शुक्रवार, २१ जानेवारी, २०२२

ओवी-गीता


आमचे आजोबा अण्णा अर्थात बापू केशव पुराणिक यांच्या केशवतनय या उपनामाने केलेल्या प्रकाशित, अप्रकाशित लेखनाचे टंकलेखन करून आंतरजालावर सर्वांच्या संदर्भासाठी जतन करण्याच्या आमच्या उपक्रमास व्यापक जनाधार मिळेल तेव्हा मिळो, तूर्तास त्यास ‘विद्या’धार मिळाल्याने अण्णांची तिसरी लोकप्रिय रचना ‘ओवी-गीता’ आज माऊलीचरणी समर्पित करण्याची संधी मिळत आहे !

ज्ञात मानवी इतिहासात, देवाचे मानवीकरण आणि मानवाचे दैवीकरण जेथे एकत्रित पाहता येते आणि षड्-रिपुग्रस्त मानवी आयुष्याचे कालातीत तत्वज्ञान जेथे सहज सुगम भाषेत प्रत्ययास येते असा महाभारत हा एक अद्भुत ग्रंथ ! यातील ‘गीतासार’ हा अलौकिक मूलमंत्र जो जगभर प्रचलित आहे. अनेकांच्या आयुष्याची धारणा आणि धर्माचा आधार असलेली गीता साध्या-सोप्या मराठीत ओवीबद्ध करून नित्यपठणासाठी सार्थ करण्यासाठीचा हा प्रयत्न त्याच्या सद्हेतुसह समजून घ्यायला हवा म्हणून लेखकाचे मनोगत समाविष्ट केले आहे, ते जरूर वाचावे. 

या रचनेच्या टंकलेखनाची संपूर्ण जबाबदारी स्वयंप्रेरणेने स्वीकारून अत्यंत निष्ठापूर्वक पार पाडल्याबद्दल अण्णांची ज्येष्ठ नात सौ. विद्या मदन कुलकर्णी [पूर्वाश्रमीची विद्या  शामकांत पुराणिक] म्हणजेच आमची विद्याताई आणि तिचे यजमान आणि आमचे जावई-कम-स्नेही श्री. मदनराव कुलकर्णी या उभयतांचे आम्ही ऋणी आहोत तसेच त्यांना तांत्रिक बाबींमध्ये मोलाची मदत करणारे त्यांचे सुपुत्र हर्षद कुलकर्णी याचेही मन:पूर्वक आभार ! कुलकर्णी परिवाराने सश्रद्धतेने केलेल्या कामाच्या तपासणीची चोख जबाबदारी पुराणिकांकडून पुन्हा एकदा अण्णांचे नाशिकस्थित नातू श्री. वैभव शामकांत पुराणिक व सौ. स्वाती या उभयतांनी निगुतीने पार पाडली. 

विद्याताईच्या आध्यात्मिक ओढीची अशी आत्मिक अनुभूती आमचे मनोबल उंचावणारी आणि आमच्या या उपक्रम-निश्चयांस अधिकच दृढता देणारी ठरली. गीतज्ञानेश्वरच्या निवेदनातील ताईची उत्स्फूर्तता यावेळी तिच्या टंकलेखनाच्या कौशल्यातही प्रतीत झाल्याने सदर टंकलेखनाच्या तपासणीचे काम सुकर झाल्याचा अनुभव आहे. अर्थात या कामातील आमचा वाटा आता खारीचाही नसल्याने ‘मुंगी होऊन साखर खाणे…’ म्हणजे काय याची आम्ही सदेह प्रचिती घेत आहोत. श्रीमदभगवद्गीतेचे रसाळ आणि सुबोध निरूपण करणाऱ्या माऊलीच्या चरित्रांस ‘मुंगी ऊडाली आकाशी…’ संबोधण्यामागची प्रेरणा अशीच असावी का…?

असो. तूर्तास तरी विषयांतर नको, याबद्दल पुन्हा कधीतरी… 

ओवी-गीतेच्या पीडीएफ प्रतीचा दुवा -

शुभम भवतु !

संवत्सर प्लव, शके १९४३, पौष संकष्टी चतुर्थी शुक्रवार, २१ जानेवारी २०२२.

1 टिप्पणी:

  1. वाहव्वा !!!👏🏼👌🏼
    असं म्हटलं जातं की, हजार मैलांची गोष्ट व्यर्थ आहे एक पाऊल चालण्यापुढे ! आजोबांचा ध्यास परीपूर्ण स्वरूपात आकारात आलाय म्हणजे हजारो मैलांची दौड यशस्वी झालीय. सर्व काही लीनतेने , अहं करोति इति यास बाजूला सारून इदम् न मम या भावनेने समर्पण वृत्तीनं सादर होण्यातला आनंद विशेष आहे. पुनरूज्जीवन करणे हे शिवधनुष्य होतेच व ते लीलया पेलण्यातली शान काही औरच आहे. आनृण्यम् म्हणजे ॠणांची परतफेड. माणूस जन्माला येतो ते देवॠण, पितृॠण,समाजॠण वगैरे घेऊनच. त्यास उतराई होणे ह्याची संधी मिळणे व त्याचंही सोनं करता येणं यातून आजोबॠणानं सालंकृत व्हावं हा ईश्वरीसंकेत सिद्धिस जातो आहे यापरता आनंद कोणता !!!! कुटुंबातील सर्वांचंच योगदान भगवंतदरबारी ॠजू होणार. लीनतेतल्या शालीनतेनं उपक्रमास कृतकृत्यतेची झळाळी लाभणार हे निर्विवाद ! आगळंवेगळं गवसल्याचा आनंद साधकास सिद्धिपर्यंत नेतो तेव्हाच, जेव्हा घेतलेली मेहनत प्रसिद्धिपराॾमुख राहण्यात धन्यता मानते. आजोबांच्या ॠणातून मुक्त होण्यापरीस ते ॠण शिरी मिरवण्यात ज्यांनी इप्सित शोधलंय अशा सर्वांना शुभेच्छा!

    मन्नेप्सितकामनासिद्धिरस्तु ❗❗🙏🏻👏🏼👌🏼
    ---------------------------
    आमचे परममित्र रामचंद्र त्र्यंबक जोशी ह्यांची मौल्यवान प्रतिक्रिया....🙂🙂👆
    - विद्याताई
    ----------------------------------------------------------

    उत्तर द्याहटवा