शनिवार, २५ ऑगस्ट, २०१२

अलवार...!

 
माझे असणे माझे गाणे 

माझे तगणे माझे फुलणे

अवचित सुर्हुदांच्या सदिच्छेने

माझे उमलून अलवार होणे...!

रविवार, ५ ऑगस्ट, २०१२

ऋतू...!


ऊन पावसाचा खेळ

हिरव्या रानोमाळी

उपजीविकेचा ऋतू

उन्मेषांच्या भाळी...!

सोमवार, ३० जुलै, २०१२

घाव...!


कल्पनेच्या पंखांना

स्वप्नांचा गाव हवा

टळटळीत  वास्तवाला

ठसठसणारा घाव नवा...!

रविवार, १५ जुलै, २०१२

कोंब...!


आदिम भुकेचा डोंब

जणू सर्वत्र दाटलेला

अस्फुट तृषार्त कोंब

अन वर्षाव आटलेला...!

मंगळवार, १० जुलै, २०१२

अपरोक्ष...!


चुकण्याला अंत नाही

शिकण्याला नाही क्षती

प्रज्ञेच्या अपरोक्ष

मनोज्ञ मूढ मती...!

रविवार, २४ जून, २०१२

क्षणार्ध...!


सरत्या क्षणाची हुरहूर

येत्या क्षणाची अपेक्षा

गेला कुठे 'हा' क्षण

क्षणार्ध जगण्याची उपेक्षा...!

शनिवार, १६ जून, २०१२

न्यास...!


जगण्याच्या उर्मीला

तगण्याचा ध्यास हवा

मूल्यार्थाच्या गणिताचा

सोयीस्कर न्यास नवा...!

बुधवार, १३ जून, २०१२

चिंब...!


ओथंबल्या गर्भरेशमी

मेघुटाला अनवट कडा

पावसाच्या चाहुलीने

चिंब आठवणींचा सडा...!

सोमवार, ११ जून, २०१२

रानभूल...!


तू तत्व मी माया

तू ब्रह्म मी काया

तू सूक्ष्म मी स्थूल

तू पूर्ण मी रानभूल...!

रविवार, १० जून, २०१२

दंभस्फोट...!


माती शुष्क दाणा दुर्लभ

तहानला पाण्याचा घोट

विषमतेचा बाजार नग्न

होऊ दे एकदा दंभस्फोट...!