रविवार, १८ ऑक्टोबर, २०२०

मास्क...!



अलीकडे बोलत नाहीस म्हणे...

मास्क लावलाय ना जीव वाचवण्यासाठी... स्वत:चा; आत्मनिर्भर असायला हवे म्हणून!
तसा लावला कधीचाच आहे, आज दिसतोय सगळ्यांना... उघड उघड, एकमेकाचा 

म्हणजे असं बघा साधारण चलन आलं चलनात आणि
दळणवळण सुरू झालं... आडवळणानं, तेव्हापासून घालतोय मुखवटा!
आता तो मास्क म्हणून केवळ लब्धप्रतिष्ठितच नाही तर 
ब्रँडेड, अनिवार्य, कायदेशीर आणि वॉशेबल ही झाला! 
त्याच्याशिवाय जगायच म्हटलं तर होतो मुजोर कायदेभंग 
आणि एकटे पडण्याचा धोका... तो वेगळाच
काही बोलावे म्हणून तोंड उघडलं तर नुसतच मायमिंग... 
शब्द गिळावेच लागतात, काढयासोबत 
पण नाहीतरी बोलण्याची मुभा सगळ्यांना होतीच कधी...?
आणि बोललीच समजा उसासून...
ऐकतयं कोण आणि समजतयं कुणाला? 

धून वही सुनाई देती है जंहा ध्यान लगा हो!
बाकी... इतना सन्नाटा हमेशाका है भाई! 
बरं अस्वस्थ वर्तमानाचं भविष्यातील इतिहासासाठी चित्रण करावं तर,
कागद एसीतल्या कार्पोरेटचा आणि शाई उन्हात राबत्या मजूराची... 
कशी व्हावी युती आणि कशी घ्यावी आघाडी?
थोडे आगाडी बाकी पिछाडी अन चलती का नाम गाडी
असंच चाललंय युगानुयुग...

शेवटी तीनच चेहरे खरे... ययाती, देवयानी आणि कचाचे;
बाकी सगळेच मुखवटे 'कच'कड्यांचे... शुक्राचार्यांसह!
 
आणि लिहिलाही समजा इतिहास आजच्या वर्तमानाचा,
उद्याच्या भविष्यासाठी... कुणी काही शिकेल म्हणता...?  
अहो, जो ‘जाणता माणूस’ स्वत:च्या उत्क्रांतीपासून आणि
अनेकानेक राज्यक्रांत्यातून तर सोडाच,
अजूनही ज्याच्या सावटाखाली वावरतोय त्या
स्थानबद्ध साचलेपणातून काही शिकतांना दिसत नाही,
तो आपण ‘जाणते’ कसे झालो आणि नेणतेपणी 
उलट्या प्रवसास का लागलो समजून घेईल म्हणता?
नाव नको...!

तरी आशा सोडून चालणार नाही... 
'रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उष:काल...' एक कवि म्हणतो
आणि दुसरा म्हणतो ‘अरे, पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली...’
मग उमेद हरून आणि प्रयत्न सोडून कसे चालेल?

मी नाहीच सोडलीय आशा आणि थोडी धुगधुगी आहे...
अजूनही उमेदीत शिल्लक... 
फक्त कधीतरी खूप विषाद दाटून येतो
माणुसपणाचा... अमानुष होतांना!
मग उचलावा वाटतो छिन्नी हातोडा, 
नको तो भाग फोडून काढण्यासाठी
आणि घडविण्यास ते शिल्प...
जे ‘माणूस’ शब्दात पहिले असेल नियतीने!

बघू, जमेलही म्हणे कधीतरी, कुणी सांगावं...!

४ टिप्पण्या:

  1. पाश्चात्य देशांत मुखवट्याला मास्कच म्हणतात ना ,बहुतेक ❓त्या दृष्टीनेही समर्पक. आपण सारी माणसे आहोत की मास्क ❓अशी मायावी परिस्थिती!
    मलाही असंच जाणवतं, हे वाचकाला वाटणं हे साहित्याचे यश. ही यशस्वी निर्मिती आहे. 🌹

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. मनापासून धन्यवाद! वाचक, रसिक रचनेशी तादाम्य पाऊ शकणे याहून निर्मितीची अधिक फलश्रुती नाही...! स्नेह आहेच तो वृद्धिंगत व्हावा आणि सौहार्द वाढावे. शुभम् भवतु!

      हटवा
  2. यात काय संशय...? ज्या सुर्याच्या परावर्तित किरणांनीसुद्धा चंद्र प्रकाशतो त्या सुर्याच्या तेजाचा परिचय द्यावा लागतो होय...?

    उत्तर द्याहटवा