जंगलालाही सहकाराची बाधा
झाल्याने एकदा सिंह, कोल्हा आणि गाढव यांनी एकत्र शिकार करून शाही मेजवानीचा बेत आखला. शिकार करून मेजवानीसाठीचे जिन्नस
तयार झाल्यावर सिंहाने गाढवाला त्यांचे भाग करून तिघात वाटणी करायला सांगितले.
बोलूनचालून गाढवच असल्याने समानतेच्या खुळचट कल्पनांनी गाढवाने त्या ढिगाचे तीन
समसमान वाटे केले. हे सिंह महाराजांना मुळीच रुचले नाही व आपल्या इभ्रतीस कमीपणा
आणणाऱ्या गाढवाचा राग येऊन त्यांनी त्याच्यावर झडप घालून त्याचीही शिकार केली.
आता नव्याने वाढलेल्या
शिकारीच्या ढिगाची वाटणी करण्याचे काम त्यांनी कोल्ह्यावर सोपवले. धूर्तपणा आणि चलाखी
स्वभावत:च असलेल्या कोल्ह्याने हुशारीने मोठ्ठाच्यामोठ्ठा ढीग सिंह महाराजांपुढे
सरकवून आपल्यासाठी अगदीच किरकोळ वाटा घेतला आणि तो विनयाने सिंह महाराजांना
म्हणाला,
‘झाली वाटणी!’
कोल्ह्याच्या चतुराईने खूष
झालेल्या सिंह महाराजांनी आपल्या हिश्शातील आणखी काही तुकडे उदार मनाने
कोल्ह्यापुढे भिरकावीत त्याला विचारले,
‘काय रे, तुला इतकी समुचित वाटणी करायला
कुणी शिकवले?’
स्थितप्रज्ञ संताचे भाव
चेहऱ्यावर आणून कोल्हा उत्तरला,
‘...मेलेल्या गाढवानं!’
-------------------------------------------------------------------------------------------------------------
१९९२ साली भारत सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने प्रकाशित केलेल्या राजा राजवाडे लिखित ‘गोष्टी: माणसांच्या आणि प्राण्यांच्या’ या मुलांसाठीच्या गोष्टीतील ही एक संपूर्ण काल्पनिक गोष्ट तथा बोधकथा असून ती इथे अप्रस्तुत तथा सर्वस्वी दुर्बोध वाटल्यास किंवा तिचा, तिच्यातील पात्रांचा, घटनांचा आणि तात्पर्याचा कुठल्याही जीवित वा मृत व्यक्ती, संस्था, यंत्रणा अथवा परिसंस्थांशी साधर्म्य आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. तरीदेखील एक निरीक्षण या निमित्ताने नोंदवावेसे वाटते – मेजवानी म्हणून ‘विकास’ मिळणार असेल तर ‘शिकार’ अपरिहार्य ठरते आणि ‘शिकार’ ही शांत डोक्याने आणि थंड रक्ताने केलेली कत्तलच असते... मग ती ‘गाढव’ नावाच्या विवेकाची असो किंवा ‘झाड’ नावाच्या एका परिपूर्ण परिसंस्थेची! शिवाय एक जुनी जाणती शहाणीव सांगते - म्हातारी मेल्याचं दु:ख नाही, काळ सोकावतो!
-------------------------------------------------------------------------------------------------------------
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा