मनातले व्यक्त करण्याची खुमखुमी, लिहिण्याची अतोनात हौस आणि हाताशी असलेला मुबलक वेळ एवढ्या भांडवलावर 'इगो-वाईज'च्या रूपाने ब्लॉगिंगचे केलेले धाडस आज १ लाख पृष्ठदृश्ये (व्हिजिटर्स काउंट)च्या दिशेने वेगाने वाटचाल करतेय.
सुचतील आणि रूचतील त्या कविता संग्रहित रूपात कायम आणि सहज उपलब्ध असाव्या म्हणून सुरु केलेल्या या मराठी ब्लॉग 'इत्यादी'चा उद्योग देखील पौगंडावस्थेतून वयात येतांना ५० हजार पृष्ठदृश्ये (व्हिजिटर्स काउंट)चा आकडा पार करून दौडत पुढे निघाला आहे.
सॉक्रेटिसच्या, "The way to gain a good reputation is to endeavor to be what you desire to appear..." या बोधवाचनाच्या प्रचितीसाठी 'बी[अ]कॉज' ही वर्डप्रेस साईट सुरु केली, तिला आजवर ११,६७५ लोकांनी भेट दिली आणि तिथे प्रकाशित केलेली 'उत्तरदायित्व' ही, 'सीएसआर'ची संकल्पना मराठीत समजावून सांगणारी पोस्ट बरीच लोकप्रिय ठरली, 'व्हायरल' झाली का म्हणानात!
याशिवाय, लिंक्डइन या व्यावसायिक समाजमाध्यमावर आजवर प्रकाशित केलेल्या एकूण ३७ पोस्टस् पैकी, 'व्हाय सम एम्प्लॉईज आर रेडी टू डाय फॉर देअर बॉस' या पोस्टने रचलेला १२३४ लाईक्स आणि २३१ कॉमेंट्सचा वैयक्तिक विक्रम, 'आनंद मल्लीगवड' यांच्याबद्दलच्या 'लेक मॅन ऑफ इंडिया' पोस्टवरील २५०००+ इम्प्रेशन्स, ६५०+ लाईक्स १३ रिपोस्ट्स आणि ८ कॉमेंट्स (अँड काउंटिंग...) एवढ्या प्रचंड फरकाने नुकताच मोडला!
सरतेशेवटी, 'रिसर्च गेट' या शोधनिबंधांचे संग्रहण, प्रकाशन करणाऱ्या अभ्यासस्थळावर प्रकाशित केलेल्या २३ निबंधांच्या १४,४४४ वाचनांसह, कर्वे समाजसेवा संस्थेचे प्रतिनिधित्व करणारा सर्वात अधिक वाचला गेलेला लेखक मी आहे असे आकडेवारी सांगते.
आता ही काय मार्च एंडिंगची आकडेमोड चालू आहे की काय असा गैरसमज होऊन माझ्या हिशोबी(?) वागण्यावर शिक्कामोर्तब होण्यापूर्वी या समग्र आकडेवारीच्या मुळाशी यावे हे उत्तम... अन्यथा शेवटी आकडेवारीच सगळ्याच्या मुळाशी येते हे आपण नित्य अनुभवतोच, नाही का? (पहा: जातनिहाय वर्गीकरण आणि तिकीट वाटप यांचा अन्योन्य संबंध)
तर, प्रश्न असा की या सगळ्याने मी काय साधले? म्हणजे मला याचा नेमका बेनिफिट (ऑफ डाउट...?) काय झाला? सुमारे हजारभर पाने लिहून मला जेवढे व्यक्त व्हायचे होते तेव्हढे होता आले का? आतल्या विद्रोही धुमसण्याला काही सर्जक मूर्त रूप देता आले का? या सगळ्या खटाटोपातून जे कमवले (पैशाव्यतिरिक्तही बरंच काही कमवता येतं, किंबहुना शाळेतल्या स्काऊट सारखी तीच खरी कमाई, हे द्रव्यसंमोहित समाजाला कसे कळावे?) आणि जमवले त्याने मी समाधानी आहे का?
तर, हो, निश्चितच! पण आज, या साऱ्याच्या जोडीला, माझ्या निखळ आनंदाचे, अतीव समाधानाचे आणि सार्थक कृतार्थतेचे कारण वेगळेच आहे...
इगो-वाईज या माझ्या पहिल्या इंग्रजी ब्लॉगवर मी 'फादरहूड' सिरीजमध्ये माझ्या पितृत्वाच्या भावनांना वाट मोकळी करून दिली ज्या योगे मैत्रेयीच्या प्रगतीच्या काही टप्प्यांची नोंद झाली. 'बी[अ]कॉज'वर 'मेटॅव्हर्स' मध्ये तिच्या प्रोफेशनल अचिव्हमेन्टची झलक दिसली. शिवाय अधून-मधून तिचा सहभाग, सहयोग असलेल्या राष्ट्रीय सामाजिक कार्यक्रमांची झलकही व्हॉटसऍप स्टेट्सद्वारा मिळत असतेच. त्यामुळे तो वसा तिने समर्थपणे पेलला आहे यात शंकाच नाही.
परवा मात्र तिने जो सुखद धक्का दिला त्याने, 'आज मैं उपर, आसमां नीचे...' अशी उन्मनी अवस्था झाली नसती तरच नवल! एकतर मुळात या बिझी मुलांनी स्वतःहून काही शेअर करायला मुहूर्ताची वाट पहावी लागते आणि जे केले ते थेट असे हृदयाचा ठाव घेणारे असेल तर हर्षवायूच नाही का होणार? तिच्या मम्मीच्या भाषेत, 'हत्तीवरून पेढे वाटण्याची तयारी...!' पण वेळेसोबत पुढे निघून गेलेले काटे टोचलेल्यांनी, रिकाम्या डायलची तुतारी करून ती फुंकायला हत्तीवरून गड (सुतावरून स्वर्गच्या चालीवर!) गाठल्याने आणि आसपासच्या बहुतांश मंडळीत साखरेचा प्रादुर्भाव आढळल्याने, तो मनसुबा 'मना'तच राहिला!
तर ही मुलगी अशीच संध्याकाळी कुठल्या टेकडीवर स्वमग्न अवस्थेत भटकत असतांना तिला काही सुचलं आणि तिने ते शब्दबद्ध केलं... तीच ही काव्यानुभूती... गुलजारांच्या 'दिल ढुंढता है...' बद्दल ऐकलेलंही नसतांना त्याच्याशी थेट नातं सांगणार हे प्रकटन, काव्याच्या व्याख्येबरोबर गजलेशीही इमान राखून असणारं आणि आयुष्याबद्दल चिंतनशील पण तेव्हढंच संवादी भासणारं!
इत्यादीवर अस्मादिकांसह इतरही कुणाचे काही प्रकाशित करतांना इतका परमानंद मला कधीही झाला नसावा. त्याचे कारण केवळ, हा अण्णांचा पुढे चालू रहाणारा वारसा आहे, एव्हढेच नाही तर निव्वळ वंशसातत्यापेक्षा जनुकीय उत्क्रांतीने मनुष्यासह साऱ्याच प्राण्यांचे आणि पर्यायाने सृष्टीचे भले होईल यात मला मुळीच शंका वाटत नाही किंबहुना माझी तशी खात्रीच आहे.
तेंव्हा आपले अधिक प्रगत, अधिक सूज्ञ, अधिक विचारी, विवेकी आणि अधिक संवेदनशील रूप पाहता येणे हेच विकसित होण्याचे प्रबुद्ध लक्षण आहे. अन्यथा महाकाय, सर्वभक्षी, सर्वशक्तिमान डायनासॉरस नामशेष कसे झाले असते?
असो, तर मैत्रेयीची इत्यादीवरची ही पहिली(वहिली) हिंदी/उर्दू कविता/गज़ल...
एक अंजान शहरमें,
एक धुंदलिसी शाममें
कई रोजकी खयालोंसे
कई रोजकी खयालोंसे
कुछ पल के लिये दूर होकर,
मन हीं मनमें गुफ्तगू चलती हैं !वो पल याद आते हैं,
मन के अलमारीयोंमें जो बंद रखें हुए हैं !
वो पल जिसमें सुकून और शांती होती थी
जब हम मासूम और खुश हुआ करते थे,
जब सबके चेहरोंपर नकाब नहीं थे,
जब हम आझाद थे, बंधे हुए थे सिर्फ मनमर्जीयोंसे !
मन के अलमारीयोंमें जो बंद रखें हुए हैं !
वो पल जिसमें सुकून और शांती होती थी
जब हम मासूम और खुश हुआ करते थे,
जब सबके चेहरोंपर नकाब नहीं थे,
जब हम आझाद थे, बंधे हुए थे सिर्फ मनमर्जीयोंसे !
वो पल मिलते नहीं हैं अब,
बस ढुंढता रहता हैं मन उन्हें,
जिंदगीके खामोशीयोंमें…!
बस ढुंढता रहता हैं मन उन्हें,
जिंदगीके खामोशीयोंमें…!
चहाच्या बिलामागे, 'माझं सुखं माझं सुखं हंड्या झुंबर टांगलं, माझं दुःख माझं दुःख तळघरात कोंडलं...' हा बहिणाबाईंचा समग्र मनुष्यजन्माचा अभंग लिहितांना, 'काव्याची दुसरी बाजू व्यवहाराचीच...' असे प्रबोधनही करणाऱ्या वपुंच्या 'पार्टनर'ने, 'साऱ्याच गोष्टींचे विश्लेषण करता येत नाही, करायचे नसते. 'काही' गोष्टींचा निखळ, मनमुराद आनंद घ्यायचा असतो...' असा अत्यंत व्यावहारिक सल्ला 'श्री'ला दिलेला आठवतोय. तो ग्राह्य मानून आज या अभिव्यक्तीचा केवळ आनंद घ्यायचा विचार आहे...
आता याही वारशाची हमी मिळालीय म्हणतांना, तिने तेव्हढं फायनांशियल प्लॅनींगही शिकून घेतलं की पार्टनरची चहाच्या बिलाचा पाठपोट वापर करणारी फिलॉसॉफी सफळ संपूर्ण झाली म्हणायची. मग तिला मार्च एन्डचं टेन्शनही राहणार नाही आणि मी सर्वातून सर्वार्थाने निवृत्त व्हायला मोकळा...
बाय द वे, मुलीने अजूनही काही लिहिलंय असं ऐकतो, बघू या... वाट, ते 'इत्यादी'ला लाभण्याची !