मंगळवार, ३० ऑक्टोबर, २०१२

गगनातूर...!

 
नेणीवेची खंत नाही
 
अज्ञानाचा डंख नाही
 
इथल्या मिंधेपणाला
 
गगनातूर पंख नाही...!

रविवार, २८ ऑक्टोबर, २०१२

कल्लोळ...!

 
साध्य, साधन आणि साधक
 
यांचा झालाय जरा घोळ
 
आराध्यच बदलल्याने
 
साधनेचा संशय-कल्लोळ...!

बुधवार, २४ ऑक्टोबर, २०१२

वेध...!

 

सूर्याची किरणे फुलांची तोरणे

अंगणी वैभव रांगोळीचे

दसऱ्याच्या विजयी चेहऱ्याला

वेध तेजोमय दिवाळीचे...!

मंगळवार, २३ ऑक्टोबर, २०१२

तत्व...!

 
कळीचे फुल उमलता
 
पक्षाचे कूजन बळावे
 
जीवन तत्व उमजता
 
माझे मीपण गळावे...!

रविवार, २१ ऑक्टोबर, २०१२

गहिवर...!

 

सागराच्या भेटीने

गहिवर दाटतो मनी

गाजेचा रोज नवा बाणा

खळबळ अंतरी जुनी...!

शनिवार, २० ऑक्टोबर, २०१२

अप्रविष्ट...!

 
 
जाणीवा धूसर  होता
 
संवेदनाही अस्पष्ट
 
सगुणाच्या उदोउदोत
 
निर्गुण अप्रविष्ट...!

बुधवार, १७ ऑक्टोबर, २०१२

अबोध्य...!

 

उमटले ते उमजले

...असे नाही

मर्मस्थ ते अबोध्य

कसे राही...!

मंगळवार, १६ ऑक्टोबर, २०१२

जगदंब...!

 
बीज अंकुरे अंकुरे
 
तुझ्या घटात ग शक्ती
 
आदी तू, तूच माया
 
जगदंबेची भावभक्ती...! 

सोमवार, १५ ऑक्टोबर, २०१२

वारे...!

 
दृष्टी बदलता सृष्टी बदलली
 
नजर ढळता वेगळेच इशारे
 
सुटता वारे बेभान मतलबी
 
विचारधारेला भलतेच किनारे...!

गुरुवार, ११ ऑक्टोबर, २०१२

संचित...!

 
माझे कर्म माझा धर्म
 
माझी नीती माझी गती
 
दिले घेतले जे जे ते ते
 
माझे संचित माझ्या साथी...

बुधवार, १० ऑक्टोबर, २०१२

हवन...!

 
उत्क्रांत की प्रगत
 
'समृद्ध' हे जीवन
 
मूल्यांच्या होमात
 
नीतीचे हवन...!

रविवार, ७ ऑक्टोबर, २०१२

सोहळे...!

 
सूज्ञ समायोजानाचे
 
व्यावहारिक आयाम वेगळे
 
सोयीस्कर संबंधांचे
 
सांसर्गिक दांभिक सोहळे...!

मंगळवार, २ ऑक्टोबर, २०१२