साधन-शुचितेच्या यादीत भाषेचाही समावेश असावा हा आमचा अट्टाहास याचसाठी की भाषा हे संवादाचे एक प्राथमिक तथा प्रभावी साधन (माध्यम) आहे. 'भाषा भ्रष्ट झाल्याने आचार विचारात भ्रष्टता आली (आणि जोपासली गेली!) कि व्यवहारातल्या भ्रष्टतेने भाषा भ्रष्ट केली?' हा एक स्वतंत्र संशोधनाचा विषय होऊ शकतो. आजच्या सरमिसळी(fusion)च्या युगात शास्त्रार्थ, बौद्धिक किंवा जुगलबंदीची जागा वादावादी, मौखिक आणखीन सुंदोपसुंदीने घेतल्यालाही बराच काळ लोटला आणि दूरचित्रवाणीच्या काउंटरवरून रोजच त्याचे दुर्दर्शन झाल्याने, इतर अनेक अनुचित पण सोयीच्या गोष्टींप्रमाणे, तेही आमच्या अंगवळणी पडले. एकूणच सकस, सात्विक आणि मूल्याधिष्ठित गोष्टी वा कल्पनांकडे समाजाने पाठ फिरवल्यामुळे, जो समाज तमाशाने बिघडला नाही आणि कीर्तनाने सुधारला नाही त्याच्या भाषेची वाताहत होण्यास आधुनिक समाजमाध्यमेच कारणीभूत ठरली. समाजमाध्यमांनी, त्यांच्या अत्यंत सुलभ आणि किफायतशीर उपलब्धतेमुळे, जनसामान्यांना वाचाळ केले याहून चिंतनीय बाब अशी कि त्यांनी समाजमानसास अविवेकी केले शिवाय त्या योगे भाषा अत्यंत वेगाने भ्रष्ट होण्यात या शीघ्र व्यापी (viral) आणि अल्पजीवी (momentary) साधनांनी मोलाची कामगिरी बजावली. (आ)वेग, उथळपणा आणि अविवेक अशा व्यवच्छेदक लक्षणांनी युक्त अशा या साधनांच्या अतिरेकी वापराने अजून काय अघटीत होईल हे कल्पनातीत असले तरीही अटळ आणि म्हणूनच क्रमप्राप्त देखील आहे…
नमनाला एवढे घडाभर तेल घालण्याचे कारण, आमच्या या भाषा संस्कारांमुळे (किंवा वेडामुळे म्हणा!) आम्ही किमान आमच्या स्वत:च्या समाजमाध्यमी लेखनात शुचिता पाळण्याचा, आमच्या अल्पमती तथा सामान्य कुवतीनुसार यथार्थ प्रयत्न करतो असा आमचा समज (दावा नव्हे) आहे. आता हे आम्ही काही विशेष करतो असे नव्हे, शिवाय ते विनासायासच घडत असल्याने खास उल्लेखनीय किंवा दखलपात्र (चांगल्या अर्थाने!) आहे असाही आमचा दावा नाही, नव्हे असूच शकत नाही याची आम्हांस पुरेपूर कल्पना आहे. मुद्दा असा की आम्ही काही लोकप्रिय समाजमाध्यमांचे, माउलीच्या अमृताशी पैजा जिंकणाऱ्या माय मराठीत 'बारसे' अर्थात नामानिधान केले आणि त्यावर आमच्या काही मान्यवर संपर्क (contacts) आणि सख्यांनी (friends या अर्थाने, स्त्रीलिंगी नव्हे, गैरसमज नसावा) अतिशय कौतुक मिश्रित अभिप्राय दिल्याने आमचा हुरूप वाढला. (नाहीतरी 'अशा बिनकामाच्या उद्योगांचा आम्हाला फार उरक…' इति आमच्या अन्नपूर्णा अर्धांगिनी!) तेव्हा कल्पनाशक्ती पणास लावून आम्ही शक्य तेवढ्या समाजमाध्यमांचा हा रुपांतरीत केलेला मऱ्हाटी तोंडवळा… बघा तुम्हाला कसा वाटतो…
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा