शनिवार, ३१ डिसेंबर, २०२२

मूल्य...!

राजा पराक्रमी होता, अजेय होता, प्रजाहितदक्षही होता. एका मोठ्या ऐतिहासिक विजयानंतर राजाने महायज्ञ करायचे ठरविले. यज्ञात कर्मकांडाबरोबर दानधर्माचेही प्रयोजन होते आणि त्याचे स्वरूप भव्यदिव्य होते. सोने-चांदी, पशुधन-नाणी कशा कशाची कमतरता नव्हती. प्रजा येत होती, खाऊन-पिऊन-लेऊन-घेऊन तृप्त होत होती. राजाचे तोंडभरून गुणगान करून भरभरून आशीर्वाद देऊन सुखावत होती. चैतन्याचा, आनंदाचा उत्सवी पूर ओसंडून वाहत होता. कशाला म्हणून कमी नव्हती. राजाच्या चेहऱ्यावर अतीव समाधान दाटले होते. 

तेवढ्यात राजाची नजर एका मुंगूसावर गेली. हा काही वेगळाच दिसणारा मुंगूस दानासाठी रचून ठेवलेल्या साहित्यात लोळून पुन्हा वळून आपल्या शरीराकडे पहात होता. राजाला या शुभकार्यात विघ्न आणणाऱ्या मुंगुसाचा मनस्वी रागही आला आणि त्याच्या उपद्व्यापाबद्दल कुतुहुलही वाटले. सोन्याची शेपटी असलेल्या या मुंगुसाला राजाने थोडे दरडावूनच विचारले, ‘काय रे, काय चाललेय तुझे? तुला खायला काही हवे असेल असेल तर धान्यांची कोठारं उघडी आहेत, त्यातून हवे ते पोटभर खा, इथे यज्ञात का लुडबूड करतो आहेस?’

मुंगूस म्हणाला, ‘क्षमा असावी, महाराज ! मी काही उपद्रवमूल्य जोपासणारा व्यावसायिक लाभार्थी प्राणी नाही. एका रात्री एका गावात, काही खायला मिळते का बघावे म्हणून एका झोपडीत शिरलो. अगदीच अन्नान दशा झालेले कुटुंब त्या झोपडीत राहत होते. त्या घरातल्या माउलीने घरातील चार माणसांसाठी मोठ्या मुश्किलीने दोन भाकऱ्या थापल्या होत्या आणि पाण्याबरोबर अर्धी-अर्धी भाकरी गिळावी असा विचार करत असतांना झोपडीचे दार वाजले. दारात एक अभ्यागत उभा होता आणि चार दिवसांपासून उपाशी असलेल्या त्या अभ्यागताला, मिळालेच तर, दोन घास हवे होते.

घरच्या माउलीने विचार केला आपण अर्ध्याच्या जागी चतकोर खाऊ पण पाहुण्याला उपाशी नको ठेवायला. भुकेल्या पाहुण्याने अधाशीपणाने अर्धी भाकरी खाल्ली आणि आशेने पाहू लागला. पाहुणचारात कमी नको, आपण आणखी एक दिवसाने काही मरत नाही असा विचार करून घरधन्याने उरलेली अर्धी भाकरी पाहुण्याला देऊ केली. पाहुण्याने तातडीने ती देखील फस्त केली आणि लोटाभर पाणी पिऊन चालता झाला.

इकडे कुटुंबातील चौघांनी रात्रभर भुकेने तडफडून प्राण सोडले. ‘आता इथे खायला काय मिळणार?’ अशा विषण्ण विचाराने मी झोपडीतून बाहेर पडतांना माझे शेपूट चुलीजवळ रेंगाळले. माउलीने भाकरी थापतांना त्या पिठाचे काही कण तिथे चुलीजवळ सांडले होते. त्या कणांच्या स्पर्शाने माझे संपूर्ण शेपूट सोन्याचे झाले.

आता अशा शरीर मूंगूसाचे आणि शेपटी सोन्याची अवस्थेचे काय करावे, त्यापेक्षा सगळे शरीरच सोन्याचे करून घ्यावे म्हणून मी जिथे कुठे यज्ञयाग, दानधर्म चालला आहे असे समजते तिथे जाऊन पाहतो. तिथल्या दानवस्तूत लोळून पाहतो. वाटते, कणभर पीठाने जे साधले ते हिरे-मौक्तिक, सोने-नाण्याने कसे साधणार नाही? पण कसे कुणास ठाऊक, कितीही भव्यदिव्य, झगमगता, खैरातींची लयलूट असलेला लाख मोलाचा दानधर्म चालला असला तरी माझ्या शरीराचा एक केसही काही सोन्याचा होत नाही.

असे का होत असावे, महाराज…?’

-----------------------------------------------------

‘दि अल्केमिस्ट’, ‘व्हेरोनिका डिसाईड्स टू डाय’, ‘ब्रिडा’ च्या निमित्ताने, परिचय आणि सख्य एकदमच झालेल्या, ‘पावलो कोएलो’ यांच्या पूर्वी, ब्राझील आम्हाला माहित होता तो अलौकिक, एकमेवाद्वितीय आणि लिजेंड असलेल्या ‘पेले’ यांच्यामुळे. त्यांना श्रद्धांजलीच्या निमित्ताने त्यांच्याबद्दल बरेच काही लिहून आले, बरेच काही नव्याने समजले. 

बहुतेकांना माहित नसलेली आणि आजही कुठेही वाचण्यात न आलेली पेलेंबद्दलची एक आठवण: पेले जेव्हा पहिल्यांदाच व्यावसायिक फुटबॉल सामना खेळले तेव्हा त्याबद्दल त्याना मानधनाचा चेक देण्यात आला. चकित होऊन तो स्वीकारतांना पेले लहान मुलाच्या औत्सुक्याने आणि आश्चर्यमिश्रित आनंदाने उद्गारले, ‘...म्हणजे मला याचे पैसे देखील मिळतील?’ [मला यातून जो आनंद आणि आत्मिक समाधान मिळते तेच पुरेसे होते!]

-----------------------------------------------------------------------------


वरील दोन्ही गोष्टीतून काही बोध वैगरे घेण्याची काहीही सक्ती नाही. वर्षाअखेरी काही वेगळे कानावर पडले तर नववर्षाच्या मुहूर्तावर त्या दिशेने निदान विचार तरी सुरु करता येईल, एव्हढेच…


बाकी सगळे सुरु, बंद करण्यासाठी नववर्ष संकल्प आहेतच, त्यासाठी मनापासून शुभेच्छा… !


शुभम् भवतु !

मंगळवार, ६ डिसेंबर, २०२२

मौनाध्याय...!



लिहावे म्हटले काही
तर नेमके सुचत नाही,
मन रमवावे म्हटले जरा
काही काही रुचत नाही

'मना'ची घालमेल अन्
शब्दांचे हे मौनाध्याय,
सुचावा याला कधीतरी
असा ही काही पर्याय

मेघदूत सुचो वा गीताई,
कुंठीत मती मुक्त व्हावी
एक ओवी जगण्यासाठी
मुक्तीची वस्त्रे ल्यावी...!