सोमवार, ३१ डिसेंबर, २०१२
आरभाट...!
आदिम या उर्मीला
नाही अंत नाही थांग
आरभाट जाणिवांची
वांझोटी सुस्त रांग...!
सोमवार, २४ डिसेंबर, २०१२
शिखंडी...!
एकेका श्वासाची किंमत
मोजतो भीष्म प्राण फुंकून
पट त्यांचा, त्यांचेच फासे
जातो शिखंडीच जिंकून...!
बुधवार, १९ डिसेंबर, २०१२
पिंड...!
अपराधांना क्षमा नाही
अप्रियतेची तमा नाही
पिंडापासून नाही मुक्ती
सापेक्ष-वृत्ती यमा नाही...!
गुरुवार, १३ डिसेंबर, २०१२
सतार...!
नादब्रह्म झंकारता
स्वरांना शब्दभार
मैफलीत समाधिस्थ
मुग्ध अबोल सतार...!
शनिवार, ८ डिसेंबर, २०१२
कधी...!
झाडाला ओढ नभाची
पण मूळ गुंतले भूमीत
जगावे उन्मुक्त कधी
झुगारून कुंथणे सीमित...
कधी शाल ओसाड रानाची
उधाण सागराने ल्यावी
उसासल्या उन्हा चिंबण्या
बरसात चांदण्यांची व्हावी...
बदकाने सोडून तळे
घ्यावी एक गरुड भरारी
केशरी सांज सजावी
कधी रखरखीत दुपारी...
सौद्याने शोधावी सावली
कवितेच्या विभोर कुशीत
जगण्याला मिळावी मुक्ती
अलवार फुलाच्या मुशीत...
सोडावी एकदा निवांत
कधी आठवणींची चंची
सरड्याने बघावी मोजून
उन्नत गगनाची उंची...
जगण्याचे होता ओझे
स्वप्नांच्या गावा जावे
चकोराच्या चोचीने गीत
कैवल्य चांदण्यात गावे...
विश्वाचा साऱ्या व्हावा
कधी मोरपिसारा छान
कविता मिटता कधी यावे
अवचित जगण्याचे भान...!
बुधवार, ५ डिसेंबर, २०१२
भोग...!
शिकावे अलिप्त राहणे
की सोडावी आसक्ती
तगण्याचे भोग अटळ
जगण्याची ना सक्ती...!
रविवार, २ डिसेंबर, २०१२
ध्यान...!
एकेक ठोका घडवीत गेला
ध्यान माझे जे साकारले
माझा होतोच कधी मी...
भान जगण्यानेच नाकारले!
नवीनतर पोस्ट्स
जरा जुनी पोस्ट
मुख्यपृष्ठ
याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)