आज १२ जानेवारी, स्वामी विवेकानंदांची जयंती. १९८४ साली भारत सरकारने हा दिवस राष्ट्रीय युवा दिन (National Youth Day) म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला आणि १९८५ पासून आपण सारे भारतीय हा दिवस युवा दिन म्हणून साजरा करतोय. विवेकांनदांनी तरुणांच्या ठायी असलेल्या असीम ऊर्जेचे प्रवाहीकरण करण्याचे आणि युवकांचे निरंतर सत्याचा शोध घेण्याचे अथक प्रयत्न फलद्रुप होण्याचे जे उदात्त स्वप्न बघितले त्या पार्श्वभूमीवर, भारत सरकारने 'राष्ट्रीय युवा दिना'ची या तेजस्वी राष्ट्रभक्तास दिलेली ही अत्यंत समर्पक अशी मानवंदना ठरावी...!
आजच्या 'राष्ट्रीय युवा दिना'च्या प्रसंगी 'युवा' या संकल्पनेची माझी व्याख्या...
ज्याला बदल हवा आहे,
तो प्रत्येक जण युवा आहे...!
वयाचा तारुण्याशी संबंध नाही
माणूस शिरविहीन कबंध नाही,
ज्याला रोजचा दिन नवा आहे,
तो प्रत्येक जण युवा आहे...!
जोश आहे अन आहे होशही
गुणांबरोबर असतील दोषही
मित्रांचा सोबत थवा आहे
तो प्रत्येक जण युवा आहे...!
कुठल्याही अन्यायाने व्यथित
होतो
भावनावेगाने कधी स्तिमित होतो
वर्तनी विवेक तरी ज्याला
हवा आहे
तो प्रत्येक जण युवा आहे...!
‘डोन्ट बी सायलेंट’
हे जसे जाणतो
तसे ‘डोन्ट बी
व्हॉयलेंट’ही
म्हणतो
समाजाला जोडणारा जो दुवा
आहे
तो प्रत्येक जण युवा आहे...!
सुखद भावनांचा मनी नाचता
मोर
होतो थोडा गेय अन
भाव-विभोर,
कधी रणवीर तर कधी बुवा आहे
तो प्रत्येक जण युवा आहे...!
उभा जो इतिहासाच्या
खांद्यावर
म्हणूनच बघू शकतो खूप
दूरवर,
‘ग’ची न ज्याला बाधा देवा आहे
तो प्रत्येक जण युवा आहे...!
सजग आहे, सतर्क आहे,
स्वतंत्र आहे
काव्य-शास्त्र-विनोदाचा स्वमंत्र
आहे
जगन्मित्र दोस्त आपला भावा
आहे
तो प्रत्येक जण युवा आहे...!
स्वातंत्र्याची ओढ आहे
जाणीवेची जोड आहे...
संस्कृती ज्याचा ठेवा आहे
तो प्रत्येक जण युवा आहे...!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा