शुक्रवार, ४ ऑगस्ट, २०२३

रानकवी... गानकवी !


आम्ही शाळेत असतांना एकमेव करमणुकीचे साधन म्हणजे रेडिओ. या उपकरणाला कारण माहित नसतांना उगाचच ट्रान्सिस्टर म्हणण्याचीही फॅशन त्या काळी होती. समस्त जगात काय चाललेय हे सांगणाऱ्या बातम्यांपासून चित्रपट गीते, भावगीते, आणि 'नभोनाट्य' असे भारदस्त नाव धारण करणारे श्रवणीय नाटक असे मनोरंजनपर कार्यक्रम यातूनच आमचे सामाजिक भान, सांस्कृतिक जडणघडण आणि वैश्विक आकलन यांचे संवर्धन होत असे. आजच्या 'चाट जीपीटी' तंत्रज्ञानाच्या आवाक्याने च्याट्म चाट पडण्याच्या जमान्यात आमची वाढ खुजी वाटत असली तरी ती निकोप होती आणि आमच्या नेमस्त 
आयुष्याला पुरली देखील !

तर या आकाशवाणीवर मराठी गीतांच्या कार्यक्रमात अनेकदा लागणारे एक ठेकेबाज गाणे आम्हाला फार आवडायचे, ते म्हणजे - 'जांभूळ पिकल्या झाडाखाली ढोल कुणाचा वाजं जी..!' यातील शब्दांचा ग्रामीण बाज, दोन्ही गायकांनी लावलेला सूर आणि घोळवलेले स्वर, त्याला अधिकच परिणामकारक करणारी पारंपरिक वाद्यांची साथ आणि एकूणच श्राव्यानुभव अधिकच समृद्ध करणारा अफलातून कोरस... या साऱ्याची संस्कारक्षम 'मना'स भूल पडली नसती तरच नवल. हे 'मना'वर गारुड करणारे गीत कुणी लिहिले आहे याची बालसुलभ कुतुहूलाने चौकशी करता आमच्या अबोध साहित्यिक जाणिवेत भर पडली एका नावाची - ना. धों. महानोर ! ही आमची आणि त्यांची पहिली ओळख. पण ती गाण्याच्या माध्यमातून झाल्याने आमच्यासाठी त्यांची पहिली ओळख 'गानकवी' !

ग्रामीण जीवनाबद्दलचे आमचे निमशहरी भान हे शेती, बैलजोडी आणि बैलगाडी यापुरते मर्यादित असल्याने आणि ग्रामीण कवितेचा आमचा पैस विठ्ठल वाघांच्या, 'काळ्या मातीत मातीत...' याच्या पलीकडे पोहचत नसल्याने, शंकर पाटलांची खरीखुरी ग्रामीण कथा जशी आम्हाला उशीराने भेटली, तसेच रानवाटा दाखविणारे ना. धो. हे 'रानकवी' आहेत ही यथावकाश झालेली बोधी !

'जैत ते जैत' हा अनेक कारणांसाठी कायमच आमचा आवडता राहिलेल्या चित्रपटातील गेय गीते, बोल गाणी ही याच रानकवींनी लिहिली आहेत एवढी शिदोरी त्यांच्याशी नाळ जुळायला पुरेशी होती. पुढे आम्ही 'किशोर' वयातून 'कुमार' वयात आलो तसे, 'गोऱ्या देहावरती कांती...', 'नभं उतरू आलं...', 'घन ओथंबून येति...', 'चिंब पावसानं रान झालं आबादानी...' पासून थेट, 'भर तारुण्याचा मळा', 'राजसा जवळी जरा बसा...' अशा बैठकीच्या लावण्यांपर्यंत गानकवी आमचे दैवत झाले नसते तरच नवल !

पण याही साऱ्या, आकाशातली नक्षत्र खिशात घेऊन फिरण्याच्या मोरपंखी काळात, विंदा, कुसुमाग्रज, बाकीबाब यांच्यासह  कबीर, रुमी, गालिब आम्हाला भुरळ घालत असतांना आमच्या अलवार 'मना'वर फुंकर घालायला आला डॉ. जब्बार पटेलांचा 'मुक्ता' ! 'जैत रे जैत' नंतर तब्बल १६ वर्षांनी या अत्यंत क्रिएटिव्ह जोडगोळीने पुन्हा एकदा रानकवितांची मेजवानी दिली. मुक्ता मध्ये सोनाली, अविनाश, विक्रम गोखले यांच्या अभिनयाच्या तोडीचे किंबहुना अधीकच भुरळ घालणारे काही असेल तर ती सगळी गीते आणि मधून मधून सुकामेव्यासारख्या पेरलेल्या कविता. जयश्री शिवराम यांच्या अत्यंत वेगळ्याच धाटणीच्या करकरीत आवाजाने सजलेल्या 'जाई जुईचा गंध मातीला...' या गीताच्या सुरवातीचे आलाप कधीही केव्हाही कानावर पडले तर अंगावर सरसरून काटा येतो. यात आवाजाची जादू आहे हे नि:संशय पण मुळात ते शब्द तेवढे काळजाचे ठाव घेणारे नसते तर हा परिणाम साधलाच असता असे नाही. बघा कसे आहेत ते शब्द...


एकेका शब्दात आणि रूपकात एवढी ताकद आहे की याला कविकल्पना म्हणावे की सकल मानवी जीवनाचा 'नैसर्गिक' साक्षात्कारी दृष्टांत, असा प्रश्न पडावा. आणि हे झाले फक्त प्रसिद्धी पावलेल्या गीतांबद्दल. महानोरांच्या साऱ्याच काव्याविष्काराचा समग्र धांडोळा घ्यायचा तर ही जागा अपुरी पडायची आणि असे धाडस करू म्हणणाऱ्या पामराच्या मर्यादित व्यासंगाचे पितळ उघडे पडायचे. 

काल ना. धों. महानोर नावाच्या रानकवीने अखेरचा श्वास घेतला, आपल्या अवीट गोडीच्या अफाट रानमेव्याचे असीम भांडार मागे ठेऊन. ज्याच्या प्रत्येक उद्गारात निसर्ग आणि विशेषतः पाऊस कायम ओसंडून वाहत राहिला त्याला देहातून मुक्त करण्यासाठी निसर्गाने चिंब पावसाळी वेळच निवडावी याला नियती म्हणावे की निसर्गाची काव्यत्मकता...?

आमच्यासाठी गानकवी असलेल्या या कविश्रेष्ठास आम्हांला प्राणप्रिय असलेल्या 'मुक्ता'मधील त्यांच्या एका नितांत सुंदर आणि अत्यंत रोमांचक पावसाळी कवितेची शब्दांजली...

मन चिंब पावसाळी, झाडांत रंग ओले
घनगर्द सावल्यांनी आकाश वाकलेले

पाऊस पाखरांच्या पंखात थेंबथेंबी
शिडकाव संथ येता झाडें निळी कुसुंबी

घरट्यात पंख मिटले झाडांत गर्द वारा
गात्रांत कापणारा ओला फिका पिसारा

या सावनी हवेला कवळून घट्ट घ्यावे
आकाश पांघरोनी मन दूरदूर जावे

रानात एककल्ली सुनसान सांजवेळी
डोळ्यांत गल्बतांच्या मनमोर रम्य गावी

केसांत मोकळ्या त्या वेटाळुनी फुलांना
राजा पुन्हा नव्याने उमलून आज यावे

मन चिंब पावसाळी मेंदीत माखलेले
त्या राजवंशी कोण्या डोळ्यांत गुंतलेले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा