बुधवार, ८ एप्रिल, २०१५

कोहम्...!


मर्यादापुरुषोत्तम राम की
भोळा कोपिष्ट रुद्र मी…
दशांगुळे शेष वामन की
रज:कणासंम क्षुद्र मी?

भीष्म धर्म अभिमन्यू की
शापित धुरंधर द्रोण मी…
स्वच्छंदी की स्वपराजित
मलाच न ठावे कोण मी?

कृष्णाचा तो अर्जुन की
लक्ष्य त्याचे कर्ण मी…
वृक्षाचा घनगर्भ घेर की
लाजाळूचे तृणपर्ण मी?

स्थितप्रज्ञ योगी बुद्ध की
नुसताच हतबुद्ध मी…
भूतभविष्यात लोंबणारा
की वर्तमानी रुद्ध मी?

षडरिपूंचा जोखडी जीव की
अनादि अनंताचा प्रवासी मी…
धारणेची स्वयंभू नीव की 
नित्य इथलाच निवासी मी?

तर्कट स्खलनशील की
स्वाध्यायी कोहम मी…
प्रज्ञेने प्रकटलेला की
नि:संदर्भ सोहम मी?

सागर प्रपात ओहोळ की
मुक्त प्रवाही झरा मी…
ओसंडून वाहणारा की
शुष्क साचलेला खरा मी?

प्रतिमेत अडकलेला सिंह की
पानगळीस भ्याला ससा मी…
भासतो तसाच आहे की
आहे खरोखर कसा मी?

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा