जी व्यक्ती अगदी एक दिवस का होईना शाळेत गेली आहे, तिने राष्ट्रगीताबरोबर ‘प्रतिज्ञा’ देखील म्हटली, ऐकली असेल... राष्ट्रगीत समजण्यास अवघड आहे असे मानले तरी ‘भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत. माझ्या देशावर माझे प्रेम आहे...’ यात समजण्यास अवघड असे काही नसावे.
‘सद रक्षणाय खल निग्रहणाय’ असे ब्रीद असलेल्या पोलिसांचे काम लोकाभिमुख असते आणि त्यांनी नागरिकांची सेवा करणे अनुस्यूत आहे. या पोलीस दलात सेवा करण्याची जबाबदारी स्वीकारतांना, कायदा व सुव्यवस्थेच्या माध्यमातून जनसेवा व राष्ट्रकार्य करण्याची एक शपथ घ्यावी लागते हे समजण्यास फार विद्वत्तेची गरज नसावी.
द्रक्ष्याम शीघ्रं संबुद्धं सर्वव्याधिप्रमोचकं । वैद्यराजं महावैद्यं दुःखितानां चिकित्सकं ।। अशी ज्यांच्याबद्दल वेदकालीन धारणा आहे त्या वैद्यक व्यवसायात देखील आपले समाजकार्य सुरु करतांना लोकसेवेची शपथ देण्याची अतिशय उज्ज्वल परंपरा आपल्या देशाला लाभली आहे हे अगदी सर्वांना नाही तरी संबंधितांना माहित असावे.
वकील, अभियंते, वास्तुरचनाकार व इतर व्यावसायिक यांनी आपापल्या व्यवसायात सुसूत्रता यावी आणि समव्यवसायिकांनी संघटीत असावे म्हणून काही शिखर संस्था स्थापन करून त्याचे सदस्यत्व समव्यवसायीकांना देण्याची व्यवस्था असते. असे सदस्यत्व देतांना देखील आचारसंहितेचे नियम हे सदस्यांना बाध्य असतात.
छोटे मोठे व्यावसायिक, दुकानदार, पेढ्या व आडते अशा घटकांच्या नियमनाची प्राथमिक जबाबदारी स्थानिक स्वराज्य संस्थांकडे असते आणि त्यातील असंघटीत वर्गासाठी शासनाने काही आयोग अथवा मंडळांची योजना केलेली असते जी, अशा घटकांनी कायद्याच्या चौकटीत राहून आपले काम करावे यावर लक्ष ठेवून असते.
मोठ्या उद्योगांच्या नियमनासाठी ‘कॉर्पोरेट कार्य मंत्रालय’ या सारख्या शासकीय यंत्रणा कार्यरत असतात ज्या अशा उद्योगांच्या प्रक्रिया व त्यांचे आर्थिक, सामाजिक व पर्यावरणीय आयाम या संबंधी असलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या यथायोग्य अनुसरणासाठी त्यांच्या एकूण गतीविधी आणि त्याचे सादरीकरण यावर नियंत्रण ठेवतात.
समाजकारण हे मुलभूत ध्येय असले तरी त्यासाठी कराव्या लागणाऱ्या योजना, कायदे व एकूणच व्यवस्थेची देखभाल यात व्यस्त असलेले शासन, अशासकीय सेवाभावी संस्था अथवा संघटना यांचे प्रयोजन मान्य करते. अशा संस्था स्व:तची ध्येय-धोरणे व कार्यप्रणाली ठरवू शकत असले तरी धर्मादाय आयुक्ताकडून ते संमत करून घ्यावे लागते.
नागरिकांच्या हितासाठी ठरविलेली धोरणे, केलेले कायदे आणि संकल्पित योजना यांच्या अंमलबजावणीसाठी शासनास प्रशासनाची जोड लागते आणि प्रशासकीय कार्याची चौकट तत्वत: लोकाभिमुख, निष्पक्ष आणि भक्कम असणे गृहीत असल्याने लोकशाही व्यवस्थेच्या प्रशासकीय आराखड्यात फार मोठ्या त्रुटी असतात असे नाही.
नाव-गाव, जात-धर्म, खान-पान, रिती-रिवाज, आस्था-श्रद्धा, मुल्ये-निष्ठा आणि जीवनशैली या गोष्टी अत्यंत वैयक्तिक असल्याने त्या स्वत:पुरत्या, आपल्या कुटुंबापुरत्या व आपापल्या घरांपुरत्या मर्यादित ठेवून सार्वजनिक जीवनात देशाच्या नागरिकाचा राष्ट्रधर्म पाळत आपले विहित कर्तव्य निभावणे ही वरीलपैकी प्रत्येकाची संवैधानिक जबाबदारी ठरते.
वरील यादीत १३४ कोटी+ भारतीयांपैकी बहुतांचा समावेश असल्याने, या प्रत्येकाने आपापले कर्म सचोटीने, निरलसपणे आणि कर्तव्यभावनेने केल्यास, दिखाव्याच्या प्रसंगी ‘मातीशी इमान’चे भाकड निकष ठरवून देशप्रेमाची उबळ येण्याची आणि समाज-माध्यमातून आपल्या जाज्वल्य देशभक्तीची उधळण करण्याची गरज भासणार नाही.
१५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झालेल्या भारतीयांत आज १०० कोटींची भर पडली आहे; तेंव्हा स्वातंत्र्य म्हणजे स्वत:च्या तंत्राने जगण्यास मिळालेली मुभा नव्हे तर स्वत:च्या, आपल्या बांधवांच्या, आपल्या राष्ट्राच्या आणि पर्यायाने समस्त मानवतेच्या उद्धाराची आणि उत्कर्षाची जशी संधी आहे तशीच जबाबदारीही याची जाणीव गरजेची आहे.
कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी २० वर्षांपूर्वी ‘स्वातंत्र्यदेवीची विनवणी’ या कवितेतून समस्त भारतीयांस केलेले आर्जव, आज भारताच्या सत्तराव्या स्वात्यंत्रदिनी तेवढेच खरे आहे. भारत महासत्ता होण्याची स्वप्ने बघण्यापूर्वी आपण निदान एवढे करू शकलो तर स्वातंत्र्याच्या हिरक महोत्सवात भारतमाता तिच्या सर्व लेकरांस सहस्त्र कराने अक्षय्य वरदान देईल...
स्वातंत्र्यदेवीची विनवणी
(प्रासंगिक फटका)
(अनंत फंदींचे स्मरण करून)
पन्नाशीची उमर गाठली अभिवादन मज करू नका ।
मीच विनविते हात जोडूनी वाट वाकडी धरू नका ॥
सूर्यकुलाचा दिव्य वारसा प्रिय पुत्रांनो तुम्हा मिळे ।
काळोखाचे करून पूजन घुबडांचे व्रत वरू नका ॥
अज्ञानाच्या गळ्यात माळा अभिमानाच्या घालु नका ।
अंध प्रथांच्या कुजट कोठरी दिवाभितास दडू नका ॥
जुनाट पाने गळुन पालवी नवी फुटे हे ध्यानि धरा ।
एकविसावे शतक समोरी सोळाव्यास्तव रडू नका ॥
वेतन खाउन काम टाळणे हा देशाचा द्रोह असे ।
करतिल दुसरे, बघतिल तिसरे असे सांगुनी सुटू नका ॥
जनसेवेस्तव असे कचेरी ती डाकूंची नसे गुहा ।
मेजाखालुन मेजावरतून द्रव्य कुणाचे लुटू नका ॥
बोथट पुतळे पथापथावर ही थोरांची विटंबना ।
कणभर त्यांचा मार्ग अनुसरा, वांझ गोडवे गाऊ नका ॥
सत्ता तारक सुधा असे पण सुराहि मादक सहज बने ।
करिन मंदिरी मी मदिरालय अशी प्रतिज्ञा घेऊ नका ॥
प्रकाश पेरा अपुल्या भवती दिवा दिव्याने पेटतसे ।
इथे भ्रष्टता तिथे नष्टता शंखच पोकळ फुंकू नका ॥
पाप कृपणता पुण्य सदयता संतवाक्य हे सदा स्मरा ।
भलेपणाचे कार्य उगवता कुठे तयावर भुंकू नका ॥
गोरगरीबा छळू नका ।
पिंड फुकाचे गिळू नका ।
गुणीजनांवर जळू नका ।
उणे कुणाचे दिसता किंचित देत दवंडी फिरू नका ॥
मीच विनविते हात जोडुनी वाट वाकडी धरू नका॥
पर भाषेतहि व्हा पारंगत ज्ञानसाधना करा, तरी ।
माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपू नका ॥
भाषा मरता देशहि मरतो संस्कृतिचाही दिवा विझे ।
गुलाम भाषिक होउनि अपुल्या प्रगतीचे शिर कापु नका ॥
कलम करी ये तरी सालभर सण शिमग्याचा ताणु नका ।
सरस्वतीच्या देवळातले स्तंभ घणाचे तोडु नका ॥
पुत्र पशूसम विकती ते नर, नर न नराधम गणा तया ।
परवित्ताचे असे लुटारू नाते त्याशी जोडु नका ॥
स्वच्छ साधना करा धनाची बैरागीपण नसे बरे ।
सदन आपुले करा सुशोभित दुसर्याचे पण जाळु नका ॥
तरुणाईचे बळ देशाचे जपा वाढवा तरुपरी ।
करमणुकीच्या गटारगंगा त्यात तयाला क्षाळु नका ॥
सुजन असा पण कुजन मातता हत्यार हातामधे धरा ।
सौजन्याच्या बुरख्याखाली शेपुट घालुन पळू नका ॥
करा कायदे परंतु हटवा जहर जातिचे मनातुनी ।
एकपणाच्या मारुन बाता ऐन घडीला चळू नका ॥
समान मानव माना स्त्रीला तिची अस्मिता खुडू नका ।
दासी म्हणुनी पिटू नका वा देवी म्हणुनी भजू नका ॥
नास्तिक आस्तिक असा कुणीही माणुसकीतच देव पहा ।
उच्च नीच हा भेद घृणास्पद उकिरड्यात त्या कुजू नका ॥
माणूस म्हणजे पशू नसे ।
हे ज्याच्या हृदयात ठसे ।
नर नारायण तोच असे ।
लाख लाख जन माझ्यासाठी जळले मेले विसरु नका ।
मीच विनविते हात जोडुनी वाट वाकडी धरू नका ॥
- कुसुमाग्रज
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा