तरी आतां अवधानामृतें वाढ । सिंपोनि कीजो ।।१९।।
मग हें रसभाव फुलीं फुलेल । नानार्थ फळभारें फळा येईल ।
तुमचेनि धर्में होईल । सुकाळ जगा ।।२०।।“
आमचे आजोबा अण्णा अर्थात बापू केशव पुराणिक यांनी ‘केशवतनय’ या उपनामाने अध्यात्मिक, धार्मिक, शैक्षणिक तथा सामाजिक विषयांवर विविध साहित्यप्रकारात विपुल लेखन केले. अण्णांच्या समग्र प्रकाशित, अप्रकाशित साहित्याचे टंकलेखन करून आंतरजालावर सर्वांच्या संदर्भासाठी जतन करावे या आमच्या संकल्पनेला मूर्त स्वरूप मिळण्यास सुरवात झाली ती ‘गीत ज्ञानेश्वर’चे, केवळ टंकलेखनच नव्हे, तर एका छोटेखानी जाहीर कार्यक्रमात आमच्या मर्यादित क्षमतेत त्याचे सादरीकरण देखील करून! सदर कार्यक्रमाचे ध्वनिचित्रमुद्रण युट्युबवर उपलब्ध आहे, ते आपण येथे बघू शकता.
‘गीत ज्ञानेश्वर’ इतकीच किंबहुना त्याहून अधिक लोकप्रिय असलेली अण्णांची रचना म्हणजे ‘संक्षिप्त श्री गुरुचरित्र’! सरस्वती गंगाधर रचित मूळ गुरुचरित्राच्या सुमारे २५०० पाने इतक्या विस्तारामुळे आधुनिक जीवनशैलीत त्याचे पारायण करण्यास अडचण येत असल्याचे निदर्शनास आल्याने, अण्णांनी ७, ५ , ३ किंवा अगदी एकाच दिवसातही पारायण करता येईल असा श्री गुरुचरित्र सारामृताचा उपक्रम केला आणि ८०च्या दशकात तो अण्णांच्या हयातीत प्रकाशितही झाला. प्रकाशकाने नवीन स्वरुपात या ग्रंथाच्या अधिक आवृत्याही काढल्या तथापि त्या सर्वत्र सहज उपलब्ध नसतात असा अनुभव आहे.
गत दोन वर्षात विषाणू संकटाने साऱ्यांनाच बराच काळ गृहकैदेत रहावे लागले आणि बहुतांना नानाविध प्रापंचिक, व्यावहारिक कारणांनी मानसिक, शारीरिक अडचणींचा सामना करावा लागला. अशा अवघड काळात मनोबल उंचावण्यासाठी अनेकांनी आध्यत्मिकतेकडे कल वाढवला आणि नामस्मरण तथा पारायणाने चित्त शांत, शुद्ध होत असल्याने असे उपक्रम करण्याचा आलेख वाढलेला दिसला. तथापि, मुळातच दुर्मिळ झालेल्या केशवतनयकृत ‘संक्षिप्त श्री गुरुचरित्र’ ग्रंथाची छापील आवृत्ती या काळात मिळणे अधिकच दुरापास्त झाले. या निमित्ताने ‘संक्षिप्त श्री गुरुचरित्र’ ग्रंथाच्या टंकलेखनाचे कार्य सत्वर सुरु करावे जेणे करून भाविकांना तो सहज उपलब्ध होईल हा विचार बळावला.
अण्णांची नातसून सौ. करूणा मनीष पुराणिक हिने, मार्च २०२१ च्या सुमारास सुरवात केलेले या ग्रंथाच्या टंकलेखनाचे काम, सुरवातीचा काही भाग संगणकावर व नंतरची सुमारे २०० पाने स्मार्टफोनवर, असे गेल्या ९ महिन्यात अत्यंत चिकाटीने पूर्ण केले. टंकलेखनाच्या तपासणी आणि सूचनांचे काम, अण्णांचे नाशिकस्थित नातू श्री. वैभव शामकांत पुराणिक व सौ. स्वाती वैभव पुराणिक या उभयतांनी नेहमीप्रमाणे अतिशय निगुतीने व तत्परतेने केले. आमचे तीर्थरूप, अण्णांचे सुपुत्र श्री. शशिकांत बापू पुराणिक यांनी आपल्या बहुमूल्य मार्गदर्शनाने सर्व दुरुस्त्यांसह ग्रंथ योग्य स्वरूपात तयार झाला आहे याची फेरतपासणी केली. सदर ग्रंथ पीडीएफ तथा मुद्रित स्वरूपात सुवाच्य व सुबक दिसावा म्हणून त्याच्या सुशोभीकरणाचे छोटेसे पोषाखी काम करून अस्मादिकांनी या सागरी सेतू बांधण्याच्या कामातील आपला खारीचा वाटा उचलला.
हा उपक्रम सुरु करतांना तो कधी पूर्ण होईल, कसा पूर्ण होईल याचा अंदाज नव्हता परंतु दत्तगुरूंच्या कृपेने आणि अण्णांसह साऱ्याच थोऱ्यामोठ्यांच्या आशीर्वादाने, मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी आणि चंपाषष्ठीच्या कुळधर्माच्या मुहूर्तावर हे कार्य सिद्ध झाल्याने दुग्धशर्करा योग जुळून आल्याचे अतीव समाधान वाटले. या समाधानाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी, केशवतनयकृत ‘संक्षिप्त श्री गुरुचरित्र’ ग्रंथाचे सात दिवसांचे पारायण करून दत्तजयंतीला समारोप करणाऱ्या भाविकांची सोय व्हावी या विचाराने ग्रंथाच्या डिजिटल आवृत्तीचे प्रसारण आजच्या मुहूर्तावर करून हा कपिलाषष्ठी योग साधावा म्हणून हा प्रपंच!
अत्यंत निर्मळ भावनेने आणि सद्हेतूने आम्ही आमच्या अल्पमतीनुसार आणि मर्यादित क्षमतेत केलेल्या या छोट्याशा प्रयत्नाचे स्वागत होईल आणि त्यात काही न्यून राहिले असल्यास त्यास सर्वस्वी आम्ही जबाबदार असून कुणीही कसलीही चूक, उणीव अथवा न्यून सप्रमाण दाखवून दिल्यास त्याचे त्वरित निराकरण करण्यास आम्ही तत्पर आहोत.
या निमित्ताने सुरु झालेल्या ‘केशवतनय’ साहित्य संवर्धन अभियानास सर्वांच्या सहभाग, मार्गदर्शन आणि आशीर्वादाची नितांत गरज आहे. आम्ही सर्वांस या निमित्ताने विनंती करतो की आपल्याकडे अण्णांचे म्हणजेच बापू केशव पुराणिक अर्थात ‘केशवतनय’ यांचे कुठलेही प्रकाशित, अप्रकाशित साहित्य, माहिती, पत्रे, चित्रे किंवा इतर कुठल्याही स्वरुपातील काहीही ऐवज असल्यास कृपया आम्हाला कळवावे व आपण या अभियानात कुठल्याही प्रकारे सक्रिय सहभाग घेऊ इच्छित असल्यास त्याचा तपशील द्यावा.
अण्णांचे साहित्य संचित आंतरजालावर जतन करण्याच्या कामी दत्तगुरूंची कृपा आणि अण्णांचे आशीर्वाद आहेतच, आपले सर्वांचे स्नेहाशीर्वाद लाभल्यास कार्य सिद्धीस नेणे कठीण नसावे.
शुभम भवतु !
संवत्सर प्लव, शके १९४३, मार्गशीर्ष नवमी रविवार, १२ डिसेम्बर २०२१ - सदर पीडीएफ आवृत्ती येथे वाचू शकता - https://drive.google.com/file/d/1fZxNgkuMhem-fwPa6Ai253Nm2XxOjDkj/view?usp=sharing