रविवार, २९ ऑक्टोबर, २०१७

मन निर्भय जेथे...!

भारताच्या स्वातंत्र्यापूर्वी, स्वतंत्र भारताचे स्वप्न अनेक लोकांनी अनेक पद्धतीने पाहिले होते. नोबेल पारितोषिक विजेते विश्वकवि रवींद्रनाथ टागोर यांच्या स्वप्नातील स्वतंत्र भारताची प्रतिमा मात्र खरोखर नि:स्वार्थ, सर्वसमावेशक, जन-गण-मनास अधिनायक मानणारी अशी उद्दात असल्याने ती अद्वितीय तर आहेच पण, अद्यापही साध्य झालेली नसल्याने, निरंतर देखील आहे. तेव्हा स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतर आपण त्या दिशेने किती वाटचाल केली याचा आढावा सगळ्याच राष्ट्रभक्तांनी घ्यावा...

१९०१ साली मूळ कविता 'चित्त जेथा भयशून्य’ ही गुरदेवांनी बंगालीत लिहिली, त्याचा रवींद्रनाथांनी स्वत:च केलेला अनुवाद गीतांजली मध्ये १९१२ साली प्रकाशित झाला ज्याला नोबेल पारितोषिक मिळाले. त्यानंतर या कवितेचे अनेक भाषात अनुवाद झाले. मराठीतील अनुवाद अद्याप (मला तरी) आढळलेला नाही पण झाला असावा अशी खात्री आहे. इथला माझा हा प्रयत्न भाषांतर, अनुवाद किंवा रुपांतर असा नसून, मनाला अत्यंत भावलेल्या या स्वप्नरंजनातील भावार्थाचा गोषवारा मुक्त भावानुवादातून मांडण्याचा प्रयत्न (गुरुदेवांची क्षमा मागून) आहे, तो भावनेनेच समजून घ्यावा...


...मन निर्भय जेथे...

मन निर्भय जेथे आणि शीर्ष उंचावलेले
भांडार ज्ञानाचे आणि उघडुन मांडलेले I

नांदती सुखाने सर्व, आचार भले स्वतंत्र
जाती धर्म पंथ प्रांत एकत्र सांभाळलेले I

शब्द उमटती नित्य सत्याच्या गर्भातून
परिपूर्णतेसाठी जेथे अथक कर श्रमलेले I

गतानुगतिक कर्मकांडे रूढी त्याज्य जेथे
तर्काचे अधिष्ठान सद्-विवेकाने मानलेले I

तुझ्या सारथ्याने धावे मनोरथांचे वारू
क्षितीज दिव्य कार्यकारणात विस्तारलेले I

अशा स्वयंभू स्वयंपूर्णतेच्या आनंदवनात
माझ्या देशाचे उत्थान, प्रभू मी पाहिलेले I