याला नको असलेले १०, बैलाने नाकारलेले ३०, कुत्र्याने परत केलेले १० आणि माकडाने नको म्हटलेले १० अशी ६० वर्षे मला द्या म्हणजे मी किमान ८० वर्षे जगू शकेल.’ देव म्हणाला, ‘बघ, नीट विचार करून ठरव. मी एकदा हो म्हणालो तर तुला तेवढे जगावेच लागेल!’ देवाच्या सावधानतेच्या इशाऱ्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करीत, स्वप्नरंजनात रममाण झालेला माणूस म्हणाला, ‘हो, चालतंय की...!’

अशा प्रकारे इतर प्राण्यांनी नाकारलेली वर्षे लोभी माणसाने स्वत:च्या आयुष्याला जोडून घेतली पण त्यामुळे आयुष्याची सुरवातीची स्वत:ची २० वर्षे माणूस देवाला अपेक्षित होते तसा जगतो – खातो, पितो, मजा करतो, सृजनशील असतो, आनंदात रहातो. कुठलीही काळजी नाही, कशाची विवंचना नाही आणि देवाची आठवणही नाही.

पुढील १० वर्षे म्हणजे वयाच्या ३०व्या वर्षापर्यंत घोड्याचे आयुष्य जगतो. घोड्यासारखा अतिशय स्फूर्ती आणि जोश असलेला पण कशा न कशाच्या मागे सतत धावत असलेला दिसतो. ३० ते ६० ही ३० वर्षे माणूस बैलासारखा घाण्याला जुंपून आणि डोळ्यांना झापड लावून गोल गोल फिरत ढोर मेहनत करीत असतो. आयुष्यातला हा काळ माणूस खूप मेहनत करतो पण त्याचे जगणे हे बहुदा इतरांसाठीच असल्याने अधिकाधिक उद्देशहीन, साचेबद्ध आणि म्हणून निरस, कंटाळवाणे होऊन जाते.

६० ते ७० ही दहा वर्षे कुत्र्याप्रमाणे त्याने जमविलेल्या मायेचे राखण करीत बसतो, येणाऱ्याजाणाऱ्या प्रत्येकाकडे संशयाने बघतो, शंका वाटली तर भुंकतो. जो आपल्याला खाऊपिऊ घालेल, आपली काळजी घेईल, आपले लाड करेल, त्याच्याशी इमानदार राहून आपल्या साऱ्या निष्ठा त्याला वाहतो. ७० ते ८० ही दहा वर्षे माकडाप्रमाणे पाठीत बाक घेऊन, सहज चावता, गिळता येतील असे मऊ पदार्थ खात, आपल्या नातवंडांच्या मनोरंजनासाठी माकडचेष्टा करत, या मुलाकडून त्या मुलीकडे असे भटकत रहातो.

वयाच्या ८० वर्षानंतरही आयुष्य लाभले तर माणसाला पुन्हा आपले माणूसपण आठवते आणि देवाच्या आपल्याकडून असलेल्या शेवटच्या अपेक्षेचे स्मरण होते. म्हणून ८० नंतरचा उरलेला काळ तो देवदेव करण्यात आणि नामस्मरण करण्यात अधिकाधिक देऊळी-राउळी, मठ-आश्रमात, तीर्थक्षेत्री असा व्यतीत करतो...

इसापनीती, पंचतंत्र, जातककथा अशा सुरस आणि चमत्कारिक कथा प्रवाहांचा मूळ उद्देश हा मनोरंजन नसून प्रबोधन हा असतो. माणसाच्या आयुष्यातील वाढीव वर्षांची प्राण्यांशी सांगड घालणारी वरील बोधकथा ही देखील त्यापैकीच असली तरी त्यातील तत्वचिंतन निश्चितच चिंतनीय आहे. विविध भाषांमध्ये ही कथा वेगवेगळ्या स्वरुपात आढळते, वेगवेगळ्या प्राण्यांचे दाखले देते. पण तपशिलापेक्षा आशय महत्वाचा! आत्ता तुम्ही वाचताय हे खास लोकाग्रहास्तव(?), उपलब्ध साऱ्या संदर्भांवरून बनविलेले, माझे स्वत:चे व्हर्जन आहे... आता हे माझे व्हर्जन असल्याने त्याचा समारोपही माझ्या पद्धतीनेच होणार... वरील ब्रह्मदेव आणि पशु यांची कथा उद्बोधक, रंजक आणि मर्मग्राही असली तरी मला याबाबत थोडे वेगळे म्हणावेसे वाटते...

