रविवार, २९ जानेवारी, २०१७

मन माझे...!


चन्द्र हसला होता गालात
अन चांदणे सांडले होते...
मन माझे माझ्याशी तेव्हा,
करवादून भांडले होते...!

आठवांचा पूर येता
वेदनेचा डोंब उसळला...
हिशोब न जाणताच मी,
गणित प्रेमाचे मांडले होते...!

...मन माझे माझ्याशी तेव्हा,
करवादून भांडले होते...!

सुखाचे वावडेच असावे
असे माझे जगणे नव्हते
जवाएवढ्या सुखाला माझ्या
पण जाणिवेने कांडले होते...!

...मन माझे माझ्याशी तेव्हा,
करवादून भांडले होते...!

शनिवार, २८ जानेवारी, २०१७

प्रजासत्ताक ...!


सांभाळतो हरेक येथे
अस्मितेचा षंढ माज
सनातनी ठरतो ज्याला
राष्ट्रप्रेमाची दैवी खाज...

प्रजासत्ताक म्हणून लेवतो
निवडणूकीचा भरतारी साज II

जातीच्या तप्त तव्यावर
आपापली पोळी भाज
अस्वस्थ वर्तमानास शोभे
लोकशाहीचा जंगलराज...

प्रजासत्ताक म्हणून लेवतो
निवडणूकीचा भरतारी साज II

त्यांच्या निवडीस ना मूल्य
पण 'हिंद'पे वांझोटा नाज
ना गांधी कामास ये आता
स्वात्यंत्रवीर गुमनाम आज...

प्रजासत्ताक म्हणून लेवतो
निवडणूकीचा भरतारी साज II

संस्कृती न राखू आम्ही भले
राखू प्रतिष्ठेचा बेगडी बाज
कर्म न ये कामास आमच्या
शोभतो पण लांच्छीत ताज...

प्रजासत्ताक म्हणून लेवतो
निवडणूकीचा भरतारी साज II

स्वार्थाच्या कारणास आम्हा
ना भय ना कसली लाज
सगळे त्याज्य पचवूनीही
समुद्र ना विसरतो गाज...

प्रजासत्ताक म्हणून लेवतो
निवडणूकीचा भरतारी साज II

कधी 'साहेब' तर 'भाई' कधी
आम्हांस ना निषिद्ध व्याज
दुनियादारीच्या पखालीने
तू संस्कृतीस 'श्रीजल' पाज...

प्रजासत्ताक म्हणून लेवतो
निवडणूकीचा भरतारी साज II

रविवार, १५ जानेवारी, २०१७

उत्कट...!


परवा संध्याकाळी संदीप, वैभव आणि मिलिंदने चालू केलेली इर्शादची मैफिल, संक्रांतीची सकाळ उजाडली, मानवी आयुष्याच्या भाष्यकारांनी माझ्या आयुष्याचं सार्थक करण्याच्या व्रताला जागून जगभरातले बोधामृत माझ्यावर व्हॉटसपले आणि सूर्यदेवाच्या संक्रमणानी निसर्गात होणाऱ्या मनोहारी बदलांपेक्षा माझ्या बोलण्यात माधुर्याची अतार्किक तथा असंभव अपेक्षा केली; तेव्हा देखील बॅकग्राऊंडला सुरुच होती. संक्रात सरून मरगळलेला निवांत रविवार देखील आवरतं घेतोय आणि अंगावर येऊ घातलेला सोमवार दटावतोय तरी '...ये जो मनकी सीमा रेखा है...' चालूच! मग तोच धागा पकडून, कोळशाच्या खाणीत हिरा सापडतो म्हणतात तसे, रोज सकाळी (आणि प्रसंगी भक्क दुपारी, कातर संध्याकाळी आणि अवचित मध्यरात्री अवघड क्षणी देखील!) बरसणाऱ्या हितेच्छूकांच्या मेसेजेसच्या भाऊगर्दीत (इतके लोक माझे भले होण्यासाठी अहोरात्र धडपडत असतांना ते होत का नाही...? कलियुग दुसरे काय!) कधी कधी खणखणीत, बावनकशी, प्रच्छन्न, उत्कट, अनाघ्रात असा गद्य विचार किंवा पद्य विकार (पद्यात विचार नसतो असे जाणकार सांगतात!) सापडतो आणि त्याच्या धन्याचा थांग लागत नाही तेव्हा येणारी अस्वस्थता ही, कवितेची शेवटाची ओळ न सुचण्याच्या हुरहुरीपेक्षा कणभरही कमी नसते. 

गेल्या आठवड्यात, मला माणसात आणण्याचे असिधारा व्रत घेतलेल्या करुणाष्टकाने मला धाडलेल्या एका 'असे वाटते आजकाल...' शी भावबंध सांगणाऱ्या कवितेने झोप उडवली होती. संक्रमणाच्या निमीत्ताने त्या महाभागाला गाठायचा चंग बांधला आणि 'गुगल' दिमतीला असतांना किती वेळ गुलदस्त्यात रहाणार होते बच्चमजी! 'शतानंद' असे शिगोशीग पारमार्थिक नाव धारण करून ब्लॉगणारं हे बेणं वयाने आमच्यापेक्षा लहान भासूनही, प्रकाश संत ते आयन रँड व्हाया नेमाडे मास्तर असं सरळ वळणाने भेटल्यामुळे, 'बाकी शून्य'चा आणखी एक पंखा दृगोच्चर झाला आणि यात्रेत हरवलेला लंगोटी यार सापडावे तसे झाले.... गेल्या वर्षीची संक्रांत वैभवच्या '...तुम्ही व्हॉट्सऍपवर आहात ना... मग मी तुमचा आहे!' ने साजरी केली होती; यंदाची संक्रांत (जी 'तिळकुटी(?) चतुर्थी' पर्यंत लागू असते... इति करुणाष्टकं, आमची टाळकुटी अमावस्या आमरण लागू असते!), हे काला धन ऐवजी जे गुप्तधन सापडले आहे त्याच्या नावे... जाणकार आणि जिज्ञासूंनीं 'शतानंद'ला जरूर भेट द्यावी पण स्वतःच्या जबाबदारीवर! पुलंच्या भाषेत 'शरीराप्रमाणे मनावर देखील कोड असणारी...' आणि मंगूमामांच्या भाषेत 'स्पिरिच्युअली कॉन्स्टीपेटेड' अशा 'भाषा शुचिता'वाले विद्वान आणि फालतूगिरी करून हसणे अब्राह्मण्यम मानणाऱ्या जमातीने शक्यतो तिकडे फिरकू नये. मराठी भाषेचा गोडवा तिथे भलत्याच ठिकाणहून पाझरतांना पाहून नाक मुठीत धरायची वेळ यायची... तेव्हा सांभाळून!

तर कालच्या मकर संक्रांतीच्या शुभेच्छा 'शतानंद'च्या या ओळीतून...

एखाद्या रात्री कधीतरी जमा होतात सावल्या,
गरम होतात डोळे नि तडतडतात बाहुल्या..
मुक्यानेच सांगू लागतं दुखलेलं पाणी, 
इतकं हळवं चुकूनसुद्धा असू नये कोणी..

गाऊ नये कोणी कधी उदास उदास गाणी,
कळावीत सारी दुःखं इतकं होऊ नये ज्ञानी..
वाचूच नये मुळात कुठलं जाडजूड पुस्तक,
विचारांपासून शक्यतो दूर ठेवावं मस्तक..

जशी नजरेस दिसतात तशीच पहावीत चित्रं,
जसे आपल्याशी वागतात तसेच समजावेत मित्र..
उगाच फार खोल आत नेऊ नये दृष्टी,
खऱ्या समजाव्यात साऱ्या सुखांताच्या गोष्टी..

पेनाच्या जिभेवरच सुकू द्यावी शाई, 
फार त्रास होईल असं लिहू नये काही..
हळवं बिळवं करणारे मुळात जपूच नयेत छंद,
करून घ्यावीत काळोखाची सगळी दारं बंद..

सायंकाळी एकटं एकटं फिरू नये दूर,
समुद्रकिनारी लावू नये आर्त, उत्कट सूर..
चालू नये सहसा फार ओळखीची वाट,
भेटलंच अगदी कुणी तर मिळवावेत हात..

जमल्यास चारचौघात बघावं थोडं मिसळून,
लहान मुलासारखं कधीतरी भांडावं उसळून..
आवडणार नाही पंचमीच्या चंद्राची कोर,
एवढंसुद्धा कोणी कधी होऊ नये थोर..

घट्ट घट्ट बसलेल्याही सुटतातच गाठी,
कपाळावर म्हणून सारखी आणू नये आठी..
साकळू देऊ नये फार खोल खोल रक्त,
कुणापाशीतरी नियमित होत जावं व्यक्त..

माणसांचं मनास लावून घेऊ नये फार,
होऊ द्यावा थोडा हलका त्यांचासुद्धा भार..
तुटून जावीत माणसं एवढं पाळू नये मौन,
वरचेवर करत जावा प्रत्येकालाच फोन..

ठेऊ नये जपून वहीत पिंपळाचं पान,
साध्यासुध्या गोष्टीत असा गुंतवू नये प्राण..
जमा होत राहील सारखा पापणीआड थेंब, 
इतकंसुद्धा मन लावून करू नये प्रेम..

श्वास घेणंसुद्धा अगदीच वाटू लागतं व्यर्थ,
शोधत बसू नये म्हणून जगण्याचा अर्थ..
वाटलं जर केव्हा सगळं सगळं आहे शून्य,
आहे हे असं आहे हे करून घ्यावं मान्य..” 

इतकं समजावूनसुद्धा जमा होतात सावल्या,
गच्च गच्च होतात डोळे, थरथरतात बाहुल्या..
आतून आतून सगळ्याचीच मग येत राहते चीड,
दिवस जितका सुटसुटीत तितकीच रात्र गिचमीड...

जियो यार, शतानंद... शत प्रतिशत 'आनंद'... ऋषीदा आणि गुलज़ारांचा!
भेटू म्हणे कधी तरी... तोवर तिळगुळ घ्या आणि खरं खरं बोला!

रविवार, १ जानेवारी, २०१७

शनिवार, ३१ डिसेंबर, २०१६

शुक्रवार, ३० डिसेंबर, २०१६

मी मरणावर हृदय तोलले...


आज मंगेश पाडगांवकरांचा प्रथम स्मृतिदिन... कितीही अविश्वसनीय वाटत असलं तरी काळाची पावले कोण रोखू शकलंय... त्यांच्याच अजरामर शब्द सुरांनी त्यांना आदरांजली...!
अशी पाखरे येती, आणिक स्मृति ठेवुनी जाती
दोन दिसांची रंगतसंगत, दोन दिसांची नाती ॥ ध्रु ॥

चंद्र कोवळा, पहिला वहिला, झाडामागे उभा राहिला
जरा लाजुनि, जाय उजळुनी, काळोखाच्या राती ॥ १ ॥

फुलून येता फुल बोलले, मी मरणावर हृदय तोलले
नव्हते नंतर, परी निरंतर, गंधित झाली माती ॥ २ ॥

हात एक तो हळु थरथरला, पाठीवर मायेने फिरला
देवघरातिल समईमधुनी, अजून जळती वाती ॥ ३ ॥

कुठे कुणाच्या घडल्या भेटी, गीत एक मोहरले ओठी
त्या जुळल्या हृदयांची गाथा, सूर अजुनही गाती ॥ ४ ॥

रविवार, २५ डिसेंबर, २०१६

व्याज...!


मनी आर्त विश्वाचे
डोळ्यात स्वप्नं वेडी...
पंख गरुडाचे अन 
पायात गंजली बेडी...!

हात बांधलेले तरी
हृदय सतार छेडी...
नागरी घुसमटीत
स्वप्नी नित्य खेडी...!

बुद्धी जखडलेली
मन पाखरं येडी...
जन्मूनी संचिताचे
कर्म व्याज फेडी...!

रविवार, २० नोव्हेंबर, २०१६

लढा...!


हार जीत ठरविण्याचे इथे
बदलले आहेत निकष काही...
दिसली ती फक्त झलक होती
त्वेषाने मी अजून लढ़लोच नाही...!

ज्या शिड्यांवरून गडगडली
माडी कचकड्याच्या दिखाव्याची...
भुलवले कितीदा मलाही, पण
पायरी ती मी कधी चढलोच नाही...!

गळून पडले उत्सवी मुखवटे अन
उसवली वीण जी विरलीच होती...
बेगडी सजावटीतून मिरविण्या
मी मुखवट्याआड दडलोच नाही...!

शस्त्र परजावीत त्यांनी आता
जी कोकरांचा काळ होती...
त्यांच्या वाराने जायबंदी होईल
इतका ठिसूळ मी घडलोच नाही...!

बुधवार, ९ नोव्हेंबर, २०१६

On a Different 'Note'...


यंदाच्या वर्षी बाप्पाने गाऱ्हाणे ऐकले म्हणायचे... 

ये रे ये रे पावसा 
तुला देतो पैसा 
पाऊस आला मोठा 
पैसा झाला खोटा...!

रविवार, ३० ऑक्टोबर, २०१६

आयुष्य...!

बरोब्बर एक वर्षापूर्वी, ३० ऑक्टोबर २०१५ ला मी फेसबुकवर हे पोस्ट केले होते. प्रदीप रस्से सरांच्या सौजन्याने ते आज पुन्हा जिवंत झाले. आज पुन्हा वाचतांना त्याचे प्रयोजन व कालसापेक्षता कमी होण्याएवजी वाढलेली जाणवली आणि प्राणसखा, मित्रबंधू कुमार याने पाठवलेल्या शांताताई शेळकेंच्या एका विचक्षण निरीक्षणासह त्याची इत्यादीवर स्थापना करण्याची इच्छा झाली... 

अंगावरचा पालवीचा निरर्थक पसारा सावरीत,
झाडाची मुळे वर्षानुवर्ष जातच असतात खोल... 
स्वीकारतात अटळपणे भुई खालचे जगणे अदृश्य,
चाचपतात अंधार, मिळेल ती शोषून घेत ओल... 

झाड मोहरते, थरथरते, डवरते, झडतेही... 
शहाणे यालाच आयुष्य म्हणतात कि काय...?

 
दि. ३० ऑक्टोबर २०१५ - फेसबुक पोस्ट

गिरीशच्या विनंतीवरून काही लिहितोय म्हटले तर अर्धसत्य ठरेल… गिरीशची विनंती निमित्त (की impetus) झाले एवढे निश्चित! मी डेली मेल नावाचा एक उपक्रम काही काळ चालवला हे आपणांस विदित आहेच. अशाच काही कारणांनी मी तो थांबवला तेव्हां काही 'निवडक' लोकांनी माझी विचारपूस केली आणि माझा हेतू साध्य झाला! त्यानंतर मी ब्लॉग, सोशल मिडिया, ई-पेपर अशा माध्यमातून प्रकटत राहिलोच, कुणी बघो न बघो, कुणी वाचो न वाचो, कुणी लाईको न लाईको, कशाचीच पर्वा न करता. हे उद्योग मी का चालवले आहेत त्याची मला उमगलेली ३ कारणे फक्त शेयर करतो (हल्ली काहीही करण्यापेक्षा 'शेयर' करणे जास्त महत्वाचे आहे आणि आपल्या कुठल्याही कृतीच्या सर्वव्यापी आणि दूरगामी परिणामांपेक्षा त्यावरील 'लाईक्स'च्या संख्येचे वजन जास्त भरते, ते असो) त्याचे आपण अनुसरणच काय लाईक नाही केले तरी चालेल…!

'मि. शिरीष, तुम्ही लिहिता एव्हढ पण वाचत का कुणी?' असा प्रश्न विचारणारे डॉ. कणेकर जरी मला लाभले नाही तरी प्रश्नाची भेदकता कमी होत नाही. पण ती दुर्लक्षून मी लिहिता राहण्याची गुपिते अशी -
१. लिहिल्याशिवाय मला स्वस्थ झोप लागत नाही. शेरपा तैन्सिंगला कुणा विक्रमचक्रमाने विचारले 'तुम्ही एव्हरेस्ट वर पुन्हा का जाता?', शेरपा उत्तरला 'तो तिथे आहे म्हणून!' चार्लीने त्याच्या शेवटच्या काळात खूप वाईट परिस्थितीत सिनेमे काढले. त्याची मैत्रीण त्याला म्हणाली 'तू हे कशासाठी करतोयस?' चार्ली म्हणाला 'माझ्या रक्तातून सिनेमा वाहतो!' पेलेला त्याच्या आयुष्यातला पहिला मानधनाचा चेक मिळाला तेव्हा त्याचा विश्वास बसेना. तो उद्गारला 'म्हणजे मला फुटबॉल खेळण्याचे पैसे पण मिळतील? मला तर खेळण्यातच पुरेसा आनंद मिळतो!' तात्पर्य, तुलसीदासाने सुद्धा रामायण 'स्वान्त सुखाय' लिहिले असे तो पहिल्याच पानावर जाहीर करतो…!
२. जगणे ही क्षणांची कणाकणाने घडत जाणारी अखंड माळ आहे. प्रत्येक क्षण दुसऱ्यापेक्षा वेगळा आहे पण सुटा नाही. वयोमानानुसार स्मरणशक्ती क्षीण होत जाईल तेव्हा चांगल्या प्रकारे जगलेले पण आठवू न शकणारे क्षण सगळ्यात जास्त त्रास देणार, वाईट आठवणी जाता जात नाहीत… अगदी स्मृतिभ्रंश झाला तरी! माणूस मूलत: आशावादी असतो आणि लिहितांना तो विचक्षण दार्शनिक (निदान स्वत:पुरता) होतो. तेव्हा प्रचारकी साहित्य प्रसाविणार्यांव्यतिरिक्त इतर माणसे चांगल्या विचारांच्या, चांगल्या आठवणींच्याच नोंदी ठेवतात असे निदर्शनास येते. तेव्हा अशा लिखाणायोगे अगदी विश्रब्ध शारदेची उपासना जरी होऊ शकली नाही तरी साहित्यभांडारात सर्वतोपरी भर पडतच असते. शिवाय लेखनमूल्य, साहित्यिक दर्जा, भाषेची समृद्धी वगैरे गोष्टींचा उहापोह करण्यासाठी समीक्षक मंडळी आहेतच की. त्याचीही चिंता आपणच केली तर त्यांना काय काम?
३. लेखनाचे पहिले काम अविष्कार (व्यक्त होणे), दुसरे संवाद (इतरांबरोबरच स्वत:शीही) आणि तिसरे पाळत (जागल्या बनून पहारा ठेवणे). Writers are the conscious-keepers of the society. रोजच्या धकाधकीच्या जीवनात समाजाला बऱ्याचदा (प्र)गतीची झापड आल्याने चांगले-वाईट, नीती-अनीती, वैध-अवैध, इष्ट-अनिष्ट याची चाड रहात नाही किंवा जाण होत नाही. अशा प्रसंगी केवळ लेखकच पंचाच्या तटस्थ भूमिकेतून प्राप्त परिस्थितीचे निर्हेतुक, निष्पक्ष परिशीलन करून मार्ग दाखवू शकतो. तो मार्ग चोखाळायचा किंवा नाही हा सर्वस्वी समाजाच्या परिपक्वतेवर अवलंबून असलेला समाजाचा निर्णय असला तरी म्हणून लेखन होतच रहायला हवे. अगदी काहीच नाही तर पुढल्या काळातील इतिहास संशोधकांना या काळातील समाजाच्या अभ्यासाची काही साधने मिळतील.

असो. ललित लिखाण खूप झाले. पण मला पर्याय नाही, माझ्याकडे परत करायला म्हणून देखील एकही पुरस्कार नाही (येत्या काळात 'औषधालाही' चे समृध्द रूप म्हणून 'परत करायलाही' रुजणार आहे म्हणतात) तेव्हा मला व्यक्त होण्यासाठी लिहिण्याशिवाय तरणोपाय नाही. आपल्याकडे असल्यास (पर्याय, पुरस्कार नाही) त्याचाही प्रयोग करून पहावा आणि फसल्यावर सत्वर पुन:र्लीखाण सुरु करावे ही सदिच्छा!

टिकटिकच्या प्रतीक्षेत आणखी एक अमूक...!