गुरुवार, २४ मार्च, २०१६

रंगोत्सव...!


प्रत्येक जन्मणारा क्षण
शेवटास ढळतो
तरीही वसंत फुलतो…

उमलती फुले इथे जी, ती ती अखेर वठती
लावण्य रंग रूप, सारे झडून जाती
तो गंध तो फुलोरा, अंती धुळीस मिळतो
तरीही वसंत फुलतो, तरीही वसंत फुलतो…

जी वाटती अतूट, जाती तुटून धागे
आधार जो ठरावा, त्यालाच कीड लागे
ऋतू कोवळा अखेरी, तळत्या उन्हात जळतो
तरीही वसंत फुलतो, तरीही वसंत फुलतो…

तरीही फिरुनी बीज, रुजते पुन्हा नव्याने
तरीही फिरुनी श्वास, रचती सुरेल गाणे
तरीही फिरुनी अंत, उगमाकडेच वळतो
तरीही वसंत फुलतो, तरीही वसंत फुलतो…

- सुधीर मोघे -

निसर्गाचे रंगवैभव उधळणाऱ्या उन्मेषी
वसंताच्या रंगोत्सवाचे अभिष्टचिंतन…!

मंगळवार, २२ मार्च, २०१६

आणिबाणी...!


पाण्यातून जन्मले, पाण्यात वाढले
पाण्यावीन जीवन, नाही नाही…

पाणी जलचरास,पाणी वनस्पतीस
पाणी सर्व सृष्टीस, जीवनदायी…

पाणी सृष्टीमर्म, पाणी परब्रह्म
पाणी नाही केवळ, पाणपोई…

रस्त्यांचे पापुद्रे, पाणी परावर्ती
पाणी शोषून घेई, विकासगती…

कुणी नाहती, कुणी वाहती
पाणी नासती, मूढ मती…

टैंकर सम्राट, कुणी पाणीवाही
त्याच्यापाशी तहानेस, माया नाही…

स्विमिंग पूल तुडुंब, भरूनी वाही
पाणी वाचविण्याची, देतात ग्वाही…

खेळ रंगांचा की मेळा कुंभांचा
पाणी नासविती, साधू-बापू-भाई…

भूमी हवा पाणी, गरज जगण्याची
त्याचाही ठेका, विकती बारभाई…

कुठे पाण्याची, सजते आरास
कुठे वांझ होऊन, भेगाळते भुई…

कुणी उधळीतो, पाणी मौजेसाठी
कुणास पाण्याचा, घोट नाही…

कसले अध्यात्म, कुठली संस्कृती
अध्यात्माचा सोहळा, सरितानाशी…

पाणी वाचवावे, पाणी साचवावे
पाणी वाढवावे, नाश विनाशी…!

आज जागतिक जलदिन. या निमित्त राष्ट्रभाषेतील दोन अत्यंत समर्पक संदेश -

जल है तो कल है…I
आज तो है पानी, कल सुनोगे इसकी कहानी…II

शुक्रवार, ११ मार्च, २०१६

त्रिशंकू...!


क्षितिजाच्या सांजरेषेवर टेकले
वर्तुळाकार सिंहासन नामधारी…
आरूढ जीवात्मा एकटा सर्वत्र
त्रिशंकू तरी भासतो अधिकारी…!

मंगळवार, ८ मार्च, २०१६

८ मार्च


विश्वाची निर्मिती की विश्वनिर्माती तू
आदिमाया की सर्व शक्ती भक्ती तू
जगण्याचा मूळ स्त्रोत बीजवासिनी
की पूजण्याची सवाष्ण सुवासिनी तू

जगा रक्षिण्या प्रकटली ती काली तू
की त्यांच्या विलासाची भोगदासी तू
धर्मकर्मास वाहिलेली अखंड बंदिनी
की विद्याप्रचुर अष्टावधानी नंदिनी तू

उत्सवासाठी सजवली लक्ष्मीगौरी तू
की रहाटगाडग्यास जुंपलेली भैरी तू
आई, बहीण, लेक, सखी, अर्धांगिनी
की स्वयंपूर्ण आत्मसिद्ध कामिनी तू

सहनशीलतेची परिसीमा सेवाव्रती तू 
की मनूजाच्या धारणेची नित्य क्षती तू
सर्वसंगपरित्यागी मीरा, रण-रागिणी
की लखलख चमकणारी दामिनी तू

महिषासुरमर्दिनी दुर्गा, प्रेममयी राधा तू
मंत्री-दासी-रंभा क्षणी की नित्य माता तू
भूमातेची लेक तू सर्वव्यापी गजगामिनी
तुझ्या तनमनधनाची स्वयंभू स्वामिनी तू

उत्पत्तीचा बीजमंत्र, अनादी अनंताचा प्रवाह 
आणि सर्व धारणेचा निर्वाह अशा स्त्रीत्वास प्रणाम!

सोमवार, ७ मार्च, २०१६


मृत्युंजयाय रुद्राय
नीलकंठाय शम्भवे
अमृतेशाय शर्वाय
महादेवाय ते नम: II 

सर्व शिवभक्तांना महाशिवरात्रीच्या भक्तिपूर्वक शुभेच्छा…!

रविवार, ६ मार्च, २०१६

सहजीवन...!

संसाराचे असिधारा व्रत
चरैव इति होता गुरुमंत्र…
जगणे त्यांना कळले हो 
सोबतीचे जे जाणिती तंत्र…!

 

सन्मित्र मिलिंद आणि त्यांच्या संकल्पाचे मूर्त स्वरूप सौ. सुजाता क्षीरसागर या जगावेगळ्या, सर्वस्वी अनुरूप दांपत्यास सहजीवनाच्या आणखी एका वर्षपूर्ती बद्दल सस्नेह… या व्रतस्थ दंपतीने विवाहाचा सुवर्ण आणि अमृतच नव्हे तर हिरक महोत्सवही  साजरा करावा ही मनस्वी सदिच्छा!