मंगळवार, १८ ऑगस्ट, २०१५

ठिकरी...!



एका रिकाम्या रविवारी...
जुने कपाट आवरायला घेतले तर…
अवचित येऊन बिलगले माझे बालपण...!

सापडला एका काचेच्या बरणीत
बंद असलेला खजिना…
काही टवके उडालेल्या गोट्या,
थोडे चिंचोके आणि
कसल्या कसल्या बिया...
एक ठिकरी आट्यापाट्यांची,
चुकीच्या घरात पडल्यासारखी…

…आणि सापडली एक खाकी वही
निळ्या निळ्या रेघांची...!
काही निळी ओळखीची अक्षरे सुद्धा
आता पुसट झालेली…

एक इवलासा पेन्सिलचा तुकडा होता...
शार्पनर मध्ये अडकलेला,
श्वास अडकवा तसा…


एक चेंडूही होता...
अजूनही अंगावर अंगणातली माती वागवणारा
बरोबर खेळून खेळून सोलली गेलेली बॅटही होती…
लहानपणीचे अंगणच भेटले जणू…!

खूपश्या रिकाम्या आगपेट्या,
आगगाडीच्या सुटलेल्या डब्यांसारख्या...
आणि सापडले एक वर्षानुवर्ष वापरलेले
शाळेचे पांढरे स्वेटर,
आता विरलेले आणि जुनाट झालेले…
माझ्यासाखेच...!

होता एक कचकड्याचा चष्मा, 
यात्रेत घेतलेला…
खूपशी रिकामी पाकिटं…
तिकिटांसाठी जमवलेली...
अजूनही वेगळे पाकीट होते,
पोस्ट करण्याची वाट पहाणारे…

एक सापडले जुने बंद घड्याळ,
हट्टाने बाबांकडून घेतलेले...
आजोबांचे ढापलेले फाउंटन पेन,
आता निब तुटलेले…
आणि आजीने बारश्याला दिलेले
वाळेही होते, आता काळे पडलेले!

आज जाणवले असे कि
जगण्याचा तोल सांभाळतांना…
वर्षांचा हिशोब आटोपला
निरागस 'मी'पण हरवतांना…

किती दिवसांनी भेटले बालपण,
सुखावून गेले जातांना…
नात्यांच्या तडजोडी निमाल्या
मिठीत त्याच्या विसावतांना…!


गुलजार सरांच्या ८१ व्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या 
'आज मुझे उस बुढी अलमारी के अंदर…' रचनेचा
करुणा गोविंद कुलकर्णी यांनी लिहिण्याच्या पहिल्याच प्रयत्नात केलेला भावस्पर्शी मुक्त भावानुवाद…!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा