सोमवार, २० ऑक्टोबर, २०१४

कलाकुसर…!

घरात उपलब्ध असलेल्या साधनांतून आकाशकंदील बनविण्याचे ठरविले… 
अभ्यासपूर्ण विश्लेषण आटोपल्यावर खालील सांगाडा तयार झाला…


माझी बांधणी पूर्ण झाल्यावर सुशोभित करण्याची जबाबदारी नेहमीप्रमाणे सौंदर्यशास्त्र पारंगत प्रभृतींनी स्वीकारली आणि यशस्वी रित्या पार पाडली…
 

कैमेऱ्यास तिसरा डोळा मानून कशाचेही मनसोक्त फोटो काढण्यात पटाईत असलेल्या कन्येने प्रकाशमान झालेल्या आकाशदिव्याचे क्षणचित्र केले…

  

शून्य खर्च आणि अगणित आनंद देऊन आमच्या टेरेसला शोभा प्राप्त करून देणारा स्वहस्ते बनविलेला आमचा घरगुती आकाशकंदील…!

 

तेजोमय उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. ही दिवाळी आपल्या आयुष्यात 
सुख-समृद्धी-शांती-समाधान घेवून येवो हीच प्रार्थना…!

रविवार, १९ ऑक्टोबर, २०१४

धग...!


मेल्यावरही उरेल माझी
गूढरम्य सावली एवढी
धग माझ्या चीतेचीही
पोळेल जगास जेवढी…!

शनिवार, १८ ऑक्टोबर, २०१४

मात...!

 

आधुनिक महाभारतातही
निश्चित अभिमन्यूची मात
कितीही पुढारली तरी
मागासच मनुष्य जात…!

शुक्रवार, १७ ऑक्टोबर, २०१४

दुभंग...!

 

जगण्याचे स्वप्न हरवते
नात्यांची पोत जपतांना
मनाची नित्य कुचंबणा
रूढ प्रवाहात लपतांना…!

मंगळवार, १४ ऑक्टोबर, २०१४

सूत्र..!


'त्यांच्या भविष्यासाठी करतो सगळे' 

हेच मूळ सूत्र न साऱ्या धकाधकीचे…?

मग, मतदान सोडून, जाणीवेने टाळा

बेजबाबदार भटकणे फुकाफुकीचे…!

रविवार, १२ ऑक्टोबर, २०१४

शुक्रवार, ३ ऑक्टोबर, २०१४

विजय दिन...!

सुष्टांचा दुष्टांवर
सत्याचा असत्यावर
विवेकाचा क्रोधावर
मांगल्याचा अमंगलावर
…विजय दिन

दुर्गेचा महिषासुर वध 
मातेचे स्वगृह आगमन 
पांडवाचा अज्ञातवास संप्पन्न 
कौत्साची गुरुदक्षिणा अर्पण 
…घडले तो सुदिन
 
आंब्याची तोरणे…
रांगोळीचे सजणे…
सरस्वती पूजणे…
आपट्याची पाने…
अन साजरे सिम्मोलंघन!
 

 विजयादशमी तथा दसऱ्याच्या मंगल शुभेच्छा…!

बुधवार, १ ऑक्टोबर, २०१४

अर्थ...!

 

असे बदलावे वारे की
जगण्यास अर्थ यावा…
असण्याचे भान येता
व्यवहार व्यर्थ व्हावा…!

सोमवार, २९ सप्टेंबर, २०१४

तर्कट...!

 

भविष्याच्या विस्तीर्ण पंखांना 
खेचते मागे भूत…
न-भूतो-न-भविष्यती तर्कांनी
कापते गळा सूत…!

रविवार, २८ सप्टेंबर, २०१४

धांडोळा...!

 

वारे असे भणाणले की
तारू भरकटले असते…
धुके असे दाटले की
रस्ते धुरकटले असते…

भोके अशी पडली की
इतुकेही साठले नसते…
धारेस भलत्या लागता
किनारेही गाठले नसते…

जगण्याची मौज अशी
हसू आसवांना फसते
मागे वळून पाहता
नियती नशिबाला हसते…!