२७ फेब्रुवारी रोजी जन्मलेले, मुळचे गजानन रंगनाथ शिरवाडकर, दत्तकविधानाने विष्णू वामन शिरवाडकर झाले आणि आपल्या अलौकिक प्रतिभेने महाराष्ट्राचे लाडके कुसुमाग्रज! महाराष्ट्रातील लोकहितवादी मंडळाचे प्रवर्तक आणि नाशिकमधील अनेक साहित्यीक, सांस्कृतिक चळवळींचे प्रणेते असलेल्या तात्यारावांच्या स्मृतिदिनानिमित्त मराठी भाषा दिवस साजरा करणे हे शारदेच्या उत्सवासाठी प्रत्यक्ष माऊलीने पसायदान मागण्याइतके समर्पक व औचित्यपूर्ण ठरावे.
तथापि, कुठल्याही संकल्पनेचा केवळ एक ‘दिन’ साजरा न होता त्या संबंधी जाणीव जागृत होवून ती वर्धिष्णू रहावी आणि त्यासाठी सदोदित सतर्क व कृतीशील असावे या भावनेने आजच्या मुहूर्तावर, नेटकरांना; ज्या भाषेबद्दल प्रत्यक्ष ज्ञानदेव, “माझा मर्हाटाचि बोलू कवतिके। परि अमृतातेही पैजेसिं जिंके। ऐसी अक्षरेचि रसिके। मेळविन।” असा नि:संदिग्ध विश्वास बाळगतात तिची एक चुणूक दाखवावी म्हणून कुसुमाग्रजांच्या साहित्य सागरातून केवळ ५ रत्ने निवडून आणली आहेत.
कुसुमाग्रजांच्या प्रतिभेचा आवाका किती होता याचे केवळ भान यावे म्हणून, एक नितांत सुंदर तरल मनोहर प्रेमकाव्य ‘नाते’, विशुद्ध आणि विशाल जीवनदर्शन ‘माझे जगणे होते गाणे’, राजकारणावर अत्यंत मार्मिक आणि तेवढेच चिंतनीय भाष्य करणारी ‘अखेर कमाई’ या तीन उत्कट अविष्कारांसोबत दोन अत्यंत गहन, विचारी आणि मानवी आयुष्याचे मर्म उलगडून दाखविणाऱ्या आणि पूर्ण अधिकारवाणीने केलेल्या सूचना किंवा इशारा... ‘जपून’ आणि ‘प्रेम’!
...एकमेवाद्वितीय कुसुमाग्रज...
१. नाते
नात्यास नाव अपुल्या देऊ नकोस काही I
साऱ्याच चांदण्यांची जगतास जाण नाही II
व्यवहार कोविदांचा होईल रोष होवो I
व्याख्येतुनीच त्यांची प्रज्ञा वाहत जाई II
ना तालराग यांच्या बंधात बांधलेला I
स्वरमेघ मंजुळाचा बरसे दिशात दाही II
गावातल्या दिव्यांना पथ तो कसा पुसावा I
मंज़िल की जयाची तारांगणात राही II
२. माझे जगणे होते गाणे
जाता जाता गाईन मी
गाता गाता जाईन मी
गेल्यावरही या गगनातील
गीतांमधुनी राहीन मी
माझे जगणे होते गाणे
कधी मनाचे कधी जनाचे
कधी घनाशय कधी निराशय
केवळ नाद तराणे
आलापींची संथ सुरावळ
वा रागांचा संकर गोंधळ
कधी आर्तता काळजातली
केव्हा फक्त बहाणे
राईमधले राजस कूजन
कधी स्मशानामधले क्रंदन
अजणातेचे अरण्य केव्हा
केव्हा शब्द शहाणे
जमले अथवा जमले नाही
खेद खंत ना उरले काही
अदृष्यातील आदेशांचे
ओझे फक्त वाहणे...
३. अखेर कमाई - कुसुमाग्रज
मध्यरात्र उलटल्यावर
शहरातील पाच पुतळे
एका चौथऱ्यावर बसले
आणि टिपं गाळू लागले...
ज्योतिबा म्हणाले,
शेवटी मी झालो फक्त माळ्यांचा...
शिवाजीराजे म्हणाले,
मी फक्त मराठ्यांचा...
आंबेडकर म्हणाले,
मी फक्त बौद्धांचा...
टिळक उद्गारले,
मी तर फक्त चित्पावन ब्राम्हणांचा...
गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला
आणि ते म्हणाले,
तरी तुम्ही भाग्यवान....
एकेक जातजमात तरी तुमच्या पाठीशी आहे.
माझ्या पाठीशी मात्र
फक्त सरकारी कचेऱ्यातील भिंती...!
४. जपून
इथे सांडले सोक्रेटिसच्या
विखार पेल्यातले I
गौतम गांधींच्या नेत्रातील
करुणाश्रू शिंपले II
रक्त सुळाने या जमिनीवर
येशूचे ओतले I
दलदलीत या टाक प्रवासी
जपुनी जरा पाऊले II
५. प्रेम
पुरे झाले चंद्रसूर्य
पुऱ्या झाल्या तारा
पुरे झाले नदीनाले
पुरे झाला वारा
मोरासारखा छाती काढून उभा रहा
जाळासारखा नजरेत नजर बांधून पहा
सांग तिला तुझ्या मिठीत
स्वर्ग आहे सारा
शेवाळलेले शब्द आणिक
यमकछंद करतील काय?
डांबरी सडकेवर श्रावण
इंद्रधनू बांधील काय?
उन्हाळ्यातल्या ढगासारखा हवेत रहाशील फिरत
जास्तीत जास्त बारा महिने बाई बसेल झुरत
नंतर तुला लगिनचिठ्ठी
आल्याशिवाय राहील काय?
म्हणून म्हणतो जागा हो
जाण्यापूर्वी वेळ
प्रेम नाही अक्षरांच्या
भातुकलीचा खेळ
प्रेम म्हणजे वणवा होऊन जाळत जाणं
प्रेम म्हणजे जंगल होऊन जळत रहाणं
प्रेम कर भिल्लासारखं
बाणावरती खोचलेलं
मातीमध्ये उगवूनसुद्धा
मेघापर्यंत पोचलेलं
शव्दांच्या या धुक्यामध्ये अडकू नकोस
बुरुजावरती झेंड्यासारखा फडकू नकोस
उधळून दे तुफान सगळं
काळजामध्ये साचलेलं
प्रेम कर भिल्लासारखं
बाणावरती खोचलेलं...!
...सागरी सेतू बांधण्यासाठी आपल्या ताकदीनिशी मदत करणाऱ्या खारीस प्रभू रामचंद्राने कौतुकाने कुरवाळले होते म्हणतात... कुसुमाग्रज समजावून घेतांना, मराठीच्या वैभवशाली आणि दैवदुर्लभ हस्तिदंती महालाच्या कुठल्याशा पायरीचा लहानसा दगड होण्याचा प्रयत्न 'इत्यादी' हा आमचा खारीचा वाटा, ज्ञानराजांपासून कुसुमाग्रज, सुरेश भट आणि त्या सर्व ज्ञात अज्ञात साहित्यकारांस सादर समर्पण ज्यांनी आमच्यात माय मराठी रुजवली, जोपासली आणि तिचा लळा लावून आम्हाला तिच्या पालखीचे भोई होण्याचे अहोभाग्य मिळवून दिले...
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म, पंथ, जात एक जाणतो मराठी!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा