आमचे
कवीमनाचे सन्मित्र दिनेश हे किती रोमॅंटिक आहेत याचा दाखला देण्यासाठी त्यांनी स्वत:च्या
विवाहासाठी निवडलेली तारीख पुरेशी ठरावी – २१ डिसेंबर – वर्षातील सगळ्यात मोठी
रात्र असलेला दिवस !
काल
त्यांच्या यशस्वी सहचर्याची तब्बल २२ वर्षे पूर्ण झाली. या सूज्ञ, समंजस आणि
समन्वयी सहजीवनाने त्यांना काय दिले याचा सुंदर आलेख अर्थातच एका उत्कट व भावविभोर
काव्यपुष्पातून ऋतुचक्राच्या रुपकाद्वारे त्यांनी मांडला.
एरवी
बहुदा वैयक्तिक वेदनेच्या स्वमग्नतेत गुरफटलेली त्यांची अभिव्यक्ती या निमित्ताने मोकळा
श्वास घेऊन, त्यांच्याच ‘वय...’ या आणखी एका अभिजात कवितेच्या तोडीची रसभरीत आणि
साक्षात्कारी अनुभूती ठरली.
या
निमित्ताने सौ. वहिनींचे अर्थात शिल्पा मॅडमचे अनेक कारणांसाठी आभार मानावे
तितके थोडे ! तथापि एका अतिविशिष्ट कारणासाठी त्यांचे आभार मानणे या प्रसंगी केवळ औचित्याचेच
नव्हे तर आत्यंतिक आगत्याचे ठरावे, ते म्हणतात ना, ‘मौकाभी है और दस्तूर भी...’
अगदी तस्सेच... तंतोतंत !
आमच्या
सन्मित्राच्या आयुष्यातील वहिनींच्या आगमनाने आम्हाला आमच्या बालमित्रात दडून
बसलेल्या कवीचे प्रच्छन्न आणि सुभग दर्शन झाले आणि त्यानिमित्ते मराठी सारस्वताचा
कविधर्म वर्धिष्णू झाला...
“हें
सारस्वताचें गोड । तुम्हींचि लाविलें जी झाड ।
तरी आतां अवधानामृतें वाढ । सिंपोनि कीजो ।।१९।।
मग हें रसभाव फुलीं फुलेल । नानार्थ फळभारें फळा येईल ।
तुमचेनि धर्में होईल । सुकाळ जगा ।।२०।।“
तरी आतां अवधानामृतें वाढ । सिंपोनि कीजो ।।१९।।
मग हें रसभाव फुलीं फुलेल । नानार्थ फळभारें फळा येईल ।
तुमचेनि धर्में होईल । सुकाळ जगा ।।२०।।“
(॥ ज्ञानेश्वरी भावार्थदीपिका अध्याय ११ ॥)
‘तप्तपदी’ला
सप्तपदीत बसवून, (सं)वेदनांना सप्तरंगांच्या गोफात गुंफून, सप्तसुरात ‘मैने तेरे
लीयेही सात रंगके सपने चुने...’ गुणगुणणाऱ्या या सुविद्य, सुस्वभावी दांपत्याला
शतायुषी सहजीवनासाठी अनेकानेक शुभेच्छा...!
आणि
ज्यासाठी एवढे नमनाला घडाभर तेल घातले ती, सन्मित्र दिनाची सौ. शिल्पा वहिनींना
समर्पित केलेली ही प्रफुल्ल अष्टाक्षरी रचना... शब्द कवीचे असले तरी एकमेकाला
समजून-उमजून समरसतेने सहजीवन फुलविणाऱ्या प्रत्येक सहचरास यात आपल्या भावनांचे प्रतिबिंब
दिसल्यास ती कवीच्या प्रगल्भ जाणिवांची अभिव्यक्त समृद्धी...!
ऋतू
तुझे माझे
तुझी नजर शालिन
उरी कळ अनंताची
झाले मनांचे मिलन
साक्ष होती वसंताची
रक्तवेगी देह उष्ण
अंगभर सुख कळा
ग्रीष्म कोरडा बाहेर
सोसे त्याच्या उष्ण झळा
सुख दु:खाचा वर्षाव
अंगी घेत झालो चिंब
छत्री प्रेमाची जिरवी
पावसाचा वृथा दंभ!
दंव पहाटे रोज तू
कोजागिरी फुलविली
चंद्र शरद चांदणी
अवसेला मी अर्पिली
दिपोत्सव डोळ्यांत अन्
लाल बिंदी तुझ्या भाळी
हेमंताला दिली मीच
भेट रंगीत दिवाळी!
प्रेममूळ रुजे खोल
उमलले गोड फळ
आली तशीच जाईल
शिशिराची पानगळ
आले गेले किती तरी
साक्ष देईल ही धरा
नाते आपुले प्रफुल्ल
सांग ह्या ऋतूंना जरा!!
- दिनेश
मस्तच
उत्तर द्याहटवा