शुक्रवार, २१ जानेवारी, २०२२
ओवी-गीता
शुक्रवार, १४ जानेवारी, २०२२
संक्रमण
रविवार, २ जानेवारी, २०२२
संकल्प...!
विविध संस्कृतींमध्ये नववर्ष वेगवेगळ्या वेळी आणि निरनिराळ्या पद्धतीने साजरे होत असले तरी सध्या सर्वत्र प्रचलित असलेल्या ग्रेगोरियन दिनदर्शिकेनुसार १ जानेवारीला सुरु होणाऱ्या नवीन वर्षाचे वारे वाहू लागले की, त्या संस्कृतींच्या अंधानुकरणाने आपल्या मानसिक गुलामगिरीचे प्रच्छन्न दुर्दर्शन घडवीत न चुकता(?) करायची पहिली गोष्ट म्हणजे थर्स्टी फर्स्टची पार्टी आणि दरवर्षी न पाळण्यासाठी करण्याची दुसरी गोष्ट म्हणजे तेच ते संकल्प... शिळ्या कढीला नव्याने उकळी आणावी तसे! (बाय द वे, 'संकल्प' हे करतांनाच 'सोडा' असे म्हणतात याला काय म्हणावे?) आपल्या संस्कृतीमध्ये नित्योपासनेचे महत्व अनुभवसिद्ध असल्याने, वर्षाच्या सुरवातीला आरंभशूरपणे संकल्प करून, सकाळी बोललेले दुपारी विसरण्याची राजकीय सोय अंगी बाणवल्याप्रमाणे, ते सिद्धीस नेण्याऐवजी स्वत:ची वृद्धी सांभाळण्याची स्वकेंद्री वृत्ती बळावण्याचे खर तर काहीच कारण नाही... पण लक्षात कोण घेतो?
कालच, 'काय म्हणतोय तुमचा नवीन वर्षाचा संकल्प?' या उत्सुक प्रश्नाचे उत्तर देतांना आम्ही ज्या 'फोमो'च्या प्रादुर्भावाचा उल्लेख केला त्याचेच एक लक्षण म्हणजे अशा अयोग्य, अस्थानी आणि अनिष्ट 'शिष्टा'चारांच्या चालीरीती होणे. काय सांगता, 'करोना' आणखीन 'ओमायक्रॉन' मलेरियाचे डास ठरावे एवढ्या वेगाने फैलावणाऱ्या आणि अनेक दुर्धर मानसिक आजारांचे केंद्र असलेला 'फोमो' तुम्हाला माहीत नाही? अहो, 'फिअर ऑफ मिसिंग आऊट'! आणि याची चाचणी अगदी मोफत आणि सुलभ आहे. शिवाय चाचणी हाच उपचार असलेला हा माणसाच्या ज्ञात इतिहासातला एकमेव विकार असावा. तुम्हाला 'फोमो'ची लक्षणं आहेत का हे तपासून पाहण्यासाठी एवढेच करा... सुमारे ३० मिनिटे कुठल्याही प्रकारच्या समाजमाध्यमापासून दूर रहा... श्वास जड झाला, हातापायाला कंप सुटला, घशाला कोरड पडली, जीव घाबरा झाला, घाम फुटला तर घाबरून जाऊ नका, फोन हातात घ्या. आराम पडल्यास अभिनंदन! तुम्हाला बीपी, शुगर, थायरॉईड कसलाही त्रास नाही... फक्त 'फोमो' आहे.
असो, वर्षाची सुरवात (तरी) टीकेच्या भडिमाराने नको, उगाच लोकांच्या संकल्पात मोडता घातल्याचे पाप लागायचे... इट्समायसीन म्हटल्यासारखे ! तर मुद्दा होता संकल्पाचा ! मूळ विषयाला बगल देऊन भलत्याच विषयाचे चऱ्हाट लावायला जे मार्केटिंग (की सेलिंग?) स्किल्स लागतात ते या जन्मात तरी जमणे नाही, तेव्हा आपल्या नेहमीच्या आत्मघातकी 'एक घाव दोन तुकडे' स्टाईलने विषय संपवावा हे उत्तम... गेल्या सुमारे ३० वर्षांपासून ('जबसे होश संभाला है...' म्हणायची सोय नाही, कुठे सांभाळता येतोय अजून तरी?) आमचे संकल्प आमच्या कवितांतून वेळोवेळी जाहीर झाले आहेत आणि बहुतांना ते अगदी स्वप्नील, बाळबोध किंवा थेट वेडगळही वाटले आहेतच. त्यामुळे आज हा दोष स्वतः:कडे न घेता एका अज्ञात कवीने आमच्याच संकल्परुपी भावना अत्यंत प्रत्ययकारी पद्धतीने मांडल्या आहेत, त्याच आमचा आजीवन संकल्प म्हणून सादर करतोय... मुळात दिवाळीच्या शुभेच्छा म्हणून प्रसारित झालेल्या या प्रेरणादायी आणि विलक्षण महत्वाकांक्षी रचनेमागील संवेदनशील मनाचा आम्हाला अद्याप शोध लागू शकलेला नाही. आपणापैकी कुणाकडे याबद्दल काही सप्रमाण माहिती असल्यास कृपया कळवावी म्हणजे ज्याचे/जिचे श्रेय त्याला/तिला सन्मानपूर्वक देता येईल.
संपू दे अंधार सारा
उजळू दे आकाश तारे
गंधाळल्या पहाटेस येथे
वाहू दे आनंद वारे….
जाग यावी सृष्टीला की
होऊ दे माणूस जागा
भ्रष्ट सारे नष्ट व्हावे
घट्ट व्हावा प्रेम धागा…
स्वच्छ सारे मार्ग व्हावे
अन् मने ही साफ व्हावी
मोकळ्या श्वासात येथे
जीवसृष्टी जन्म घ्यावी…
स्पंदनांचा अर्थ येथे
एकमेकांना कळावा
ही सकाळ रोज यावी
*माणसाचा देव व्हावा…
*देव झालेल्यांचे / ठरविले गेलेल्यांचे पायही कसे मातीचेच आहेत अन विकारही किती (अ)मानवी आहेत हा ताजा इतिहास बघता शेवटच्या ओळीत फक्त थोडा बदल सुचवासा वाटतो...
'अन् पशूचा माणूस व्हावा...!'