शनिवार, २७ जून, २०२०

गर्भ...!



थेंब साचला टपोरा,
पहिल्याच पावसात
नाही पाहिले तुला
किती एक दिवसात!

मन ओढाळ झाले,
पावसाच्या सरीगत
कसे जपावे हे जीणे
रोज वाढत्या दरीगत!

मेघ काळा-सावळा
नभी ओथंबून राहे
घननिळा कान्हा मग
मनी साचूनही वाहे!

पाऊस नितळ निर्मळ
नदी-झऱ्या जोडी पंख
डोळ्यातले पाणी खारे
त्याचे पाणी निवळशंख!

मोर फुलवी पिसारा,
भूमी उघडोनी चोच
वाट पाहे त्या थेंबाची
देण्या सृजनाची पोच!

बीज रुजावे जीवाचे
सडा मायेचा पडावा
मातीला गर्भ राहता
नवा माणूस घडावा!

पुन्हा एकदा सन्मित्र दिनेशच्या आग्रहाखातर
त्याच्या वाढदिवसाची सप्रेम भेट म्हणून सस्नेह...!

शनिवार, ६ जून, २०२०

बक्षीस...!


अधाशीपणाने खातांना लांडग्याच्या घशात हाड अडकलं.
जीव गुदमरू लागला म्हणून तो करकोचाकडे गेला.
म्हणाला, ‘तू तुझ्या लांब, टोकदार चोचीने माझ्या घशात अडकलेलं हाड काढून दिलंस तर मी तुला मोठ्ठं बक्षीस देईन!’
करकोच्याने मोठ्ठ्या बक्षिसाच्या मोहाने लांडग्याचा जीव वाचवायला त्याची मदत करायचं ठरवलं.
करकोच्याने अतिशय शिताफीने आपली चोच लांडग्याच्या घशात टाकून अडकलेलं हाड बाहेर काढलं.
घसा मोकळा झाल्यावर लांडग्याला हायसं वाटलं आणि त्याने मोकळा श्वास घेतला.
‘माझं बक्षीस?’ करकोचा म्हणाला. 
‘अरे, तुझी मान माझ्या जबड्यात असतांना मी तिचा लचका तोडला नाही याहून मोठं काय बक्षीस हवं तुला?’

शुक्रवार, ५ जून, २०२०

योग...?

आज जागतिक पर्यावरण दिन आणि वटपौर्णिमा असा योग (?) जुळून आला आहे. भौगोलिकदृष्ट्या विभागलेल्या देशांच्या सीमा रक्षणासाठी सैनिक तैनात आहेत आणि मानसिक दृष्ट्या दुभंगलेल्या (भारतीय) पुरुषांच्या आयुरारोग्याच्या रक्षणासाठी घरोघरी सावित्री कटिबद्ध आहेत. परंतु सैनिक उभी असलेली जमीन आणि पुरुष 'कर्ता' असलेली घरं आतून दुभंगली आहेत; झाडाच्या मुळांनी जमीन आणि सावित्रीच्या संस्कारांनी घरं अबाधित ठेवली आहेत! तेव्हा वटपौर्णिमा आणखीन पर्यावरण दिन दोन्ही साजरी करण्याची गरज उरणार नाही तो सुदिन लवकर येवो या 'सदिच्छे'सह आजच्या मुहूर्तावर हे मुक्त चिंतन...          


जन्मोजन्मी हाच पती मिळावा म्हणून
वडाला सुताचे बंडल गुंडाळणाऱ्या
रुढीग्रस्त सावित्रीच्या मनात आले...
'पुढल्या जन्मी भूमिका बदलल्या तर
गाठणार नाही मी सुताने स्वर्ग,
लादणार नाही तिच्यावर पातिव्रत्य
आणि सुटका करेन तिची
आणि रितीबद्ध वडाचीही...
एकाएकी!'