बुधवार, २१ फेब्रुवारी, २०१८

मृत्युलेख..!

आज माईआत्याच्या निधनाने ८६ वर्षांचा एक प्रदीर्घ अध्याय आटोपला. आपल्या आजोबांबद्दल अधिकाधिक जाणून घेण्याची माझी शेवटची कडीही निखळली आणि उरलीसुरली आशाही लोपली. आत्याच्या या शेवटच्या काळातील घटना, त्यांचे संदर्भ आणि त्याचा बौद्धिक स्तरावर कार्यकारणभाव आणि अध्यात्मिक स्तरावर कर्मसिद्धांत याविषयी गेले काही दिवस स्वत:शी चिंतन आणि इतरांशी चर्वतिचर्वण यामध्ये विविध साक्षात्कार झाले. मनुष्यस्वभावाचे अनेकानेक नमुने आणि त्यांची परिस्थितीनुरूप क्षणोक्षणी बदलणारी रूपे पाहून अवाक व्हायला झाले. मानसशास्त्राच्या कितीही अभ्यासानंतर देखील माणसाचे मन ही जर एक खोल अंधारी गुहा असेल तर त्याची बुद्धी ही घनदाट जंगलातील विस्तीर्ण वृक्षाच्या पारंब्या आहेत हा शोध, नवीन नसला तरी, अंगवळणी देखील पडला नाही. हा विषय, 'शास्त्र असे सांगते!' आणि  कर्मकांडाच्या दृष्टीने आजपासून १४व्या दिवशी संपेल आणि आत्या कदाचित फक्त भिंतीवरील चित्र आणि तिच्याच शब्दात 'सठी सामाशी' निघणाऱ्या आठवणीच्या रूपात उरेल, पण या घटनेने पुन्हा एकदा घुसळून वर आणलेले मानवी आचार-विचार-वर्तन-विहार संबंधी प्रश्न आणि त्यांची आंदोलने जेवढी सनातन आहेत तेवढीच अमूर्त तथा कालातीत... 

या निमित्ताने, 'आपण सारे अर्जुन' असे म्हणणाऱ्या वपुंची आठवण होते आणि त्याच धर्तीवर 'आपण सारे अश्वत्थामा' असे म्हणावसे वाटते, प्रत्येकाची जखम फक्त वेगळी आणि ती सांभाळण्याची रीतही वेगळी. या अशाश्वत आणि अनित्य जगण्यात हरेक भळभळणारे ललाट तेवढे शाश्वत! 

आयुष्याच्या संधीकाली कधीतरी प्रकाशित करावी म्हणजे मृत्युलेख म्हणून खपून जाईल अशी कविता आज इथे टाकावीशी वाटतेय कारण अनासक्ती आणि विरक्तीचे महत्व इतके प्रकर्षाने जाणवण्याची संधी कदाचित पुन्हा मिळेल न मिळेल...
   
सकाळी दुपारी संध्याकाळी वेळी अवेळी
भटकायचा इतस्तत: विखुरल्या सारखा
गूढ शोधक नजरेने निरखायचा कणकण
वाटायचा निरुद्देश अन निरर्थकही कधी...

बोलायचा स्वत:शीच आणि कुणाशीही
लोकांना नव्हता वेळ ते जाणून घ्यायला
 कुणी म्हणे हा तर वेडा, कुणाला वाटे तत्वज्ञ
कुणा लेखी संशयित तर कुणी, 'हं! संभावित'

त्याला न तमा न फिकीर, नुसतीच वणवण
आणि विवंचना कधी भुकेल्या जीवांची…
चुकीच्या ग्रहात पडलेल्या आत्म्याने अन
एक दिवस दिली टाकून देहाची लक्तरे थकून

झाडली गोधडी काही आशाळभूत अन काही
लोभी कामचुकारांनी लोचट भूतदयेने जेव्हा
विचारांचा पाडला पाऊस कोंडल्या शब्दांनी
काही अलंकारही होती अजून न वापरलेले...

कुठलाच नव्हता पुरावा त्याच्या असण्याचा
तेव्हा ठरले कि हा ना अ-भूत-पूर्व ना भावी
'विषय संपवा!' म्हणाले सूज्ञ जाणते कुणी
पांढऱ्या पापणीचा म्हातारा म्हणाला… 'कवि!'

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा