झाडाला ओढ नभाची
पण मूळ गुंतले भूमीत
जगावे उन्मुक्त कधी
झुगारून कुंथणे सीमित...
कधी शाल ओसाड रानाची
उधाण सागराने ल्यावी
उसासल्या उन्हा चिंबण्या
बरसात चांदण्यांची व्हावी...
बदकाने सोडून तळे
घ्यावी एक गरुड भरारी
केशरी सांज सजावी
कधी रखरखीत दुपारी...
सौद्याने शोधावी सावली
कवितेच्या विभोर कुशीत
जगण्याला मिळावी मुक्ती
अलवार फुलाच्या मुशीत...
सोडावी एकदा निवांत
कधी आठवणींची चंची
सरड्याने बघावी मोजून
उन्नत गगनाची उंची...
जगण्याचे होता ओझे
स्वप्नांच्या गावा जावे
चकोराच्या चोचीने गीत
कैवल्य चांदण्यात गावे...
विश्वाचा साऱ्या व्हावा
कधी मोरपिसारा छान
कविता मिटता कधी यावे
अवचित जगण्याचे भान...!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा