शनिवार, ३१ ऑगस्ट, २०१९

मेरा पता...!



"माझ्या घराचा क्रमांक खोडून टाकलाय मी आज...
आणि माझ्या गल्लीच्या तोंडावर लावलेली नावाची पाटीही काढून टाकलीय...
एवढेच नव्हे तर त्या रस्त्याचा दिशादर्शक फलकही पुसून टाकलाय...
पण तरीही तुम्हाला मला भेटायची अनिवार ओढ दाटलीच
तर प्रत्येक देशाच्या, प्रत्येक शहरातल्या, प्रत्येक गल्लीचे दार ठोठवा...
हा एक अभिशाप आहे तसेच एक वरदान ही,  
आणि जिथे कुठे मुक्तात्म्याची ओळख पटेल
- ध्यानी असू दे, तेच माझे घर आहे..."

“माझ्या साऱ्या रचना, कविता असो, कथा असो किंवा कादंबरी, मला ठाऊक आहे, एका अनौरस मुलाप्रमाणे आहे. माझ्या जगण्याच्या वास्तवाने माझ्या मनातील स्वप्नाशी प्रणय केला आणि त्यांच्या निषिद्ध मिलनाने या सगळ्या रचनांची उत्पत्ती झाली. मी जाणून आहे की एका अनौरस मुलाचे भोग माझ्या रचनेच्या नशिबी आहेत आणि उभे आयुष्य तिला साहित्यिक समाजाच्या कपाळावरील आठी सोसायची आहे...”

...असे मानणाऱ्या, म्हणणाऱ्या आणि जगणाऱ्या अमृता प्रीतम यांचा आज १०० वा वाढदिवस! हो, वाढदिवसच! पुतळा उभारून जयंती साजरी करण्याइतकी अमृता काही ‘ऐतिहासिक’ घटना नव्हती आणि कुठल्याही संवेदनशील, सूज्ञ आणि विवेकी मनापासून कधीच तेवढी दूरही नव्हती. म्हणूनच सुप्रसिद्ध पत्रकार-लेखक-टीकाकार खुशवंतसिंग जेव्हा तिला म्हणाले, ‘तुझ्या आयुष्याची गोष्ट इतकी क्षुल्लक आणि छोटी आहे की ती लिहिण्यासाठी रेव्हेन्यू स्टँपचा पाठकोरा भाग देखील पुरेल...', तेव्हा खुशवंतसिंगांची ही व्यंगात्मक टिप्पणी लक्षात ठेऊन अमृताने खरोखरीच जेव्हा आत्मचरित्र लिहिले त्याला शीर्षक दिले ‘रसीदी टिकट’ अर्थात रेव्हेन्यू स्टँप! प्रत्येक मुक्तात्म्याच्या मनावर आपला अमिट ठसा उमटविणारा हा स्टँप ‘अमुक’ला अभिव्यक्तीचा वसा देत कुठल्याही अभिनिवेशाशिवाय प्रकटण्याची प्रेरणा देत राहतो.

आजच्या, एका टोकाला आपल्याला अमान्य अशा कुठल्याही विचारांचे दडपशाहीने दमन, दुसऱ्या बाजूला अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली चाललेला विधिनिषेधशून्य स्वैराचार आणि या दोहोंच्या अतिरेकी प्रभावात, एक संतुलित, सुसंगत व्यवस्था देऊ शकणाऱ्या संयमी, समायोजनी विवेकाचा संपूर्ण अभाव, अशा परिस्थितीत अमृताने काय आणि कसे लिहिले असते आणि त्याची परिणीती कशी झाली असती याची कल्पनाच केलेली बरी...!

अमृताने काय लिहिलं असतं याची केवळ कल्पनाच करणे शक्य असले तरी तिने अगोदरच जे लिहून ठेवलंय ते तरी समजून घ्यावे आणि जगून बघावे म्हणून तिच्या मूळ पंजाबी कविता ‘मेरा पता’चा मुक्त भावानुवाद वर सादर केला आहे. 'अद्वैत' या संकल्पनेला आध्यात्मिक विश्लेषण किंवा तत्वज्ञानी चर्चेत कोंडण्याऐवजी व्यावहारिक जगण्यातून मांडण्याची किमया साधणाऱ्या आणि त्याच्या समर्थनात अनेक विरोधांना लीलया तोंड देणाऱ्या अमृताला तिच्या १००व्या वाढदिवशी शतश: नमन आणि तिने जागवलेल्या संवेदना अनेकांच्या रंध्री भिनून प्रवाही राहतील ही अपेक्षा...

आणि हो, विसरण्यापूर्वी, आपल्या सर्वसमावेशक जाणिवांचे सातत्याने सृजनात्मक दर्शन घडविणाऱ्या गुगल टीमचे, अतिशय अभिजात पध्दतीने अमृताला वाहिलेल्या चित्रांजलीबद्दल, मन:पूर्वक आभार...

आज गुगलायला विसरू नका आणि शोधत रहा म्हणजे 'मी' सापडेल...!

रविवार, २५ ऑगस्ट, २०१९

शहाणीव...!


जगणे जसे मुरत जाते
तशी बहरते शहाणीव
वर्तमानाची क्षणोक्षणी
वाढत जाते जाणीव...

मन सांगते ‘जगून घे,
प्रत्येक क्षण असा काही;
आला क्षण, गेला क्षण
हा क्षण फिरुनी नाही...’

जाणवते सत्य नवे
जाणाऱ्या हरेक क्षणासवे
नात्यात नांदते श्रीमंती
मायाजाल कशास हवे?

सापडलाच कधी त्यांना
चिरतारुण्याचा झरा,
पिणार थेंबही नाही, मी
नित्य मुरणाराच बरा...

मोठे मौजेचे असते
पक्व फळापरी मीपण गळणे
मोजकेच उरतात मित्र
आणि त्यांचा स्नेह रुळणे...

शिवाय केस पिकू लागतात तसा
तोलतो मी व्यवहार काट्यावर,
उमजते टाकावा जीव कशासाठी
अन काय मारावे फाट्यावर!

खुपत नाहीत कुठल्या पाऊलखुणा
न रडवणाऱ्या, न खुलवणाऱ्या,
माझ्या जगल्या क्षणांची स्मारके
आणि वाटा काही भुलवणाऱ्या...

वय जसजसे वाढते तसे
कुटुंब माझे वाढत जाई
सहचरणीसह सामावते
त्यात अजूनही बरेच काही...!

मागणे संपले कधीच
आता याचना नाही,
कृतज्ञता त्या संवेदनेची
जी मुरून रंध्रात वाही…!

चाळीशी कधीच मागे सोडून पन्नाशीच्या उंबरठयावर उभ्या असणाऱ्या आणि आता 'वाढ'दिवस साजरा करावा की 'काढ'दिवसांचा हिशोब मांडावा अशा द्विधा मनस्थितीमधील सर्वच 'मनां'साठी ही 'शहाणीव'... माझे आयुष्य ३६५ दिवसांनी समृद्ध करणाऱ्या, लन जॅक्सनसह, साऱ्या स्नेह्यांना समर्पित...!