सोमवार, १ मे, २०२३

...माझा !


कातळालाही बोलती करती लेणी
परंपरेचा वसा जणू पंढरीची वारी

बाणा रामशास्त्री अन् परखड वाणी
विवेक रक्षण्या लेखणीची मातब्बरी

शारदेचा वरदहस्त अन गंधर्वगान
गानकोकिळा शोभीवंत सूर-सागरी

फाळके-गदिमा-आचार्य अन पुलं-तें-नेमाडे  
खाशाबा-सचिन फडके पताका गगनावरी

उकडीचे मोदक मधुर पुरणपोळी सणावारी
वस्त्रांच्या महाराण्या राजस पैठणी नऊवारी

पसायदान, गाथा आणि शाहिरी
सर्वस्पर्शी आमची मुशाफिरी

गडकोटांचे भक्कम बुरुज ही खूण सुराज्याची 
जाणता राजा अन सुधारकांची फौज ही न्यारी 

इतिहास शौर्याचा तसा भक्तीचा
संस्कृतीची धुरा मराठी खांद्यावरी

सूज्ञ समावेशक आज्ञापत्रांचे पाईक होण्या 
महाराष्ट्र धर्म नांदत राहो समृद्धीच्या दारी...!

समस्त मराठी जनांस ६३व्या महाराष्ट्र दिनाच्या बाणेदार शुभेच्छा...!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा