रविवार, २४ डिसेंबर, २०२३

पुस्तकं...!


काल बऱ्याच वर्षांनी प्रापंचिक कर्मे आणि व्यावहारिक कर्तव्ये यातून जाणीवपूर्वक वेळ काढून फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रांगणात सुरू असलेल्या विश्वविक्रमी 'पुणे पुस्तक महोत्सवा'ला भेट दिली. तेथील हजारो पुस्तकांपैकी शेकडो घ्यावीशी वाटली तरी काही मूलभूत मर्यादा - उदा. त्यासाठी लागणारा निधी, तेवढे सगळे वाचण्यासाठी लागणारा अवधी आणि एक पुस्तक एकदा वाचून झाल्यावर त्याचे काय करायचे ही उपाधी अशा सगळ्या मध्यमवर्गीय विवंचनांमुळे नेहमीप्रमाणे मध्यममार्ग काढून झेपतील तेवढीच पुस्तके घेतली, आता एकेक वाचून हातावेगळे करण्यासाठी वेळेचे नियोजन सुरु आहे.

कालचा संपूर्ण दिवस साहित्यिक, सांस्कृतिक आणि काव्य-शास्त्र-विनोदाने सुफळ सम्पूर्ण करावा म्हणून सायंकाळी २३ व्या कोथरूड साहित्यिक कलावंत सम्मेलनाला हजेरी लावली आणि अशोक नायगावकरांच्या अध्यक्षीय भाषणाचा लाभ (अक्षरश:) घेतला. अध्यक्षीय भाषणाची प्रत प्रेक्षकात वितरित करण्याची प्रथा आहे पण आम्हाला अद्याप ती मिळू शकलेली नाही, प्रयत्न सुरु आहेत, मिळताक्षणी येथे प्रसृत केली जाईल.

अध्यक्षीय भाषणानंतर यंदाच्या पुरुषोत्तम करंडक विजेत्या एकांकिकांचे सादरीकरण होते. त्यातील पहिली खडकी महाविद्यालयाची 'काय झाडी, काय डोंगार, काय हाटील...' ही, निसर्गाची हानी आणि वनवासींना लक्ष्य करून होणाऱ्या विकासावर जळजळीत भाष्य करणारी एकांकिका आशय-विषयात खोली असणारी असली तरी सादरीकरणात खूपच बालीश वाटावी अशी होती. अर्थात महाविद्यालयाच्या युवक-युवतींचा नवथर उत्साह आणि सादरीकरणातील मर्यादांचा विचार करता प्रयत्न स्तुत्यच म्हणायचा.

स. प. महाविद्यालयाची 'कृष्णपक्ष' ही नेहमीप्रमाणे साऱ्याच आघाड्यांवर उजवी असल्याने अधिक प्रभावी आणि रंजक असणे स्वाभाविकच होते. नाट्यशास्त्रातील साऱ्या नियम-आयामांचा उत्कृष्ट वापर आणि अत्यंत घोटीव, सुसंबद्ध टीमवर्क यामुळे, अॅसिड हल्ल्यात विद्रूप झालेल्या तरुणीची व्यथा असा गंभीर विषय, सावळ्या कृष्णाच्या रूपकातून मांडण्याची कल्पना जेवढी कल्पक तेवढेच त्याचे सादरीकरण मोहक करण्यात हे युवक यशस्वी झाले हे निश्चित.

कालचा दिवस असा अत्यंत प्रॉडक्टिव्ह आणि फुलफीलींग गेल्यामुळे आज काहीतरी चांगले लिहून त्याचे 'उद्या'पन करावे म्हणून गुलज़ारांच्या या आणखी एका अत्यंत भावस्पर्शी कवितेचा हा मुक्त भावानुवाद. गुलजारांच्या नखाचीही सर नसल्याने या प्रकटनाकडे मूळ कलाकृतीशी तुलनात्मकदृष्टया साधर्म्य न बघता भावार्थाच्या दृष्टीने तादात्म्य बघावे ही विंनती...

मोबाईल किंवा लॅपटॉपवर झरझर चालणाऱ्या माझ्या बोटांकडे
आशेने बघत राहतात पुस्तके काचेच्या बंद दाराआडून...
'किती दिवस झाले त्या बोटांचा ओलसर स्पर्श अनुभवून...'
या परित्यक्त भावनेतून केविलवाणी झालेली पुस्तके
आताशा झोपेत चालू लागली आहेत म्हणे...

पुस्तकांनी जी जीवनमूल्ये शिकवली
ज्या धारणा विकसित केल्या
ज्या जाणिवा समृद्ध केल्या
त्या आताशा बेघर झाल्यात.
जी नाती, जे ऋणानुबंध त्यांनी ऐकवले
ते सारे सारे आता विरलेत, उसवलेत वाटते...

पान उलटावं तर एक खोल उसासा स्पष्ट ऐकू येतो,
आणि बऱ्याच शब्दांचे तर अर्थच गळून पडलेत.
ज्यावर आता अर्थ उगवत नाहीत असे
निष्पर्ण पिवळ्या खोडासारखी भासते ती शब्दावली...

पेल्यांनी ज्यांना कालबाह्य अडगळ करून टाकले
अशी मातीच्या गडूसारखी इतस्ततः विखुरलेली
बरीचशी बोधवचने, सुविचार, सुभाषिते पण आहेत त्यात !

पान उलटवतांना जीभेला कागदाचा जो स्वाद यायचा,
आता प्लास्टिकच्या निर्जीव स्पर्शाने फक्त क्लिक होते
आणि एका पाठोपाठ एक तर
कधी एकमेकावर स्वार होणारी
असंख्य खिडक्यांची झडी लागते...

कधी छातीवर ठेऊन झोपी जात असू...
कधी मांडीवर घेऊन जोजवत असू...
कधी गुडघ्यांचे डेस्क करून वाचतांना
नतमस्तक होऊन त्यावरच माथा टेकत असू ...
पुस्तकांशी जे घट्ट गूळपीठ होतं त्याची चव गेली !

पुस्तकांतून मिळणारी माहिती, ज्ञान एरवीही मिळत राहील...
कदाचित आणखीन सोप्या प्रकारे,
जास्त भरभर, पण...

पुस्तकातून अवचित गवसणारी ती वाळलेली फुले
त्या सुगंधीत चिठ्ठया
ते मधुर चिठोरे...
पुस्तकं मागण्याच्या, पडण्याच्या, उचलण्याच्या मिषाने
बांधले, गुंफले, फुलले जाणारे अनुबंध
त्यांचं आता काय होणार यापुढे...?
तसं काही घडणार नाही...
बहुदा !
--------------------------------------

मूळ रचना...

रविवार, १७ डिसेंबर, २०२३

डिटॉक्स...!

कृत्रिम बुद्धिमत्तेने साकारलेली प्रतिमा 

'स्क्रीन टाईम' फार जास्त होतो या जाणिवेने,
माणसाला बऱ्याच काळात स्वयंप्रज्ञेने सुचलेली,
डिजिटल डिटॉक्सची आयडिया चांगलीच आहे...

पण त्यासोबत, किंवा तत्पूर्वी...

विकासाच्या अविवेकी कल्पना,
उपभोगधर्मी संवेदनाशून्य बाजारमूल्ये
द्वेषमूलक आणि अंधश्रद्ध धार्मिक कट्टरता
पुढे जाण्याच्या शर्यतीने गाठलेला अनावर वेग
दिवसेंदिवस निष्कारण टोकदार होत चाललेल्या अस्मिता
लोकाभिमुख संस्थांचे 'जनहितार्थ' होणारे सरसकट सपाटीकरण
या सगळ्याचा अत्यंत धूर्तपणे वापर करून घेणारे नफ्फड राजकारणी
...आणि ज्या शहाण्यांनी या साऱ्याला वेसण घालावी त्यांचे जाणीवपूर्वक लाभार्थी मौन...

या विषारी व्यवस्थेचेही निर्विषीकरण झाले पाहिजे, करायला हवे !

अन्यथा...
षडरिपूग्रस्त माणसांची व्यवस्थेला फार अडचण होते म्हणून,
एआयने ह्यूमन डिटॉक्स करण्याची वेळ फार दूर नाही...

सजीव सृष्टीच्या इतिहासातले ते ठरेल
पहिले आणि एकमेव...
सेल्फ-एक्स्टिंक्शन...!