मुळात मनुष्य प्रजातीचे प्रयोजन हे जग अधिक सुंदर करण्यासाठी, जगणे अर्थपूर्ण आणि सृष्टी समृद्ध करण्यासाठी आहे असा माझा ठाम विश्वास आहे. ते तसे नसते तर मनुष्याला विचार करण्याची क्षमता, भाषा, वाणी आणि संवाद साधण्याची कला देण्मायागे निसर्गाचा दुसरा काय हेतू असावा? माणसाने केवळ इतर प्राण्यांवर स्वामित्व गाजवावे, त्यांच्या नैसर्गिक क्षमतांचा उपयोग करून घ्यावा आणि स्वत: सुखासीन आयुष्य कंठावे ही प्रतिमा केवळ बोधकथेतील भाबड्या कल्पनाविश्वात असू शकते, प्रत्यक्षात ती अतिशय अव्यवहार्य ठरावी, ठरतेय...

म्हणूनच या कथेच्या संदर्भात मला असे वाटते की मनुष्यजीवन हे घोड्याच्या उमेदीने आणि उर्जेने कला-कौशल्य ज्ञान-भान मिळवून, बैलाप्रमाणे आपले विहित कर्तव्यकर्म निष्ठेने पार पाडीत, कुत्र्याप्रमाणे सजग, सतर्क, इमानी आणि मिळाल्याप्रती कृतज्ञ राहून, माकडाप्रमाणे सदा उत्साहाने इतरांचे, विशेषत: मुलांचे, मनोरंजन करीत सुखासमाधानात व्यतीत करावे आणि हे सर्व करतांना मनी सदोदित नामस्मरण करावे याहून कृतार्थ मनुष्यजन्म होणे नाही... 
तुझें रूप चित्ती राहो
मुखी तुझें नाम
देह प्रपंचाचा दास
सुखे करो काम... 

मंगळवार, २३ एप्रिल, २०१९

चऱ्हाट...!



मी मांडत रहातो शब्द
एकामागे एक
आणि कधी बनते कविता
कधी स्फुटं, कधी अस्फुट...
भावना असतील माझ्या किंवा
कोलाहलातील जगण्याच्या मौनाचे
किंवा मौनाच्या कोलाहलाचे असेल
प्रकटन... दर्शन वगैरेही म्हणेल कुणी
आणि एक दिवस या उपदव्यापाचे  
होईल पुस्तक, न जाणो...
पण त्या पुस्तकाला नसेल कॉपीराईट
प्रकाशकही नसेल म्हणून नसतील आवृत्या
पण असेल एक वाचक... नक्की असेल तो किंवा ती
त्याला नसेल तमा त्या पुस्तकाच्या
‘बेस्टसेलर’ असण्या-नसण्याची... कारण
त्याच्या आयुष्यात डोकावणारा सापडेल त्याला
एक प्रहर, एक कटाक्ष, एक प्रवास अन किमान एक शब्द...
त्या एका शब्दासाठी
ही सारी धडपड... व्यर्थ नाही आणि वांझही... अंकुरेल!    

आज जागतिक पुस्तक दिन आहे, म्हणे... त्याला समर्पित हे ‘अमुकचे चऱ्हाट’!

...पुस्तकाचे पान...

रविवार, २१ एप्रिल, २०१९

कोलाहल...



मानवी संस्कृतीच्या इतिहासात काव्य-शास्त्र-विनोद यांनी समृद्ध अशा साहित्याचा अत्यंत मोलाचा वाटा आहे. त्यातही अग्रमान मिळालेल्या काव्य या साहित्यप्रकारास विशेष महत्व यासाठी की चिंतनशील आणि संवेदनशील वृत्तीच्या प्रचीतीची ही अभिव्यक्ती नऊ शब्दात नवरस उलगडून दाखविण्याची क्षमता राखून आहे. मानवी भाव-भावनांचे प्रत्ययकारी चित्रण करणाऱ्या या समृध्द अशा परंपरेचे भौगोलिक, प्रांतवार आणि भाषानिहाय असे अनेक प्रवाह आढळून येतात. त्या त्या प्रदेशामध्ये त्या त्या काळात काही वैशिष्ट्यपूर्ण रचनांचा एवढा प्रभाव राहिला आहे की त्या काळाची ‘युगवाणी’ म्हणवून घेण्याचा मान त्यांना लाभला. ई.स. १९१८ ते १९३६ या अठरा वर्षाचा कालखंड हिंदी साहित्यातील ‘छायावाद’ नावाने ओळखल्या जाणाऱ्या प्रवाहाचा ऐन भरीचा काळ. तत्पूर्वीच्या द्विवेदी युगातील आदर्शवादी, उपदेशात्मक, निरस अशा काव्यप्रवाहाशी विद्रोह म्हणून, गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या गीतांजलीचा प्रभाव असलेल्या भावनाप्रधान, कल्पनारम्य, नवउन्मेषी तथा स्वप्नाळू छायावादाचा उगम झाला. जयशंकर प्रसाद, सूर्यकान्त त्रिपाठी 'निराला', पंत, महादेवी वर्मा हे चार साहित्य-शिरोमणी या प्रवाहाचे हस्तिदंती खांब, बिनीचे शिलेदार.

जयशंकर प्रसाद यांनी निबंध, कथा, कादंबरी, नाटक आणि कविता अशा सर्व साहित्यप्रकारांच्या माध्यमातून हिंदी भाषा समृद्ध केली. त्यांच्या साहित्यसेवेच्या शिरपेचातील मानाचा तुरा म्हणजे कामयानी हे महाकाव्य. साहित्यिक मूल्य, कल्पनाविहार, स्वप्नाळू काव्यात्मकता तथा चिंतनशील आशयघनता अशा सर्व स्तरांवर कालिदासाच्या मेघदूताची आठवण व्हावी अशी अलौकिक रचना म्हणजे कामायनी. सुमारे ७-८ वर्षाच्या तपस्येचे फळ म्हणजे १९३६ साली प्रकाशित झालेले जयशंकर प्रसाद यांचे साहित्यशारदेच्या चरणी वाहिलेले हे अखेरचे काव्यपुष्प! ‘चिंता’ या विकाराने आरंभ होऊन ‘आनंद’ या विहाराने समारोप होणाऱ्या १५ अध्यायांच्या या महाकाव्यात मानवाच्या भावप्रवासाचा पट कवीने अशा खुबीने उलगडून दाखविला आहे की आदीपासून मायेपर्यंतच्या मनोविकासाचा तसेच सांस्कृतिक संक्रमणाचा इतिहास सूज्ञास उमजावा. अरविंद-दर्शन आणि गांधी-दर्शन यांचा प्रभाव इथे तिथे जाणविणाऱ्या प्रत्यभिज्ञा दर्शनवर आधारित, ‘कामायनी’मध्ये कथानकाच्या पात्रांच्या रूपकातून येणाऱ्या लज्जा, सौंदर्य, श्रद्धा आणि शालीनता या चित्तवृत्तींचे दर्शन हे कलाक्षेत्रातील छायावादी काव्यप्रतीभेचे सर्वोत्कृष्ठ प्रतिक मानले जाते.

‘कामायनी’चे कथानक हे निश्चिंत आणि चिरतरुण आयुष्य लाभल्याने भोगविलासी झालेल्या देवलोकाने आपल्या बेधुंद, बेदरकार आणि अनिर्बंध आत्ममग्नतेने केलेला अविचार प्रकृतीस सहन न झाल्याने त्यावर तोडगा सृष्टीनेच कसा काढला इथे सुरु होते. एका महाभयंकर विनाशकारी प्रलयाच्या ‘उपाया’तून सृष्टीने अविवेकी, भोगवादी देवसृष्टीचा विनाश केला ज्यातून केवळ मनु वाचला. चिंतारहित आणि चिरंजीव अशा देवलोकांच्या विनाशातून उगम पावलेल्या मानव जातीचा मूळ स्वभाव हा चिंता आणि मृत्यूभय यावरच विकास पावेल अशी प्रतिबंधात्मक तरतूद प्रकृतीने करून ठेवली. चिंतेशिवाय मनुमध्ये देव आणि दानव या दोन्ही वृत्तींचा अंतर्भाव असल्याने एका बाजूला आशा, श्रद्धा, लज्जा आणि शालीनता याबरोबर दुसऱ्या बाजूला षडरिपुंचा प्रादुर्भाव यांचा संघर्ष सुरु होता. या निरंतर संघर्षाच्या अनुभूतीने मनुस विरक्तीची आस लागली आणि त्यातून त्याचा श्रद्धेच्या मार्गाने जीवन-दर्शन, जीवन-रहस्य, आत्मभान आणि सच्चिदानंद असा प्रवास सुरु झाला. या रूपकाच्या माध्यमातून सांगितलेला मानवजातीचा पशुपालन, शेती, समाजधारणा आणि त्यातून औद्योगिक क्रांतीतून साधलेली भौतिक समृद्धी, त्यातून निर्माण होणाऱ्या समस्या आणि परिणामस्वरूप माणसाला वाटणारी अध्यात्माची सुप्त ओढ अशी ही समस्त मनुष्य योनीच्या उगम आणि विकासाची कहाणी आहे.

‘कामायनी’चा नायक आहे मनु आणि नायिका कामायनी म्हणजे कामपुत्री श्रद्धा. मनु मनाप्रमाणे चंचल आहे. तपस्वी जीवन व्यतीत करणाऱ्या मनुस श्रद्धेच्या मोहाने प्रणयाची बाधा होते. तदनंतर आकुलि व किलात या असुरांच्या प्रभावाने तो हिंसा व मनमानी करीत श्रद्धेस सोडून वाऱ्यावर भटकत सारस्वत प्रदेशात पोहोचतो. श्रद्धेस त्यागल्याने तिचा पिता काम मनुवर क्रोधीत होऊन त्यास शाप देतो ज्यामुळे किंकर्तव्यदिग्मूढ अवस्थेत मनु लौकिकाच्या संसर्गाने बुद्धीस शरण जातो आणि भौतिक विकासाच्या आहारी जातो. तथापि संयमाचा अभाव आणि अस्थिर, अचपळ चित्त यामुळे लौकीकातील प्रजेशी त्याचा संघर्ष होतो आणि तेथील मानहानीकारक पराभवाने व्याकुळ झालेला मनु लौकिकातून पळ काढून पुन्हा एकदा अध्यात्मामध्ये श्रद्धेच्या सहाय्याने सच्चिदानंद शोधतो. अशा तऱ्हेने श्रद्धा, लौकिकाची ओढ, बौद्धिक क्षमता, भौतिक समृद्धी, संघर्ष, चिंतनशीलता आणि आध्यात्म या मनुष्याच्या चिरंतन आणि अटळ प्रवासाचे अत्यंत विचक्षण आणि विलक्षण विश्लेषण कामायनी या काव्याविष्कारात आढळते.

एका मुक्त चिंतनाच्या योगाने सुरु झालेला माझा हा अभ्यास या आकलनापाशी येऊन थांबला की आपल्या जाणिवांचा हा ‘वासने’पासून ‘विरक्ती’पर्यंतचा प्रवास न नवीन आहे न एकमेवाद्वितीय; हा एक आदीपासून अंतापर्यंत चालणारा वर्तमानाचा प्रवाह आहे ज्याचा एका तटावर भूतकाळ आहे तर दुसऱ्या तटावर भविष्य. प्रत्येक प्रवाहपतीत जीवास हे चक्र भेदून किंवा खरे तर भोगूनच पुढे जायचे आहे! यातून मुक्तीचा मार्ग हा केवळ ज्ञानाने प्राप्त होऊ शकणारा आणि ते ज्ञान म्हणजे सॉक्रेटीसच्या भाषेत, ‘माझ्यापुरते सांगायचे तर मला एवढेच ज्ञात झाले आहे की मला काहीही ज्ञात नाही...’ अर्थात दुसऱ्या अवतरणात, ‘शुरुआतका कोई अंत नहीं...’ आता या ब्रह्मज्ञानें आलेल्या शहाणीवेने पुन्हा एकदा ते गीत ऐकता बऱ्याच गोष्टींचा उलगडा झाला तर काही नवीन दुर्बोध गर्द झाले... पण यातच तर साला मजा आहे, नाहीतर आहेच की तेच ते, तेच ते, तेच ते, आणि तेच ते... पण असे गुढरम्य ‘ग्रेस’ थ्रू ‘जी. ए.’ व्हाया ‘विंदा’ असे नको, पहिल्यापासून सांगतो...

या सगळ्या केमिकल लोच्याचे आणि आमच्या हिंदी साहित्य घुसळणीचे मूळ पुन्हा एकदा आमच्यावर निरपेक्ष प्रेम करणारे आमचे जळगावचे स्नेही-सुहृद, ‘टिक-टिक’कार श्री. प्रदीप रस्से सर! हा माणूस अशक्य आहे. यांच्यावर काही लिहू म्हटले तर एक आयुष्य पुरेल असे नाही, कारण आमच्या प्रतिभेची तेवढी लांबी-रुंदी आणि खोलीही नाही. पण म्हणून या अवलिया प्रती आपल्या तोडक्या-मोडक्या शब्दात व्यक्तच होऊ नये असे थोडीच आहे! प्रत्येक भेटीत हा माणूस जसा थोडा अधिक उलगडत जातो तसा काहीतरी नवीन खाद्य पुरवतो आणि एरवी ‘...तुका म्हणे आता | उरलो उपकारापुरता...’ अशा आमच्या जगण्यास काही उद्देश पुरवून त्यातील लुप्त होऊ पहाणारी खुमारी वाढवतो. या वेळेस काय तर म्हणे ‘...तुमुल कोलाहल कलह में...’ बरं, माणूस इतका इम्पल्सिव्ह की लहान मुलासारखा हट्टच! काही हवे म्हणजे हवेच... तेही आज, आत्ता ताबडतोब! असे कुठे असते का? विषय समजून घ्यावा लागतो, संदर्भ-तपशील गोळा करावे लागतात, आकलनास काही अवधी द्यावा लागतो... आणि हे सारे रीतसर झाल्यावर, समर्थांच्या वचनानुसार अभ्यासोनी प्रकटावे । ना तरी झाकोनी राहावे । प्रकटोनी नासावे । हे बरे नव्हे ॥ म्हणून अभ्यास करतो तर थोडा अवधी लागणार की नाही...? असो!

गुलजार, आरडी आणि आशाताई या त्रिवेणी संगमाच्या स्निग्ध प्रवाहात जे मोती वेचले त्यातील ‘मेरा कुछ सामान...’ हा शीर्षस्थ शुभ्र मौक्तिक. याच्या तोडीचे पुन्हा कधी आयुष्यात मिळेल, गवसेल, भेटेल असे काही वाटले नव्हते. पण या आमच्या गोताखोर स्नेह्यांनी पुन्हा एकदा कलासागरात डुबकी मारून काढले काय तर हे अमृत... “तुमुल कोलाहल कलह में मैं ह्रदय की बात रे मन...” आता याबद्दल या माणसाचे आभार कसे मानावे...? त्याचा हट्ट पुरवून! सर, माझ्याकडून तुमचा हट्ट पुरवायला अक्षम्य विलंब झाला असला तरी घेतलेल्या वेळेचे चीज करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केलाय हे या विश्लेषणावरून पटावे... आणि माफ करालच याबद्दल बालंबाल खात्री! काही गीला-शिकवा शिल्लक राहिलाच तर प्रवासाला निघण्यापूर्वी विसाव्याचे थंडगार बॉम्बे ठिकाण आहेच...  

तर ‘तुमुल कोलाहल कलह में...’ लौकिक, मर्त्य आणि व्यवहारी जगाच्या गदारोळात अडकून ज्याची कुचंबणा होते आहे अशा मनुस, श्रद्धेच्या त्याच्या आयुष्यातील आगमनाने लाभणारी शांती, समाधान आणि थोडासा विसावा हे या गीताचे मूळ बीज आहे. ‘अभिव्यक्त’ यांच्या ब्लॉगवर या गीताचे हिंदीमध्येच अत्यंत समर्थ निरुपण सापडले. हिंदी राष्ट्रभाषा असल्याने आणि मराठी समजणाऱ्या बहुंतास हिंदी समजत असल्याने केवळ भाषांतराचे ओझें वागवून भारवाही होण्यापेक्षा आहे तसे ते पोहचवून मर्मग्राही व्हावे हे उचित या विचाराने ते उधृत करीत आहे, त्याचा स्त्रोत येथे पाहू शकता -                                                             

तुमुल कोलाहल कलह में
मैं ह्रदय की बात रे मन

विकल होकर नित्य चचंल,
खोजती जब नींद के पल,
चेतना थक-सी रही तब,
मैं मलय की बात रे मन!

विश्व के तुमुल कोलाहल में अर्थात सांसारिक मार-पीट, भागा-दौड़ी, लूट-खसोट इत्यादि जंजालों के बीच मैं हृदय की बात (श्रद्धा) हूँ! जग-जीवन के नित्य के व्यापारों से थक कर जब चेतना नींद के सुखद पल खोजने लगती है, श्रम के पश्चात विश्राम खोजने लगती है तब मैं मलय पर्वत की सुवासित, शीतल और सुखद हवा के रूप में आती हूँ और चेतना की पीड़ा को, उसके श्रम के भार को हर लेती हूँ।

चिर विषाद-विलीन मन की,
इस व्यथा के तिमिर-वन की;
मैं उषा-सी ज्योति-रेखा,
कुसुम-विकसित प्रात रे मन!

जीवन दुख और विषाद के अंधकार में उलझा हुआ है, खोया हुआ है; उससे निकलने का रास्ता नहीं उसे नहीं सूझता है। व्यथा के अंधेरे वन में कोई रास्ता मिले भी तो कैसे मिले? परंतु मैं उसी व्यथा के घनघोर अंधेरे वन में ज्योति की रेखा के समान हूँ , कलियों को खिला देने वाली सुंदर, सुखकर, प्रेरक प्रभात के समान हूँ।

जहाँ मरु-ज्वाला धधकती,
चातकी कन को तरसती,
उन्हीं जीवन घाटियों की,
मैं सरस बरसात रे मन!

जीवन अतृप्ति के कारण धधकती हुई मरूभूमि(रेगिस्तान) के समान है। इस मरुभूमि में (जीवन में) अतृप्त मन चातक पक्षी के समान तृप्ति रूपी स्वाति की बूंद (आंशिक तृप्ति) के लिए तरस रहा है। जीवन की उन्हीं जलती घाटियों में मैं तृप्ति की सरस वर्षा के समान हूँ अर्थात अतृप्ति के कारण सूखे जीवन में मैं सम्पूर्ण तृप्ति हूँ, जहाँ बून्द की इच्छा है वहाँ मैं पूरी बरसात हूँ। 

पवन की प्राचीर में रुक,
जला जीवन जी रहा झुक;
इस झुलसते विश्व दिन की
मैं कुसुम-श्रृतु-रात रे मन!

पवन की प्राचीर क्या है? हमारे चारों ओर वायु का एक बहुस्तरीय आवरण है जिसे हम 'वातावरण' कहते हैं। यह वातावरण भी किस ओर संकेत करता है? क्योंकि 'पवन की प्राचीर' मतलब तो वातावरण हो गया अगला शब्द है 'में'। पवन की यह प्राचीर धरती के ही तो चारों ओर है। अतः 'पवन की प्राचीर में रुक' का अर्थ हुआ धरती या समाज; सामान्यीकरण कर दुनिया कह सकते हैं क्योंकि इसके व्यापक अर्थ में दोनों आ जाते हैं। दुनिया के बंधनों में, कर्मकाण्डों और अनुशासनों में जीवन जकड़ गया है। इन जागतिक व्यापारों के भार से जीवन जल रहा है तथा अब उसकी शक्ति, उसकी ऊर्जा जवाब दे रही है। जीवन श्रमित और क्लांत होकर झुक चुका है। दुनिया में व्याप्त कठिनाइयों, परेशानियों, व्यवधानों, छन्दों, बंधनों, अनुशासनों से जेठ की दोपहरी के समान जलते जीवन में मैं कुसुम-ऋतु की रात अर्थात बसंत ऋतु की सुंदर, सुहानी रात हूँ।

चिर निराशा नीरधार से,
प्रतिच्छायित अश्रु-सर में;
मधुप-मुखर मरंद-मुकुलित,
मैं सजल जलजात रे मन!

जीवन का आकाश निराशा के बादलों से भरा है, तथा निराशा के उन बादलों के नीचे आँसुओं का महान(विशाल) सरोवर है। कभी समाप्त न होने वाले निराशा के बादलों से चारों ओर से घिरे आँसुओं के विशाल सरोवर के बीच मैं प्रेम, करुणा और अनुराग से भरी एक जलजात अर्थात कमल हूँ। आशा के मकरंद और जीवन की सुगंधी से युक्त मेरे मुकुलित रूप पर मधुप(भौंरा) मन मंडरा रहा है। चारों ओर व्याप्त इस निराशा के वातावरण में मेरे आशा रूपी मकरंद का ही उसे सहारा है। ध्यान देने वाली बात यह है कि बादलों का रंग स्याह होता है; व्यथा और निराशा का रंग भी नीला होता है। आँसू जब सरोवर के रूप में राशिभूत होंगे तब उस सरोवर का रंग भी नीला होगा। लेकिन कमल का रंग अरुण होगा- कुछ-कुछ लाल, कुछ-कुछ गुलाबी। ये अरुण रंग आशा का रंग है, अनुराग का रंग है, प्रभात का रंग है और शुरुआत का रंग है। इस बात को ध्यान में रखकर पढ़ने पर उपरोक्त पंक्तियों के अर्थ में और गहराई आ जाती है। वैसे तो पूरे गीत में सानुप्रासिक पदों की योजना हुई है परंतु अंतिम में अनुप्रास अपने पूरे सौंदर्य के साथ उपस्थित हुआ है- "मधुप-मुखर मरंद-मुकुलित, मैं सजल जलजात रे मन!"। 'मकरंद' के स्थान पर 'मरंद' शब्द का प्रयोग कर संगीतात्मकता की रक्षा की गई है तथा इससे अतिरिक्त कोमलता भी आयी है। 'जलजात' के लिए 'सजल' विशेषण के प्रयोग ने रूप और अर्थ दोनों के स्तर पर सुंदरता को बढ़ाया है।

‘तुमुल कोलाहल...’ च्या निमित्ताने मला मानवी आयुष्याच्या एका अभिजात अनुभवाशी आणि ‘सुभग विश्वा’शी कायमचे बांधून टाकल्याबद्दल रस्से सरांप्रती मन:पूर्वक कृतज्ञता आणि आता ‘आ चल के तुझें...’ पासून ‘मेरा कुछ सामान...’ पर्यंतच्या माझ्या पोतडीत ही ‘तुमुल कोलाहल...’ची शिदोरी, माझे उर्वरित जिणे (आणि चिंतन) सुगंधित करीत, माझ्याबरोबरच जाणार हे निश्चित...!

इति लेखनसीमा.

मंगळवार, २ एप्रिल, २०१९

सृजन...!



काही सांगू या नको
फार मागू या नको,
रात्रीची कूस उजवावी
आणि काही नको...

तांबडे फुटता दिशा नहाव्या,
चिमणपाखरांना चारा मिळावा.
मोत्याचे नसू देत दाणे, फक्त
पेरल्या दाण्यास गर्भ रहावा...

घंटा शाळेची देवघरात ऐकू यावी,
नांदत्या गोकुळाने श्रीरंग ल्यावा.
अंगणातल्या तुळशीवृंदावनाने
परीक्षा बघता आशिर्वाद द्यावा...

करू नये कुणी कुणाचा हेवा
द्वेष तर निषिद्धच ठरावा,
शस्त्रांचे साऱ्या व्हावेत मंत्र
अन दंभ सौहार्दाशी हरावा...

भूक सर्वत्र एक अन
रक्ताचा एकच रंग,
बंधुभाव असा नांदावा
व्हावे जगणे अभंग...

होवो रंग सारे मुक्त
झेंड्याच्या काठीवरून,
उतरावे सारेच शहाणे
उंटाच्या पाठीवरून...

मैत्र जीवलगांच्या साथीने फुलता
बोलत्या शब्दांचे सुखमंत्र व्हावे.
भावनांचे हरवू नयेत हिंदोळे कधी,
कवितेने नित्य वळचणीस रहावे...

क्षितिजाने बदलता कूस
संध्येस अमृताचा गंध यावा,
उत्कटतेच्या रममाण देहधूनीतून
मोहरल्या गात्रांचा फुलोरा धुंद व्हावा...

काही सांगू या नको
फार मागू या नको,
रात्रीची कूस उजवावी
आणि काही नको...!