तोंडओळख म्हणजे ओळख नव्हे. ओळख आहे म्हणजे मैत्र असेलच असे नाही. मैत्र जुळले तरी स्नेह वाढेल असे नव्हे आणि स्नेह जोपासला तरी नातं तयार होईलच याची खात्री नाही. तद्वतच केवळ नातं आहे म्हणून माया, स्नेह असेलच असं नाही. नातं असल्याने मैत्र, ओळख असेलच याची खात्री नाही. याऊलट काही ओळखी, नाती ही जवळची, सख्खी नसूनही तिथे नाळ जुळलेली असते. ते संबंध कुठल्याच नात्याच्या, निमित्ताच्या, नियोजनाच्या बांधील नसतात, तिथे फक्त बांधिलकी असते.
बऱ्याचदा विशिष्ट प्रसंगात जवळच्या, सख्ख्या नात्यातल्या, जिवलग मैत्रीच्या व्यक्तींचे वागणे अनाकलनीय वाटते आणि ती ओळख नवीन भासते. आणि अशा वेळी प्रश्न पडतो… हीच का ती व्यक्ती जिला आपण ओळखून आहोत असे आपल्याला वाटत होते…? वेळीप्रसंगी ज्यांची भेट घडते, सहवास लाभतो त्यांची ही कथा तर आभासी माध्यमांवरील काँटॅक्ट्स, कनेक्ट्स, फॉलोअर्स बद्दल न बोललेलेच बरे… त्यातले कित्येक प्रत्यक्ष भेटले तर ठार ओळखू येत नाहीत किंवा ओळख देत नाहीत असा अनुभव आहे!
आज या नात्याच्या विश्लेषणाचे निमित्त म्हणजे आजचा दिनविशेष - भाऊबीज! लौकिक अर्थाने दिवाळसणाची सांगता करणारा भाऊ-बहिणीच्या नात्याचा उत्सव. महाराष्ट्रात आज ‘लाडक्या बहिणी’साठी बकध्यानाचे प्रयोग कितीही जोरात चालले असले तरी त्यामुळे आजच्या दिवसाचे महत्व कमी होत नाही. राजकीय प्रयोगांचे कवित्व ‘वर्षा’अखेरीस संपेल पण मुक्ताई-ज्ञानोबाचे भावबंध कालातीत होते, आहेत आणि राहतील. त्यासाठी भाऊबीजेला अभिजात दर्जा मिळून शासकीय व्हायची गरज नाही.
इगो म्हणजे सर्च फॉर अनडिव्हायडेड अटेंशन आणि हा इगो कागदाला चिकटला की त्याचे सर्टिफिकेट होते… इति वपु. सर्टिफिकेटचे कागद जेवढे जास्त तेवढा इगो मोठा. सर्टिफिकेट्स आणि त्यायोगे येणारा इगो आहे म्हणून माणूस जाणता असेल, सूज्ञ असेल, संवेदनशील किंवा समंजस असेलच असे नाही कारण यातले कुठलेच गुण शिकून येत नाहीत; जाणीवेने जगण्यातून येतात. आमच्या सकल खान्देशची बहिणाबाई शाळेची पायरीसुद्धा चढली नव्हती पण तिच्या जगण्याची जाण बघा…
जगतभगिनी असलेल्या बहिणाबाईंनी त्या काळी अत्याधुनिक मानल्या गेलेल्या जळगावातल्या पहिल्या ‘स्टीम प्रिंटिंग मशीन’, म्हणजे आजच्या संदर्भात सांगायचे तर ‘मशीन लर्निंग’ बद्दल आपल्या प्रगल्भ जाणीवेतून आणि काळाच्या पलीकडे पाहणाऱ्या द्रष्ट्या नजरेतून जो विचार मांडला आहे तो आजच्या किती सुशिक्षित, उच्चशिक्षित तथा उच्चपदस्थ, शीर्षस्थ नेतृत्वांच्या पचनी पडेल सांगणे कठीण आहे.
कोरा कागद देखील त्यावर उमटलेल्या शब्दांमुळे शहाणा होतो आणि इगो चिकटलेले कितीही कागद साठवून माणूस कसा ‘येडजाना’ राहतो ही कल्पनाच किती हृद्य आणि ही जाणिव किती मनोज्ञ आहे... सकल मानव्याच्या विश्वाचे आर्त ज्यांच्या मनी प्रकाशले अशा संत ज्ञानदेव-मुक्ताई ही भावंड आणि त्यांची परंपरा चालविणाऱ्या, सकल जनांची बहिणाबाई यांची ही कालातीत भाऊबीज आजच्या मुहूर्तावर !