गुरुवार, २९ जून, २०२३

' विठ्ठल '...!


विंदांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून २४ ऑगस्ट २०१७ ते २३ ऑगस्ट २०१८ या वर्षात, विंदांची 'रोज एक कविता' असा उपक्रम राबवितांना, कशा कुणास ठाऊक पण विंदांच्या काही अत्यंत मार्मिक आणि 'मना'ला अतिप्रिय असणाऱ्या कविता निवडायच्या राहून गेल्या, आवड आणि निवड यात कदाचित हाच फरक असावा ! 'गेले द्यायचे राहूनी...' ची ही आर्तता आज आषाढीच्या निमित्ताने अधिकच हुरहुरली ती चक्क विठ्ठलाची कविता या उपक्रमातून निसटल्याने !

श्वास देखील फार काळ धरून ठेवता येत नाही, तो ही सोडूनच द्यावा लागतो... पुन्हा श्वास घेण्यासाठी ! श्वास धरून ठेवण्याचा 'प्राणायाम' करण्यासाठी (सहज)'योग' साधावा लागतो आणि तो साधला तर (जीवन)'सिद्धी' अप्राप्य नाही एवढे सोपे अध्यात्म ज्याला कळले त्याला स्थूल-सूक्ष्माचा पोथीबाध्य उहापोह करण्याची गरज नाही.

विद्वानांनी पोथी-पुराणात कैद करून ठेवलेले अद्वैत तत्वज्ञान संतवाणीने जनसामान्यांसाठी सहज सोपे करून भक्तिरसात वर्णिले म्हणूनच तुक्याची गाथा इंद्रायणीत बुडवूनही लोकगंगेने तारली. त्याच संतसंप्रदायाचा वारसा सांगणाऱ्या साहित्यिकांनी आपल्या अत्यंत व्यावहारिक आणि मार्मिक प्रकटनातून हे तत्वज्ञान वाहते ठेवले.

अद्वैत सिद्धांताचे आणि, 'वेदांनाही नाही कळला अंतपार याचा...' या अध्यात्मिक प्रकटनाचे, जनसामान्यांस सुचेल, रुचेल आणि पचेल अशा सहज मार्मिक स्वरूपात निरूपण करणारी विंदांची ही रचना, आजच्या आषाढी एकादशीच्या निमित्ताने !

पंढरपूरच्या वेशी बाहेर
एक आहे छोटी शाळा..
सर्व मुले आहेत गोरी
एक मुलगा कुट्ट काळा...

दंगा करतो मस्ती करतो
खोड्या करण्यात आहे अट्टल...
मास्तर म्हणतात करणार काय ?
न जाणो , असेल ' विठ्ठल '...

- विंदा करंदीकर

सोमवार, २६ जून, २०२३

वसंत...!


मैफिलीत शेर तुझ्यावरचे, दाद मिळवित होते
क्षण दु:खी माझे.. गजलेस असे सजवित होते

निरोप घेतांना वळून पाहिलेस तू पुन्हा पुन्हा
यश हे प्रेमातले माझे असे घवघवीत होते

पाकळ्या डायरीतल्या देतात अजून ग्वाही
फूल तू माळलेले.. तेव्हा टवटवीत होते

रस्ते तुझे फिरुन झाले जगभरातले अनेकदा
पाय अनवाणी माझे तिच पायवाट मळवित होते!

कबुतरावर विसंबण्याचे गेले ते दिवस अखेर...
स्टेटस रोजचे... तुझी ख्याली खुशाली कळवित होते

ग्रीष्माने होता फुलविला मोगरा अनेकदा परंतु...
फुल तुझ्या केसातले आज...वसंतास जळवित होते!!

दिनेश
१४ एप्रिल २०२३ 

'मना'ने चिरतरुण असलेल्या सन्मित्र दिनेशला 
वाढदिवसानिमित्त त्याच्या या गझले इतक्याच रोमँटिक शुभेच्छा...!

रविवार, २५ जून, २०२३

ब्रिदिंग स्पेस...!


आजच्या दुभंगलेल्या काळात जगण्याची शैली प्रच्छन्न दांभिक असणं नवलाचं नाही. स्किझोफ्रेनिया, डिमेन्शिया, अल्झायमर यांचे सारेच पेशन्ट डायग्नॉस होतातच असेही नाही. आणि असले विकार असाध्य असल्याने त्यांच्यावर नियंत्रण एवढाच उपाय असल्याचे वैद्यक सांगते.

