रविवार, १९ मार्च, २०२३

अप्रूप…!


माणूस संपर्कात येतो. व्यावहारिक कारणांनी परिचय होतो.
काही सामाईक गोष्टींनी ओळख वाढते. हळूहळू स्नेह जुळतो.
मग कधीतरी कुठल्यातरी विशिष्ट आवडीचे धागे जुळतात.
ती आवड अभिव्यक्तीशी निगडित असेल तर गुंतणे सुखावह वाटते.
आणि अभिव्यक्ती काव्यरूप असेल तर त्या नात्याचे वेगळेच अप्रूप…!

वय वाढत जाते तशी संवेदनशीलता वाढणे, मन हुळहुळे होणे, जाणीवा अलवार होणे स्वाभाविकच. पण वाढत्या वयात मनोव्यापारांच्या अभिव्यक्तीचे साधन नित्य जोपासणे सहजसाध्य नव्हे.
कारण उमेद, उन्मेष, उत्साह, ऊर्जा… सहसा तरुणाईशी संदर्भित अशी ही लक्षणे.
ज्येष्ठांच्या ठायी ती आढळली की वाटते ते अप्रूप…!

स्वतःच्या पंचाहत्तरीला स्वरचित ९५ कवितांचे सचित्र पुस्तक, अत्यंत कल्पक तथा समर्पक नामकरणासह, केवळ खाजगी वितरणासाठी प्रकाशित करून स्नेह्यांना ते कॅनव्हासच्या लिफाफ्यात कुरियरने धाडण्याची कल्पना केवळ कवीमनालाच सुचू शकते.
यासाठी लागणारी चिकाटी, शिस्तप्रियता, नियोजन कौशल्य आणि संयम हे अप्रूप…!

अशा आनंदयात्रीच्या स्नेह्यांच्या यादीत आपली वर्णी लागणे, एव्हढेच नव्हे तर, प्रस्तावना लिहिण्याच्या प्रस्तावाला, आपला वकूब आणि मर्यादा ओळखून दिलेल्या सविनय नकाराची व्यथा देखील एका कवितेतून व्यक्त करून, मनी कुठला सल न बाळगता, आता पुस्तकावरील अभिप्रायाची प्रतिक्षा देखील कवितेतून व्यक्त करणे याचे अप्रूप…!

आजकाल काहीही, कधीही, कुठेही आणि कसही साजरं करण्याचं सर्वत्र फोफावलेलं फॅड आणि ‘रीएलिटी’चाही ‘शो’ करणाऱ्या प्रच्छन्न दिखाऊ जगात, कुणीतरी काही विशिष्ट क्षण संस्मरणीय करण्यासाठी करत असलेला प्रामाणिक आटापिटा आणि तो 'लाईव्ह' अथवा 'व्हायरल' न करता निवडक स्नेह्यांसोबत, हितगुज करावा तसा, साजरा करण्याची कल्पना याचे अप्रूप…!

‘अविनाश भोसेकर सर’ या आमच्या, ‘सुमंत्रच्या विनयाताईंचे यजमान’ या रूपाने परिचित आणि यथावकाश सुपरिचित झालेल्या चिरतरुण स्नेह्यांनी त्यांच्या पंचाहत्तरी निमित्त संकलित, संपादित आणि प्रकाशित करून आम्हाला सप्रेम भेट केलेले त्यांचे चित्ररूप ‘अविनाशी कवितांकुर...' हे आजचे खरेखुरे अप्रूप…!

यातील सर्व कवितांचे रसास्वादन करून त्यावर एक स्वतंत्र पोस्ट लिहिण्याचा मानस आहेच. आज, आपण उपभोगत असलेल्या सुख-सुविधांच्या महिन्याच्या बिलांव्यतिरिक्त आणि आपणच ऑनलाईन ऑर्डर केलेल्या सामानाशिवाय, काहीतरी अनपेक्षित, आपल्या ताजेपणाने ‘मना’ला प्रफुल्लित करणारे आणि निर्व्याज सुखावणारे पार्सल डिलिव्हर झाले याचा जेव्हढा आनंद तेवढेच… अप्रूप !

सरांना अखंड 'कवितांकुरा'साठी प्रवाही प्रतिभेच्या आणि निरोगी दीर्घायुष्याचा 'अविनाशी' शुभेच्छा !

शुभम भवतु !

२ टिप्पण्या:

  1. *- - - - अवाक - - - -*

    ब्लॉग वाचता *अवाक* झालो,
    आ वासला तोंडाचा 😮
    अंतर्मुख मी झालो सद्ध्या,
    आहे का मी ? या तोडीचा !! 1 !!

    मुकुट चढविला शिरावरती,🤴
    शीर झाले शिरजो र !
    कौतुकाचा पाऊस पडला,
    स्तुती-सुमनांची झालर !! 2 !!

    वाकुनी गेलो पूर्णतया मी,
    वर्णनाच्या भा-यानीं !
    खरंच ? आहे का, ही व्यक्ती मी,
    प्रश्न उमटला, चहु-बाजूनीं !! 3 !!

    *"तूला"* केली माझी तुम्ही,
    पारड्यात एका बसलो मी !
    पारडे झुकले कितीतरी खाली,
    ज्यात ठेविला ब्लॉग तुम्ही !! 4 !!

    चीज झाले, चीज केले,
    माझ्या अथक कामाचे !
    श्रम-परिहार अपसुक झाला,
    आभार किती मी, मानूं तुमचे !! 5 !!

    स्वप्नी माझ्या, प-या येतिल,
    ब्लॉग घेऊनी हातां त !
    एकवार मी वाचिन पुन्हा,
    मस्त त्यांच्या समवे त !! 6 !!

    एकवार मी वाचिन पुन्हा,
    मस्त त्यांच्या समवे त
    ☃️☃️☃️☃️☃️

    अविनाश
    🙏🙏

    उत्तर द्याहटवा
    प्रत्युत्तरे
    1. सर, 'अविनाशी कवितांकुर'च्या निमित्ताने झालेल्या, होत असलेल्या आणि होऊ घातलेल्या या अप्रकाशित कवितांचा आता आणखी एक संग्रह काढू या... 'काव्य-सृजन !'

      हटवा