सोमवार, ३१ डिसेंबर, २०१२
आरभाट...!
आदिम या उर्मीला
नाही अंत नाही थांग
आरभाट जाणिवांची
वांझोटी सुस्त रांग...!
सोमवार, २४ डिसेंबर, २०१२
शिखंडी...!
एकेका श्वासाची किंमत
मोजतो भीष्म प्राण फुंकून
पट त्यांचा, त्यांचेच फासे
जातो शिखंडीच जिंकून...!
बुधवार, १९ डिसेंबर, २०१२
पिंड...!
अपराधांना क्षमा नाही
अप्रियतेची तमा नाही
पिंडापासून नाही मुक्ती
सापेक्ष-वृत्ती यमा नाही...!
गुरुवार, १३ डिसेंबर, २०१२
सतार...!
नादब्रह्म झंकारता
स्वरांना शब्दभार
मैफलीत समाधिस्थ
मुग्ध अबोल सतार...!
शनिवार, ८ डिसेंबर, २०१२
कधी...!
झाडाला ओढ नभाची
पण मूळ गुंतले भूमीत
जगावे उन्मुक्त कधी
झुगारून कुंथणे सीमित...
कधी शाल ओसाड रानाची
उधाण सागराने ल्यावी
उसासल्या उन्हा चिंबण्या
बरसात चांदण्यांची व्हावी...
बदकाने सोडून तळे
घ्यावी एक गरुड भरारी
केशरी सांज सजावी
कधी रखरखीत दुपारी...
सौद्याने शोधावी सावली
कवितेच्या विभोर कुशीत
जगण्याला मिळावी मुक्ती
अलवार फुलाच्या मुशीत...
सोडावी एकदा निवांत
कधी आठवणींची चंची
सरड्याने बघावी मोजून
उन्नत गगनाची उंची...
जगण्याचे होता ओझे
स्वप्नांच्या गावा जावे
चकोराच्या चोचीने गीत
कैवल्य चांदण्यात गावे...
विश्वाचा साऱ्या व्हावा
कधी मोरपिसारा छान
कविता मिटता कधी यावे
अवचित जगण्याचे भान...!
बुधवार, ५ डिसेंबर, २०१२
भोग...!
शिकावे अलिप्त राहणे
की सोडावी आसक्ती
तगण्याचे भोग अटळ
जगण्याची ना सक्ती...!
रविवार, २ डिसेंबर, २०१२
ध्यान...!
एकेक ठोका घडवीत गेला
ध्यान माझे जे साकारले
माझा होतोच कधी मी...
भान जगण्यानेच नाकारले!
शुक्रवार, ३० नोव्हेंबर, २०१२
उत्कट...!
बोलणे म्हणजे संवाद नव्हे
सहवास साथ होत नाही...
सूज्ञ समंजस जाणीवेला
उत्कट मौनही अर्थवाही...!
गुरुवार, २९ नोव्हेंबर, २०१२
विहंग...!
केकाटते लपविण्या भिती,
भ्रमित टोळी वटवाघुळांची
तो गरुड विहंग-विहारी
मोजतो उंची आभाळांची...!
बुधवार, २८ नोव्हेंबर, २०१२
स्वसंवादी...!
संमिश्र या जगण्याची असाध्य ही कला,
संदर्भांच्या अवकाशात विभ्रम विसंवादी...
मुक्यांच्या कोलाहलात एकांत कावलेला,
रीतीच्या उपचारात निर्मम स्वसंवादी...!
सोमवार, २६ नोव्हेंबर, २०१२
जन्मखूण...!
दु:खाची भुणभुण
सुखाची रुणझुण
नि:संग विरक्तीला
छळणारी जन्मखूण...!
शनिवार, २४ नोव्हेंबर, २०१२
अमूर्त...!
ओथंबल्या श्वासास बिलगून
जगतो उन्मनी झुरण्यात
कसे समजावे मर्त्य जगाला
काय सुख अमूर्त उरण्यात...!
सोमवार, १९ नोव्हेंबर, २०१२
स्फुल्लिंग...!
स्फुल्लिंग पोचता नभी
आकाशही भगवे झाले
मेघांचे करूण हास्य
सूर्यबिंबात निमाले...!
रविवार, १८ नोव्हेंबर, २०१२
अनाथ...!
...मर्मग्राही दृष्टी अमोघ वाणी
विचक्षण वृत्ती निर्भीड
बाणा
अनाथ करुनी मराठी मनाला
निघोनी गेला एक वाघ ढाणा...
मंगळवार, १३ नोव्हेंबर, २०१२
स्वर्गीय...!
पहाटवारा
तेल-उटण्याचा सुगंध
सनईचे सूर... भूपाळीचे
मखमली स्पर्श
स्वर्गीय अभ्यंग
अलवार तनमन... नव्हाळीचे
सौख्याची चाहूल
लक्ष्मीचे पाऊल
तोरण आंब्याच्या... डहाळीचे
रांगोळीसवे
झेंडूच्या माळा
मनी फुले बन... बकुळीचे
सोमवार, १२ नोव्हेंबर, २०१२
स्वसंवेद्य...!
तर्कांच्या पोकळ भेंडोळयात
जाणिवेचे खुपणारे टोक
भातुकली सांभाळता
स्व-संवेदनेला भोक...!
शुक्रवार, ९ नोव्हेंबर, २०१२
मुक्ती...!
रक्तात माझ्या अंगार पेटलेला
प्रज्ञेला माझ्या पण बुद्ध भेटलेला
अर्जुनाची जात माझी कर्णाची नाळ
मुक्तीच्या आसक्तीत मी जन्म रेटलेला...!
गुरुवार, ८ नोव्हेंबर, २०१२
गांधारी...!
कृतघ्न स्वकेंद्री क्षुद्रांची
लक्ष्मी दरबारी प्रभावळ
श्रेयस आणि प्रेयस त्यांचेच
पोटार्थी गांधारी भुतावळ...!
मंगळवार, ६ नोव्हेंबर, २०१२
तत्व...!
पंचमहाभूतांचा अविष्कार
भंगुर जगाचा व्यवहार
देह त्यागता साकार
निरामय आत्मा उरे...
चिरंतन न अवतार
क्षतीविन नाही संभार
आकळता तत्वविचार
पार्थिव निर्जीव नुरे...!
रविवार, ४ नोव्हेंबर, २०१२
नफ्फड...!
आमच्या आडमुठेपणाची
नाही आम्हाला लाज...
क्षुद्रतेचा आमच्या
आम्हाला नफ्फड माज...!
शनिवार, ३ नोव्हेंबर, २०१२
कापूर...!
पेटण्याचे दु:ख नाही
विझण्याचे भाग्य नाही
आरती नित्य कापूराला
भक्क फुलतांना पाही...!
शुक्रवार, २ नोव्हेंबर, २०१२
जगरहाटी...!
अंध अवलोकन
भ्रष्ट अनुमोदन
पंगु लांगुलचालन
वाटा-घाटी...
नीतीहीन जन
सचोटीवीन धन
विवेकशून्य मन
जगरहाटी...!
मंगळवार, ३० ऑक्टोबर, २०१२
गगनातूर...!
नेणीवेची खंत नाही
अज्ञानाचा डंख नाही
इथल्या मिंधेपणाला
गगनातूर पंख नाही...!
रविवार, २८ ऑक्टोबर, २०१२
कल्लोळ...!
साध्य, साधन आणि साधक
यांचा झालाय जरा घोळ
आराध्यच बदलल्याने
साधनेचा संशय-कल्लोळ...!
बुधवार, २४ ऑक्टोबर, २०१२
वेध...!
सूर्याची किरणे फुलांची तोरणे
अंगणी वैभव रांगोळीचे
दसऱ्याच्या विजयी चेहऱ्याला
वेध तेजोमय दिवाळीचे...!
मंगळवार, २३ ऑक्टोबर, २०१२
तत्व...!
कळीचे फुल उमलता
पक्षाचे कूजन बळावे
जीवन तत्व उमजता
माझे मीपण गळावे...!
रविवार, २१ ऑक्टोबर, २०१२
गहिवर...!
सागराच्या भेटीने
गहिवर दाटतो मनी
गाजेचा रोज नवा बाणा
खळबळ अंतरी जुनी...!
शनिवार, २० ऑक्टोबर, २०१२
अप्रविष्ट...!
जाणीवा धूसर होता
संवेदनाही अस्पष्ट
सगुणाच्या उदोउदोत
निर्गुण अप्रविष्ट...!
बुधवार, १७ ऑक्टोबर, २०१२
अबोध्य...!
उमटले ते उमजले
...असे नाही
मर्मस्थ ते अबोध्य
कसे राही
...
!
मंगळवार, १६ ऑक्टोबर, २०१२
जगदंब...!
बीज अंकुरे अंकुरे
तुझ्या घटात ग शक्ती
आदी तू, तूच माया
जगदंबेची भावभक्ती...!
सोमवार, १५ ऑक्टोबर, २०१२
वारे...!
दृष्टी बदलता सृष्टी बदलली
नजर ढळता वेगळेच इशारे
सुटता वारे बेभान मतलबी
विचारधारेला भलतेच किनारे...!
गुरुवार, ११ ऑक्टोबर, २०१२
संचित...!
माझे कर्म माझा धर्म
माझी नीती माझी गती
दिले घेतले जे जे ते ते
माझे संचित माझ्या साथी...
बुधवार, १० ऑक्टोबर, २०१२
हवन...!
उत्क्रांत की प्रगत
'समृद्ध' हे जीवन
मूल्यांच्या होमात
नीतीचे हवन...!
रविवार, ७ ऑक्टोबर, २०१२
सोहळे...!
सूज्ञ समायोजानाचे
व्यावहारिक आयाम वेगळे
सोयीस्कर संबंधांचे
सांसर्गिक दांभिक सोहळे...!
मंगळवार, २ ऑक्टोबर, २०१२
महात्मा...!
रविवार, ३० सप्टेंबर, २०१२
एकाकी...!
डोळे मिटतांना तरी
जीवलग जवळ हवे
आंधळ्या समृद्धीचे
एकाकी दैन्य नवे...!
शुक्रवार, २८ सप्टेंबर, २०१२
बाप्पा...!
गुरुवार, २७ सप्टेंबर, २०१२
अस्वस्थ...!
सोसवत नाही ज्यांना
माझी मर्मस्थ जाणीव
लाभो त्यांना निरंतर
माझी अस्वस्थ उणीव...!
बुधवार, १९ सप्टेंबर, २०१२
गणपतये नम:
त्वं वाड़मयस्त्वं चिन्मय: ||
त्वमानंदमयस्त्वं ब्रह्ममयः ||
त्वं सच्चीदानंदाद्वितीयोसि ||
त्वं प्रत्यक्षं ब्रह्मासि ||
त्वं ज्ञानमयो विज्ञानमयोसि ||
शनिवार, १५ सप्टेंबर, २०१२
शुभेच्छा...!
वांझोट्या वल्गनांनी फुलते
राजकारण्यांची थैली
रचनात्मक निर्माणाने खुलते
अभियंत्याची शैली...!
अभियंता दिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...!
शनिवार, ८ सप्टेंबर, २०१२
स्व-जन...!
मैत्रीत कसले हेतू
नात्यात कसला स्वार्थ
'स्व' गळाल्याशिवाय
स्व-जनांना काय अर्थ...!
रविवार, २ सप्टेंबर, २०१२
सार...!
शनिवार, २५ ऑगस्ट, २०१२
अलवार...!
माझे असणे माझे गाणे
माझे तगणे माझे फुलणे
अवचित सुर्हुदांच्या सदिच्छेने
माझे उमलून अलवार होणे...!
रविवार, ५ ऑगस्ट, २०१२
ऋतू...!
ऊन पावसाचा खेळ
हिरव्या रानोमाळी
उपजीविकेचा ऋतू
उन्मेषांच्या भाळी...!
सोमवार, ३० जुलै, २०१२
घाव...!
कल्पनेच्या पंखांना
स्वप्नांचा गाव हवा
टळटळीत वास्तवाला
ठसठसणारा घाव नवा...!
रविवार, १५ जुलै, २०१२
कोंब...!
आदिम भुकेचा डोंब
जणू सर्वत्र दाटलेला
अस्फुट तृषार्त कोंब
अन वर्षाव आटलेला...!
मंगळवार, १० जुलै, २०१२
अपरोक्ष...!
चुकण्याला अंत नाही
शिकण्याला नाही क्षती
प्रज्ञेच्या अपरोक्ष
मनोज्ञ मूढ मती...!
रविवार, २४ जून, २०१२
क्षणार्ध...!
सरत्या क्षणाची हुरहूर
येत्या क्षणाची अपेक्षा
गेला कुठे 'हा' क्षण
क्षणार्ध जगण्याची उपेक्षा...!
शनिवार, १६ जून, २०१२
न्यास...!
जगण्याच्या उर्मीला
तगण्याचा ध्यास हवा
मूल्यार्थाच्या गणिताचा
सोयीस्कर न्यास नवा...!
बुधवार, १३ जून, २०१२
चिंब...!
ओथंबल्या गर्भरेशमी
मेघुटाला अनवट कडा
पावसाच्या चाहुलीने
चिंब आठवणींचा सडा...!
नवीनतर पोस्ट्स
जरा जुनी पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)