आज 'बालदिन' नव्हे का? नाही, 'साजरे'पणा खूप झाला; हल्ली कुठलीही गोष्ट सहज, स्वाभाविकतेने आणि हळूवार अशी घडतच नाही… एकदम धाड्कन आणि दणक्यात साजरी वैगरेच होते. मग शेयर, मग लाईक, मग कॉमेंट, मग रिप्लाय… अशी एक 'आशानां मनुष्यानां कचिद् (अतूट) आश्चर्य शृंखला'…! ते असो. तर या सर्वव्यापी साजरीकरणातून थोडा वेळ काढून आपल्या या बाळांना म्हणजेच पुढच्या पिढीला आपण काय (शिल्लक) ठेवणार आहोत याचाही थोडा सम्यक विचार करू या का…?
दिवाळी संपली. या दिवाळीत मेसेजेस, स्माईली आणि इमोजी (आणि नमोजीही) तर खूप आले… फोनवर, त्यांना 'लाईकू'न अगदी अंगठा दुखू लागला एवढे! पण पाहुणे फार कमी, अगदी नगण्यच! लिव्हिंग रूम मधला सोफा काढून टाकावा का विचार करतोय… हो, त्या जागी एक चांगली अभ्यासिका होऊ शकेल, अगदी मला हवी होती तश्शी…! नाहीतरी घर ज्यासाठी असावे त्या, सणावाराच्या निमित्ताने का होईना होणाऱ्या, भेटीगाठी कितीशा उरल्यात?
नवश्रीमंत मित्र / नातेवाईक दिवाळी फराळ, भेट पाठवतात पण दाराची बेल त्यांचा ड्रायव्हर वाजवतो… त्यांना यायला वेळ होत नाही म्हणे! लग्न, समारंभ घड्याळाला बांधलेल्या कार्यालयात पाहुण्यांची वेळेची सोय पाहून होतात, संगोपन भाड्याच्या वा हक्काच्या पाळणाघरात, वाढदिवस मॅकडोनाल्ड किंवा पिझ्झा हट मध्ये, तब्येतीची चौकशी हॉस्पिटल मध्ये आणि शुश्रुषा, जमलीच तर, 'अथश्री' किंवा 'निवारा' नावांच्या वात्सालयांमध्ये! निरवानिरवी साठी वैकुंठात सर्वसिद्ध मर्तीकासह झटपट विद्युतदाहिनीही निरंतर भडकते आहेच.…
प्लास्टिक मनी आल्यापासून खर तर घरात पाहुणेच काय चोर देखील यायचे बंद झालेत. काय नेणार चोरून… फ्रीज, सोफा, टीवी, लॅपटॉप… आणि कुठे आणि कसा विकणार तो, OLX आणि QUIKR शी कॉम्पीटीशन करून…? तस तर आता Security Press आणि टांकसाळीशिवाय (असते का हो ही हल्ली? नाही, खणखणीत नाण्याचा आवाज ऐकून खूप काळ लोटला म्हणून विचारलं!) चलन फक्त ATM मध्येच असते म्हणून तर होम डिलिवरीवाला सुद्धा पार्सल बरोबर swap मशीन घेऊनच येतो…
घर ही कल्पनाच बदलून गेलीय. ऑफिस मधल्या वर्क स्टेशन सारखं घर एक स्लीप स्टेशन झालंय… रोजच्या धकाधकीचा रिटायरिंग बेस! विश्राम आणि सावधान (तैय्यार) या दोनच अवस्थांसाठी घराची गरज उरलीय, त्याची समाजाशी नाळच तुटल्यासारखी झालीय… हरवलेल्या संवादासारखी! आपल्या पिढीला हे कटू सत्य पचवायलाच हवे की आपले बालपणीचे घर नाही उरले आता…
तेव्हां आता प्रश्न फक्त घरांच्या रचनेचा तेवढा उरलाय… घराच्या रचनेतून 'लिविंग' रूम कायमचीच हद्दपार करू यात का… निदान, जगण्यात लिविंग किती उरलेय आणि सर्व्हायविंग किती याचा शोध लागेपर्यंत तरी…? नाही, स्क्वेअर फुटाला १०,०००+ देण्याचा आणि द्यावे लागणारच म्हणून कमावण्याचाही प्रश्न आहेच, म्हणून म्हणतोय…
बघा, ही दिवाळी तर गेली… पुढची येईपर्यंत विचार करून ठेवा… आणि निर्णय कळवायला विसरू नका… आणि हो, दरम्यान 'देखते रहिये बिग बॉस के घरमे और क्या क्या होनेवाला है'… निदान मंदना तरी बेघर होऊ नये म्हणून… काय?
बघा, ही दिवाळी तर गेली… पुढची येईपर्यंत विचार करून ठेवा… आणि निर्णय कळवायला विसरू नका… आणि हो, दरम्यान 'देखते रहिये बिग बॉस के घरमे और क्या क्या होनेवाला है'… निदान मंदना तरी बेघर होऊ नये म्हणून… काय?
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा