शुक्रवार, ३१ मे, २०१३

मस्ती...!

 

जगणे सोपे झाले असते

हरघडी थोडे वाकून

मोडण्याची नडली मस्ती

वांझ पौरुष राखून…!

शनिवार, २५ मे, २०१३

विभ्रम...!

 
जगणे फुलून यावया
 
जाणीवांनी गहीरे व्हावे
 
विभ्रमांनी उन्मळून
 
विषादांना बहिरे व्हावे…!

शुक्रवार, २४ मे, २०१३

गुंतागूंत...!

 

वेगळे, विरक्त आणि गढूळ

घडते काही नक्की आहे…

माझ्या असण्याची गुंतागूंत

आणि त्यांची घडण पक्की आहे…!

बुधवार, २२ मे, २०१३

शर्थ...!

 
किनारा क्षितिजापल्याड
 
अन दर्या उधाणलेला
 
कागदी होडी, शीड बेगडी
 
शर्थीचा पण दोर ताणलेला...!

रविवार, १२ मे, २०१३

जोखड...!


माझ्याच जाणीवांना
शब्द जड होतात…
…की त्यांच्या संवेदना
जोखड होतात?

हिशोबात बसविणे
फसले तर…
नात्यांचे ताटवेही
शुष्क दगड होतात…?

मंगळवार, ७ मे, २०१३

मानभावी...!

 
कितीदा वाटले विचारावे,
 
नेहमीच कसे हो खुशीत…
 
एवढे मानभावी जगणे
 
घडते तरी कुठल्या मुशीत…?

बुधवार, १ मे, २०१३

संतत...!

 
 
संतत या प्रवाहात
 
थांब्याचा पत्ता नाही
 
मी थांबलो तरी
 
सावली खळाळत वाही…!

गुरुवार, ११ एप्रिल, २०१३

चैत्र-पहाट...!

 
चैत्र-पहाट उमलता
 
गुढी उभी आभाळी
 
लिंब लोणाचा शृंगार
 
धुंद आंब्याची नव्हाळी…!

बुधवार, १० एप्रिल, २०१३

सर्वसाक्षी...!

 
भोगण्याची वल्गना
वल्गनेचा विकार
विकारातून विनाश
तत्वभक्षी...
 
जगण्याची कल्पना
कल्पनेचा विचार
विचारातून साकार
सर्वसाक्षी...!

मंगळवार, ९ एप्रिल, २०१३

आरक्त...!

 
घातक संग
विकृतींचा
निस्संग रहाया
विरक्त व्हावे…
 
विखारी रंग
उत्कर्षाचा
विवेक डांबून
आरक्त न्हावे…!