रविवार, २९ नोव्हेंबर, २०२०

दुभंग


चित्रपट या सर्वात लोकाभिमुख आणि लोकप्रिय प्रबोधन मंचावर बुद्धीचा कस आणि जाणिवांची मशागत करीत पोसलेल्या समाजाला, ‘मेरे पास मां है...’ चा सोयीस्कर विसर पडला पण ‘जब तक एक भाई बोल रहा है एक भाई सुन रहा है, जब एक मुजरीम बोलेगा तब एक पुलीस अफसर सुनेगा...!’ यातील दुभंग मात्र चांगलाच मानवला. म्हणजे एकतर भावनावश होऊन इमोशनल ब्लैकमेल नाहीतर थेट कर्तव्य कठोरता... एक संवेदनशील माणूस दुसऱ्या संवेदनशील माणसाशी केवळ माणूस म्हणून, कुठलीही संधी न साधता, थेट संवाद साधू शकत नाही...?

नैतिकता, सचोटी, नीतिमूल्ये अशी सामाजिक लक्षणे कधीच कालबाह्य झाल्याने व्यवहारात कुचकामी ठरु लागली आणि बाजारशरणता, नफेखोरी, चंगळवाद आणि या सगळ्याला एका सूत्रात बांधून आधुनिक जगण्याची जणू काही संहिताच ठरलेली ‘हमाम मे सब नंगे...’ ही प्रगत मान’सिक’ता ‘नव-मूल्यव्यवस्थे’ची धरोहर ठरली. या व्यवस्थेमध्ये मूळ संतवचनाचा ‘एकमेका सहाय्य करू अवघे धरू कुपंथ किंवा होऊ श्रीमंत...’ असा पंथ-विचार प्रचलित झाला आणि नैतिकतेची केवळ व्याख्याच नव्हे तर परिमाण, आयाम आणि अर्थात परिणामही पूर्णत: बदलले.

अशा सभोवतालात, व्यक्ती, वृत्ती आणि कृती यात अभंग राहून, ‘मी आणि माझे कर्म’ म्हणजेच ‘माझे अस्तित्व आणि माझे कर्तृत्व’ या दोन निराळ्या गोष्टी नसून माझीच अभिन्न अभिव्यक्ती आहे असे मानणारे; तळ्यातल्या सुरेख  बदके पिल्लातले कुरुप वेडे पिल्लू ठरले नसते तरच नवल! स्वत:च्या सचोटीचा अभिमान बाळगणे म्हणजे अत्यंत मागासलेपणाचे लक्षण ठरणाऱ्या आजच्या अधिभौतिक काळात प्रामाणिकपणा जपणे हे निखालस धाडसाचे काम ठरावे... ही या सर्वात प्रगत जीव – होमो सेपियन अर्थात ‘शहाण्या माणसा’ची शोकांतिका!

सांप्रत सांस्कृतिक, सामाजिक आणि राजकीय विषयांवर अत्यंत निर्भीडपणे परखड भाष्य करण्याची एकही संधी न सोडणारे आणि समाजातील सर्व स्तरातील घडामोडींवर आपल्या चाणाक्ष नजरेने बारीक लक्ष ठेवून त्यातील विसंगतीवर प्रत्यही मर्मग्राही विवेचन करणारे आमचे धुळ्याचे सन्मित्र वैद्यराज डॉक्टर सचिन चिंगरे यांची एकूणच साहित्यिक प्रतिभा आणि विशेषत: काव्यप्रतिभा हा स्वतंत्र प्रबंधाचा विषय असल्याने प्रस्तुत प्रस्तावना आटोपती घेऊन मूळ विषयाकडे वळावे हे उत्तम. आज आमच्या या प्रिय वैद्यराजांची एक अगदी रोखठोक, करकरीत आणि प्रत्येक विवेकी माणसाला विचार करायला भाग पाडणारी आणि संवेदनशील माणसाच्या काळजाला हात घालणारी रचना... विकार मर्यादेपलीकडे बळावला की त्याला शल्यकर्म हाच उपाय याची जाणीव करून देणारी, कोडग्या समाजाच्या डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आणि सुखासीनतेला कडूजहर डोस पाजणारी...

एक नाजा़यज प्रिस्क्रिप्शन

उन्हाळा, हिवाळा, पावसाळा...
साऱ्या ऋतुंमध्ये तेवढ्याच घोटवलेल्या व्यावसायिक उत्साहाने ओथंबून 
तो येतो औपचारिक अदबीने माझ्या केबिनमध्ये. 
नीटनेटका पोशाख, चेहेरा व देहाच्या मर्यादित हालचाली,
भाषेची सफाई आणि विक्रेत्याला आवश्यक आग्रही वृत्ती नी आर्जव या आयुधांनी सज्ज! 
भांडवलशाहीचा दूत, जागतिकीकरणाचा प्रतिनिधी, चंगळवादाचा चेला, 
व्यापाराचा नोकर, आणि प्रवाहपतीततेचा एक संसारी गृहस्थ गुलाम! 
तो वितरण व प्रबोधनाची फॅन्सी झूल पांघरुन येतो. 
मी पोटापाण्याच्या धंद्याला सेवेचा पांढराशुभ्र मुलामा पांघरुन बसलेलो...

पावसाळ्यात डायरिया-मलेरिया, उन्हाळ्यात डिस्-युरिया (उन्हाळी लागणे), हिवाळ्यात न्यूमोनिया... 
साऱ्या रोग-राक्षसांवर चालणारी अस्त्रं दाखवतो त्याच्या भात्यातली.
पूर्वी मुली भरपूर होत्या तेव्हा उपवर कन्येची गरजू माता
मुलीत असले-नसलेले सारे गुण खुलवून सांगायची,
तसं तो कौतुक करतो त्याच्या कंपनीच्या औषधांचं...
कधी किंमत, कधी चव, कधी वेष्टन, कधी नाविन्य, कधी उपयुक्तता, कधी काही... 
मग त्याच्या मजबूत चामडी बॅगेतून तो काढतो काही सँपल्स् आणि 
फळविक्रेता फळं छान रचून ठेवतो, तशी लयबद्ध सराईतपणे मांडतो माझ्या काचेच्या टेबलावर. 
सणासुदीला तो आणतो मिठाई, कधी दिवाळीत दिवे, पणत्या,अत्तर, परफ्यूम. 
अधूनमधून आणतो तो छानश्या भेटवस्तू... 
कधी पेन, कधी फुलदाणी, कधी किचनवेअर 
सतत आठवण येण्यासाठी त्यावर छापलेल्या कंपनीच्या नावासह.

मग तो सांगतो मला काही प्रोफेशनल स्कीम्स. 
इतकं लिहिल्यावर इतके भरपूर.. 
तितकं लिहिल्यावर या वस्तू पुरेपूर
आणि तितकं टार्गेट केलंत तर बँकॉक पट्टाया सिंगापूर...
त्याच्या परीटघडीच्या वस्रांतून पाझरत असतो आसमंतात एखादा मंद व्यावसायिक सुगंध. 
त्याच्या आशाळभूत नजरेत चमकतात आकर्षक आमिषं.

तसं सोपं असतं!
अ‍ॅसिडिटी नसतानाही प्रत्येकाला लिहिली अँटासिड कॅप्सूल, 
किंवा कमतरता नसूनही प्रतिकारशक्ती वाढण्यासाठी लिहीलं एखादं सीरप, 
किंवा हिमोग्लोबिन कमी, अशक्तपणा पटवून देऊन लिहीलं एखादं टॉनिक 
सातत्याने, आयेदिन लिहीलं सर्वांना एखादं महागडं व्हिटॅमिन, किंवा प्रोटीन, 
तर अगदीच सोपं!
थेंबे थेंबे तळे साचे. 

पण नेमकं त्या क्षणी 
मला आठवतो जवळच्या खेड्यातून विश्वासाने लहानग्या नातवाला माझ्या दवाखान्यात आणणारा, 
भर उन्हात अनवाणी चालणारा कळकट मळकट पारधी पेरु भोसले... 
मला आठवते मायबाप सरकारच्या दोन चारशे रुपयांच्या पेंशनची चातकासारखी वाट पाहणारी 
आणि मग अशक्तपणासाठी एखादी 'शक्तीची सलाईन' लावून दे म्हणणारी भागिरथी आजी... 
किंवा डाळीसाळीच्या गुप्त डबाबँकेतून काढलेल्या दहावीसच्या नोटा पुन्हा पुन्हा मोजून,
चंची रिकामी करुन, मला देणारी एखादी गरीब मंगला गृहलक्ष्मी... 
कधी जुगारात हरलेल्याने निराश संथपणे पत्ते टाकावेत टेबलावर,
तसे जड हातांनी खिशातल्या आजच्या शेवटच्या नोटा काढून देणारा बाप राजू हमाल. 

त्यांना लिहू मी एखादं जास्तीचं औषध? 
त्यांच्या घाम रक्तावर की डोळ्यात तरळलेल्या पाण्याच्या इंधनावर 
उजळवू मी माझ्या उंची ऐषआरामी स्वप्नांचे दीप ? 
त्या अनवाणी, सायकलवर, लाल डब्याच्या एसटीत, 
जनावरासारखी माणसं कोंबलेल्या जीपगाडीत प्रवास करणाऱ्यांकडून
वसूल झालेल्या छोट्या छोट्या अनैतिक वर्गणीवर फिरु मी विमानात? 
त्या झोपडीवासियांच्या किंचित पण निरंतर शोषणाने फुलवू माझ्या बंगल्यात मी सुखाचा मळा? 

हिपोक्रॅटीस दु:खी होतो, भगवान धन्वंतरी डोळे वटारतो... 
नाही होता येत डॉक्टर आमटे, 
पण झालंच पाहिजे का डॉक्टर भामटे ? 
नाही तर नाही सिंगापूर 
पण होईल ना सहज शनी शिंगणापूर. 
आणी मी नम्रपणे नाकारतो ऑफर.
छोट्याश्या धैर्याने मी नाकारतो 
एक नाजा़यज प्रिस्क्रिप्शन...

...डॉ सचिन चिंगरे, धुळे 
७४९९६१३९१२, ९४२३४९३२१८

रविवार, २२ नोव्हेंबर, २०२०

कविता...!


दिवाळीचे चार दिवस आणि इतरही बऱ्याच वेळा माझ्या व्हॉट्सऍप स्टेट्स मध्ये ज्या सजीव चित्रांची मुक्त पखरण असते त्या कलाकृतींमागचा सर्जक हात आणि योगगुरू असलेला माझा बंधुसखा कुमार हा नेमस्त गृहस्थ एरवी गंभीर भासत असला तरी आयुष्याकडे बघण्याची एक अम्लान, निकोप आणि मार्मिक दृष्टी बाळगून आहे हे त्याच्या अत्यंत निकटवर्तीयांना चांगलेच ठाऊक आहे. हे महाशय कधीतरी कविताही करतात हे गुपित मी फारसं कुणाला सांगू नये असा त्याचा आग्रह असल्याने मी ते कुणालाच न सांगता फक्त इथे इत्यादीवर प्रकाशित करतोय कारण इकडे फारसं कुणी फिरकत नाही असं मी त्याला पटवलयं आणि त्यालाही ते पटलंय! 

तेव्हा, कुणाला काही कळण्याच्या आत पटकन त्याची एक छोटीशी कविता...

पाऊस माती वारा पाणी...
पक्षी गातात सुरेल गाणी...
हिरवा निसर्ग निळे आकाश...
थांबून जरा पाहू सावकाश...
अरे ही तर कविताच झाली...
लिहू चार ओळी खाली...
-
-
-
-
खालच्या ओळी नाहीच सुचल्या...
वरच्या ओळी चिंब भिजल्या...
एक गोष्ट मात्र जाणवली...
एखादीच ओळ अगदी मनातली...
-       वैभव पुराणिक, नासिक

रविवार, १५ नोव्हेंबर, २०२०

गोताखोर...?

मुलांचं 'करीयर' चांगलं घडावं म्हणून...
लहानपणापासून त्यांना दिवसभर कुठल्या ना कुठल्या...
क्लास, ट्रेनिंग किंवा डेव्हलपमेंट ॲक्टीव्हीटी मध्ये गुंतवून,
सतत घड्याळाच्या काट्याला बांधून घ्यायला लावून आणि
ते जे जे काही करतील त्यात पुढे (पुढे?) राहण्यासाठी...
एका निरंतर स्पर्धेच्या अंतहीन गर्तेत लोटून,
अष्टोप्रहर जिंकण्याचा विचार आणि
त्यासाठी लागेल ती तडजोड करण्याचे
बाळकडू पाजणाऱ्या पालकांनी,
‘बेटा, आज तरी लवकर घरी ये...’ किंवा
‘मुले आम्हांला वेळच देऊ शकत नाही...’
असे म्हणणे हे गोताखोराने,
'मला पोहण्याचा आनंदच घेता येत नाही...'
असे म्हणण्यासारखे नव्हे काय...?

...दिवाळीच्या सुट्टीमध्ये फराळासोबत तेवढचं बुद्धीलाही खाद्य;

'डाएट'वर असाल तर सोडून द्या... दीक्षित आणि दिवेकरांवर!

शुभ दीपावली!

रविवार, ८ नोव्हेंबर, २०२०

निर्गुण...?



बोलभांड ते चिडीचूप
अळीमिळी गुपचिळी
लोकशाहीची नवी खेळी
देखीली गा !

काळ आला वेळ आली
तसे धुरंधरही धारातिर्थी
लाभार्थी झाले शरणार्थी
एकाएकी !

चढती कमान उतरतेही
निसर्गचक्र वलयाकार
त्यात निर्गुणही साकार
कधी कधी !

बाजू पालटता 
बदलाचे वारे 
भासती न्यारे 
सर्वालागी !