इच्छा असो वा नसो, डाव मांडावा ही लागतो आणि साधावा ही लागतो, भिडू पाहून आणि... पाडून ! अतिप्रिय गोष्टी टाळून, त्यांच्याच चिरांनी सजवाव्या लागतात नावडत्या गोष्टींचे बिलोरी अन् बेगडी महाल. तडजोड करण्याची सवय अंगवळणी पडली की नव्या जोडणीला जात नाहीत जुने तडे... तडतडणारे !

मूल्याधारित व्यवस्थेचे मार्केट डेरिव्हेटीव्ह थ्री ट्रिलियनच्या महत्त्वाकांक्षेने प्राचीन मूल्यव्यवस्थेसाठी रडत नाही. ब्ल्यू टूथ आणि ओटीपीच्या सोयीने कार्यभाग साधता येतो कुठलीही खूण-गाठ मागे न ठेवता... डिसॅपिरिंग मेसेजसारखा. अशा सभोवतालात विचारांना थारा नसतो, बोकाळतात फक्त विकार, फोफावतो अविवेकी दंभ... विनाशकारी !

..आणि मग संवेदनशील,विचारी, हळव्या शतशः विदीर्ण 'मना'ला पर्याय उरत नाही, सारे तुकडे गोळा करून... स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करण्याशिवाय...

कल्याणची युवा कवियत्री विशाखा विश्वनाथ हिला 'स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करताना' या तिच्या पहिल्याच कवितासंग्रहासाठी युवा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला याचं जेवढं कौतुक तेवढंच समाधान ! हे समाधान आणि हा आनंद शाळकरी मुलींच्या वेणीसारखा दुपेडी आहे...

आजच्या काळात कुणीतरी कुठल्याही अभिनिवेशाशिवाय, अभिलाषेशिवाय, दबावाशिवाय मुक्तपणे व्यक्त होतंय, होऊ शकतंय याचे समाधान आणि अशा प्रयत्नांची केवळ दखलच घेतली जात नाहीये तर चक्क पुरस्काराने दाद दिली जातेय याचा मनस्वी आनंद... अगदी हृषिदांच्या आनंद इतका खणखणीत !

आजच्या अत्यंत इंटरेस्टिंग पण तेवढ्याच फ्रस्टेटींग काळाचा आलेख कवितेतून मांडण्याचे होतील तेवढे प्रयत्न स्तुत्यच आहेत आणि हवे देखील आहेत... कुचंबणा, घुसमट, कोंडी जेवढी व्यक्त होईल तेवढे समग्र समाजभान जागृत होऊन समाजमन प्रगल्भ तथा विकसित होण्याचा मार्ग प्रशस्त होण्याची शक्यता बळावते.

तेंव्हा, प्रतिभा आणि तपशील भले भिन्न असले तरी, भावनेचा पोत आणि व्यक्त होण्याची आतुरता जोवर अस्सल आहे तोवर या अंतर्द्वंदाला सामोरे जातांना, स्वतःला स्वतःविरुद्ध उभं करायला एकमेकांना बळ मिळत राहील... देता येईल !

विशाखाचे मन:पूर्वक अभिनंदन आणि असेच व्यक्त होत रहाण्यासाठी तिला तिच्याच एका कवितेतून निरंतर शुभेच्छा...

जुन्या नोकरीतल्या शेवटच्या संध्याकाळी
घरी परतून येताना वाटतं
आजवर जमा झालेला सगळा पैसा 
लावून टाकावा माझ्या पहिल्या डॉक्युमेंट्रीवर
मग आठवते 
उच्चशिक्षणासाठी ओघाने चांगली नोकरी मिळावी
म्हणून घेतलेली ऍडमिशन
त्याची पेंडिंग फी
आणि जुन्या आणि नव्या नोकरीतल्या 
चार दिवसाच्या ब्रिदिंग स्पेस मधल्या पहिल्या रात्री
उशाला घेऊन झोपते मी माझ्या पहिल्या डॉक्युमेंट्रीचं स्वप्नं.