शुक्रवार, २४ जून, २०११

चाकोरी...?!?


आडवाटेने चालतांना या

चाकोरी तर कधीच मोडली...

रस्ता काटेरी अन सूर्य माथ्यावर

त्यात सावलीनेही साथ सोडली...!

गुरुवार, २३ जून, २०११

भान...!


इथल्या एकटेपणात आहे

एक सुप्त समाधान...

गर्दीत आपल्या भूमिकेचं

ठेवावं लागतं भान...!

मंगळवार, २१ जून, २०११

मुग्ध...!?!


कोण म्हणत अश्रूंना

स्वत:ची भाषा नसते...

रडण्याला सांत्वनाची

मुग्ध अभिलाषा असते...!

सोमवार, २० जून, २०११

आज...!?!


निरव शांतता फक्त

समुद्राची हि गाज...

मन नाही थाऱ्यावर

अन पापणी का लावतेय आज...!

शुक्रवार, १७ जून, २०११

बंदिश...!?!


प्रत्येकाच्या वेदनेची

तार जरा वेगळी आहे...

षडज एकच लागला तरी

बंदिश मात्र आगळी आहे...!

गुरुवार, १६ जून, २०११

व्यवहार...?!?


मनाची कविता होतांना

व्यवहारसुद्धा यावा लागतो...

रात्रीला रात्र भेटण्यासाठी

मध्ये दिवस जावा लागतो...!

बुधवार, १५ जून, २०११

लय...!?!


सुरावटीतली लय ऐकून

जो तो म्हणाला वाsवा

तारांवर पडलेला ताण

त्यांना कसा कळावा...!

मंगळवार, १४ जून, २०११

हिशोब...!?!


आयुष्याचे दिवस मोजतांना

ते रात्रींना सहज टाळतात...

दिवसातले हिशोब मग

रात्रींना गाठून छळतात...

सोमवार, १३ जून, २०११

शुभेच्छा...!?!


तुला काही लिहावे तर

विचार सारे लपून बसतात

भावनांचे मोकाट वारू अन

शब्द मात्र जपून असतात...!

रविवार, १२ जून, २०११

मैत्र...!?!


मैत्रीत तरी हिशोब नसतील

अस उगाच वाटलं होत...

कधीपासून विणतोय ते वस्त्र

आधीपासूनच फाटलं होत...!