बंडूकाकांच्या कविता इत्यादीवर याव्यात ही आमची इच्छा फलद्रूप होतांना खरेतर काकांना सरप्राइज द्यायचे म्हणून त्यांची मदत घ्यायची नव्हती. पण यासाठी आवश्यक ऐवज आमच्याकडे लिखित स्वरूपात सापडेना झाला आणि स्वत:च्या स्मृतीच्या (किंवा ‘भक्ति’-’भावा’च्या?) भरवशावर उगाचच चुकीचे काहीही दडपून छापून टाकायला हे काही कुणाचे मुखपत्र नसल्याने, काकांकडूनच या कविता संवादून घ्यायचे ठरले. काकांच्या या दुसऱ्या कवितेला निश्चितच अजून किमान दोन कडवी आहेत याची आम्हाला खात्री होती, पण काकांना त्या दिवशी या दुसऱ्या कवितेची एकूण तीनच कडवी आठवली. तथापि काकांचा सुपुत्र तन्मय याने काकांना आठवण करून दिल्याने उर्वरित तीन कडव्यांबद्दल काकांची खात्री झाली आणि आमचे समाधान!
मग त्या दडून बसलेल्या तीन कडव्यांची शोध मोहीम सुरू झाली आणि शेवटी काकांनाच त्यांच्या एका जुन्या वहीत ही संपूर्ण कविता सापडली आणि आम्हा सगळ्यांना ‘आज मुझे उस बूढ़ी अलमारी के अन्दर पुराना इतवार मिला है...!’ असे ‘गुलजार’ फिलिंग आले. शिवाय काकांच्या पहिल्या कवितेच्या निमित्ताने सुरू झालेल्या ‘डाऊन द मेमरी लेन...’ प्रवासात दरम्यान अनेक सहप्रवासी सामील झाले आणि अनेकानेक गतस्मृतींना उजाळा मिळाला. या समुद्रमंथनातून अर्थातच अनेक रत्ने हाती लागली, त्या साऱ्यांना देखील इत्यादीवर मानाचे पान यथावकाश मिळेलच; तूर्त काकांची दुसरी कविता...
या कवितेच्या जन्माची कथा मोठी रंजक असली तरी काका ती जशी खुलवून सांगतात तशी मला शक्य नसल्याने आणि माझ्या प्रतिभेच्या(?) मर्यादांची मला पुरेपूर जाण असल्याने मी अधिक फुटेज न खाता फक्त एवढेच सांगतो की ही कविता काकांनी चक्क इरेस पडून केली आहे. ‘कविता करणे ऐऱ्यागैऱ्याचे काम नव्हे, त्यासाठी दैवी प्रतिभा लाभावी लागते’ अशी अंधश्रद्धा (‘श्रद्धा डोळस कशी असेल, ती अंधच असावी लागते...’ इति काका!) बाळगणाऱ्या आणि त्या काळी गाजणाऱ्या (आणि आजही एक मानदंड असलेल्या) एका अत्यंत लोकप्रिय गझलेचे, ते जणू काही पसायदानच असावे अशी भलामण करत असलेल्या एका भक्ताच्या उद्बोधनासाठी अक्षरश: बसल्या बसल्या कागद पेन मागवून काकांनी ही गझल लिहिली आहे...
अशा तऱ्हेने जन्मलेल्या या नितांतसुंदर गझलेचे, काळाच्या ओघात राहून गेलेले, नामकरण करण्याची आणि तिला गीताचे रुपडे देण्यासाठी धृवपद आणि कडवी अशी रचना करण्याची क्रिएटिव्ह लिबर्टी (??) मी काकांच्या अनुमतीने घेतली आहे, त्यात काही न्यून आढळल्यास तो सर्वस्वी माझा दोष असल्याने मूळ रचनेच्या रसपरिपोषात त्याचा अडथळा मानू नये. आज सादर आहे काकांची ही दुसरी अभिजात रचना…
रात्र
निःशब्द यातनांना भेदून रात्र गेली II धृ II
माझ्याच मंचकी या जागून रात्र गेली II १ II
दारात स्वप्न तोरण बांधून रात्र गेली II २ II
त्या सर्व भावनांना स्पर्शून रात्र गेली II ३ II
निद्रेस दूर तेव्हा पळवून रात्र गेली II ४ II
'येते पुन्हा उद्या मी' सांगून रात्र गेली II ५ II