रविवार, १७ नोव्हेंबर, २०१९

ये दोस्ती...?



म्हणजे गोष्ट तशी छोटी होती, फार काही नाही. म्हणजे असं बघा... दोन तरणेबांड, राजबिंडे तरूण होते. परिस्थितीच्या रेट्यात बिचारे फार सुशिक्षित सुसंस्कारीत होऊ शकले नाहीत, पण मनाने चांगले होते. शिक्षण आणि संस्कार थोडे कमी पडल्याने ‘नाईन टू फाईव्ह’वाला, आधी टाय आणि कालांतराने डाय लावून करायचा, सोफीस्टीकेटेड जॉब त्यांच्या नशिबी नव्हता. त्यामुळे बिचाऱ्यांना हेराफेरी, चोऱ्यामाऱ्या, दादागिरी अशा अत्यंत सौम्य स्वरूपाचे अदखलपात्र पण तरी उगाचच गुन्हेगारी समजले जाणारे उद्योग करून आपला चरितार्थ चालवावा लागे. पण दोघे स्वभावाने अतिशय चांगले होते. त्यांच्या या व्यवसायात अनेकदा शौर्य आणि पळपुटेपणा तसेच संधिसाधूपणा आणि सचोटी यांचे पेचप्रसंग उभे रहात. अशा प्रत्येक प्रसंगी, मुळचा मनाचा अतिशय स्वच्छ, दयाळू आणि इतरांबद्दल कणव असलेला मोठा, एका नाणाक्ष... आपलं, चाणाक्ष युक्तीने सत्याची बाजू घेणे भाग पाडत असे आणि सरळ वळणाच्या दोघां हातून नकळत पुण्य घडत असे.

अशाच एका धाडसी पुण्यकर्माच्या वेळी दोहोंच्या हातून एका इमानदार पुलीसवाल्याचे प्राण वाचले आणि त्या पुलीसवाल्याने याची चांगलीच याद राखली. इमानदार लोक जनरली असतात तसा हा पुलीसवाला शूरवीर आणि कर्तव्यदक्ष देखील असल्याने त्याने एका डाकूला स्वत:च्या हाताने पकडून शिक्षा देण्यासाठी जे जंग जंग पछाडले त्यामुळे एका रसिक मनाच्या, नाचगाण्याचा नवाबी शौक असलेल्या पण आपल्या डाकूगीरीत अत्यंत गब्बर असलेल्या या उलट्या काळजाच्या नराधमाचे शत्रुत्व ओढवून घेतले. परिणामी जेलमधून पळून गेलेल्या डाकूने गावाकडे, गावापासून तुटलेल्या ऊंच गढीवर, रहाणाऱ्या पुलीसवाल्याच्या संपूर्ण कुटुंबाचा बळी घेतला, देवदर्शनाला गेलेली छोटी बहु तेवढी वाचली. रामा, शिवा, गोविंदा...! नवपरिणीत बहूचे अकाली वैधव्य आणि निष्ठावान सेवक रामलाल यांच्यावर कोसळलेल्या दु:खाच्या संकटाने वेडापिसा झालेल्या सूड भावनेने पेटलेल्या पुलीसवाल्याने थेट डाकूचा तळ गाठला आणि क्रूरकर्मा असण्याबरोबरच अत्यंत कुटील असणाऱ्या डाकूने जन्मभर पुरेल अशी शिक्षा म्हणून पुलीसवाल्याचे बाहूच छाटून टाकले.

आता विनाबाहू, विधवा बहू आणि रामलाल यांच्यासह आयुष्य कंठणारा पुलीसवाल्याचा आत्मा एकाच विचाराने तडफडतो आहे... आपल्या स्वत:च्या, तळाला खिळे लावलेल्या बुटांच्या, पायांनी त्या डाकूचा खात्मा! पण हे करण्यासाठी त्याला सोशिक बहू आणि वृद्ध, थकलेला रामलाल यांचा उपयोग नाही. म्हणूनच त्याने याद राखलेल्या त्या सालस पण धाडसी आणि सुस्वभावी पण गुन्हेगारीस मजबूर जोडगोळीची एकाच पास्ट परफॉरमन्सच्या आधारे परस्पर रिक्रूटमेंट करून टाकली. गावात दाखल झालेल्या या दोघांनी खरेतर पुलीसवाल्याने केलेल्या एका गल्तीच्या भांडवलावर पहिल्याच रात्री तिजोरीवर डल्ला मारून कथा संपवली असती, पण नाही! त्यांचे मुळचे सुस्वभावीपण छोट्या बहूच्या सो-शिक रूपाने समोर उभे ठाकले आणि कथा लांबली. दोन बाहुबालींच्या द्वंद्वास सुरवात झाली तीच मुळी प्रादेशिक भाषेतील सुपरस्टारच्या राष्ट्रीय स्तरावरील गेस्ट ऐपीअरन्समधल्या बेमौत मौतीने. शक्तीप्रदर्शनाच्या जीवघेण्या खेळात हकनाक बळी जाणाऱ्या निष्पाप कोकरांच्या अंध पालकांचे हृदय पिळवटून टाकणारे शल्य म्हणजे ‘इतना सन्नाटा क्यूं है भाई...’!

सुडाने पेटलेल्या दिशाहीन प्रवासात परस्परांवर कुरघोडी करण्याच्या वर्चस्वस्पर्धेत कुणाच्या हाती काय लागले हा यक्षप्रश्न! तरुण, सोशिक, शालीन कुलीन विधवा बहुचे पुनर्वसन करून तिचा उद्धार करू पाहणाऱ्या उमद्या तरुणाने खिंड लढवतांना जीव गमावून काय साधले? उरलेला दुसरा गुलछबू बेपर्वा तरुण, ज्या मित्रासोबत याच गावात खेतीबाडी करत सुखाने संसार करण्याची आणि मित्राला ‘आया’चे काम देण्याची स्वप्ने बघितली त्या मित्राशिवाय, पाण्याच्या टाकीवर चढून मिळवलेल्या, बायकोबरोबर सुखाने संसार करू शकेल? सेन्सॉरच्या आक्षेपामुळे आणि ऐनवेळी टपकलेल्या पोलिसांच्या हस्तक्षेपामुळे डाकूचा पायाने खात्मा करण्याचे स्वप्न बघणारा पुलीसवाला, त्या क्रूरकर्म्याला जीवंत सोडावे लागल्याने, त्याला पुन्हा पळून जाण्याची संधी मिळाली तर तो काय करेल या विवंचनेत उरलेले आयुष्य कसे काढेल? आणि रहीमचाचाच्या हृदयाला घरे पाडणाऱ्या प्रश्नाचे उत्तर कोण, कधी आणि कसे देणार... हे उपप्रश्न!

अगदीच गांभीर्याचा ओव्हरडोस नको म्हणून कथानकात ‘सुरमा भोपाली’पासून, ‘हरिराम न्हाई’, जेलर, बसंतीकी मौसी, अशी घटकाभर मनोरंजन करणारी पात्रही होती... आहेत! या साऱ्यांना फुटेज त्या मानाने कमी असले तरी यांच्या उपस्थितीने मनोरंजनाचे वेटेज नक्कीच वाढले... वाढते! तर ही झाली ग्रेटेस्ट स्टोरी एव्हर टोल्ड... शोले – हिंदी चित्रपटसृष्टीतला सगळ्यात यशस्वी सिनेमा... जो हजार वेळा बघितल्याचे छातीठोकपणे सांगणारे नरपुंगव या भूमीत आहेत. त्याचं काय...?

आज हे सार आठवण्याचं आणि हजार वेळा बघितलेल्या शिणेमाची गोष्ट दहा हजाराव्यांदा सांगण्याचं कारण म्हणजे गेल्या महिन्याभरापासून महाराष्ट्रात चाललेल्या सत्ताहरण वगनाट्याचे प्रयोग आणि त्या निमित्ते रोज वर्तमानपत्रातून कोसळणारे मथळे आणि दूरदर्शनवर कोकलणारे वार्ता-हर! हर हर... 

म्हणजे गोष्ट तशी छोटीच आहे... होती! पण या ‘ग्रेटेस्ट स्टोरी एव्हर टोल्ड’ची ही ‘लॉंगेस्ट स्टोरी नेव्हर अनफोल्ड’ आवृत्ती... त्याबद्दल आम्ही काहीच म्हणणार नाही... की बुवा आम्हाला, म्हणजे जनतेला, उगाचच इमामसाहब झाल्यासारखे वाटतेय आणि कुणालातरी ठाकूर झाल्यासारखे वाटते आहे... म्हणजे बुवा गोष्ट तर संपली पण नेमकी आपली हार झाली का जीत? आता आमची भूमिका तर आम्ही सांगितली (आणि चांगली वठवली देखील!), इतर भूमिका आणि पात्रे ज्याने त्याने आपापल्या प्रज्ञेनुसार समजून घ्यावी...

हो म्हणजे, तुमचा ‘जय’ आमच्या लेखी ‘विरू’ असायचा, आम्ही जिला अखंड बडबडणारी ‘बसंती’ समजलो ती तुमचा ‘पुरे पचास हजार...’ एवढा एकच डॉयलॉग असणारा सांबा असला, ज्याला आम्ही ‘कालीया’ म्हणायचो तो तुमचा ‘धोलीया’ निघायचा आणि ज्याला आम्ही सगळ्यांचे 'हात' बांधणारा (की छाटणारा?) ‘गब्बर’ म्हणायचो तो तुमचा स्वत:चेच 'हात' गमावून बसलेला ‘ठाकूर’ असला म्हणजे? झाली का पंचाईत... म्हणून ज्याचं त्यानी पाहून घ्यावं, उगाच ‘हम बोलेगा तो बोलोगे की बोलता है...!’ काय?
-------------------
बाळासाहेबांच्या पुण्य स्मृतीस सादर समर्पित...!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा