तो म्हणाला, ‘नको! कारण, दोन गोष्टी – एक म्हणजे समारोप कधी लांबवू नये, निरोप नेहमी चटकन घ्यावा म्हणजे सहवासांच्या क्षणांचा मिळालेला आनंद दीर्घकाळ टिकतो. आणि दुसरे म्हणजे अंधाराची तमा त्यांना ज्यांना उजेडाची सवय आहे. माझ्यासारख्या जन्मांधाला कसला दिवस आणि कुठली रात्र, रात्रंदिन आम्हां तमाचाच सहारा...!’
त्याच्या स्वरातला विषाद मित्राला
हेलावून गेला आणि मैत्रीच्या पोटी असलेल्या मायेच्या उबेतून मित्र म्हणाला, ‘ठीक
आहे, जशी तुझी इच्छा पण थांब मी कंदील पेटवून देतो तेवढा सोबत ठेव म्हणजे माझ्या जीवाला घोर लागणार नाही.’
‘चेष्टा
करतोयस का? अरे जिथे मला दिसतच नाही तिथे कंदिलाचा उजेड काय प्रकाश पाडणार...?’ तो
म्हणाला.
‘मित्रा,
तुला दिसत नाही हे मान्य पण तुझ्या समोरून कुणी अंधारातून आला तर कंदिलामुळे त्याला
तर तू दिसशील...’
मित्राचा युक्तिवाद पटल्याने मित्राच्या इच्छेला मान देवून तो कंदील घेऊन मार्गस्थ झाला. रस्ता सवयीचा असल्याने तो झपाझप चालू लागला. बरेच अंतर पार केल्यावर आणि रात्र बरीच झाल्यावर अंधारातून अचानक कुणीसे त्याच्या अंगावर आदळले आणि तो भेलकांडला. अत्यंत सात्विक संतापाने तो ओरडला, ‘मुर्खा, दिसत नाही का...’
आपल्या अशा उद्धाराने
चिडलेला वाटसरू म्हणाला,
‘हेच मीही तुला विचारू शकतो, डोळे फुटलेत का तुझे...?’
‘अरे बाबा,
मी जन्मांध, माझे डोळे जन्मत:च गेलेले पण तुझ्या दृष्टीला काय झालं? तू तर बघू
शकतोस ना?’
‘हो तर,
मी बघू शकतो पण अमावस्येच्या रात्रीच्या एवढ्या मिट्ट काळोखात दिसायला दिव्यदृष्टी
नाही मला!’
‘मित्रा,
त्याची कल्पना आहे म्हणून मी हातात पेटता कंदील घेऊन चाललो आहे ना, त्याचा उजेड
नाही दिसला?’
‘कंदील?
कुठे आहे कंदील? अच्छा हा इकडे पडलेला होय?
त्याची वात केव्हाच निवलीय बुवा, तुम्हाला
पत्ताच नाही!’
अगदी कठीण अशा घटक चाचण्या (आठवा: लॉकडाऊन), सहामाही परीक्षा (बघा: कोरोना चाचण्या) आणि आता वार्षिक परिक्षा (पक्षी: लसीकरण) घेऊन त्याने आपली चांगलीच तयारी करून घेतलेली आहे. आता आपली तयारी कितपत झाली आहे याचीच खरी परीक्षा आहे. आपण आपल्या अंत:चक्षुनी गेल्या वर्षभरातील अनुभवांकडे डोळसपणे पाहून काही शिकणार आहोत की आपल्या चर्मचक्षुंना दिसते तेच खरे मानून आंधळेपणाने भौतिकातच गुंतून पुन्हा त्याच दुष्टचक्रात अडकणार आहोत हा निर्णय सर्वस्वी आपला आहे.
एक वर्ष सरते आणि दुसरे सुरु होते म्हणजे खरतर फक्त भिंतीवरचे कालनिर्णय बदलते. वर्ष ‘बदलले’ किंवा ‘नवे’ वर्ष सुरु झाले असे तेव्हाच म्हणता येईल जेव्हा आपला दृष्टीकोन बदलेल, सवयी बदलतील, जीवनशैली बदलेल. दिवस तर रोजच नवा असतो पण त्या नव्या दिवसाचे आपण काय करणार हा खरा प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर कुठल्याही पुस्तकात तर सोडा, गुगलकडे पण असू शकत नाही... ज्याचे त्यालाच शोधावे लागते. ज्याला सापडते तो सुखी-समाधानी होतो ज्याला नाही सापडत तो टीकाकार '(अतृप्त आत्मा?) होतो... बघा तुम्हाला कोण व्हायचे आहे?
...आणि हो, आपण जन्मांध असलो म्हणून काहीही बिघडत नाही, विवेकाने जगायला दूरदृष्टी लागते, डोळ्याने तर प्राण्यांनाही दिसते! दुसरे, आपल्या कंदिलाची वात विझली आहे हे समजायला उजेडाचीच गरज असते असे नाही, कंदिलाच्या काचेची ऊब कमी झाली यावरूनही ते समजायला हरकत नाही. पण त्यासाठी मन संवेदनशील हवे आणि जाणीवा प्रगल्भ... नव्या वर्षाचा कुठलाही दिखाऊ अल्पजीवी संकल्प करण्यापेक्षा हे साधता येईल...? आलेच तर सच्चिदानंद...
सरत्या वर्षाचा निरोप घेतांना त्याने दिलेला प्रकाश साठवून ठेवून स्वयंप्रकाशित होण्याचा प्रयत्न करू या... शुभम भवतु !
अगदी उत्तम !
उत्तर द्याहटवाधन्यवाद! आपला परिचय दिलाय तर आभार परिपूर्ण होतील...
हटवाआपला स्नेहांकित
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
हटवानमो बुद्धाय 🙏
उत्तर द्याहटवानमो मनीषाय
नमो सुविचाराय
नमो सुलेखनाय
नमो वाचकाय ! 🙏
हटवा