शनिवार, ९ सप्टेंबर, २०२३

आशा...!


"गुलजार, आरडी आणि आशाताई या त्रिवेणी संगमाच्या स्निग्ध प्रवाहात जे मोती वेचले त्यातील ‘मेरा कुछ सामान...’ हा शीर्षस्थ शुभ्र मौक्तिक. याच्या तोडीचे पुन्हा कधी आयुष्यात मिळेल, गवसेल, लाभेल असे काही वाटले नव्हते. पण या आमच्या गोताखोर स्नेह्यांनी पुन्हा एकदा कलासागरात डुबकी मारून काढले काय तर हे अमृत... “तुमुल कोलाहल कलह में मैं ह्रदय की बात रे मन...” आता याबद्दल या माणसाचे आभार कसे मानावे...?"

एप्रिल २०१९ मध्ये लिहिलेल्या या 'कोलाहल' पोस्टचा विषय बोजड, तत्वचिंतनात्मक धाटणीचा असला तरी त्याला सुभग, सुनीत आणि सुश्राव्य करणारा मोहक स्वर काल ९० वर्षांचा झाला. लतादीदींचा स्वर अलौकिक, दैवी तथा असामान्य होता हे निर्विवाद पण आशाताईंनीच एका मुलाखतीत साभिनय (मिमिक्री हा आशाताईंचा आणखी एक कलागुण ज्यास म्हणावा तसा वाव मिळाला नाही) सांगितले तसे, लतादीदींचा स्वर हा देवघरातल्या समईसारखा सात्विक, स्निग्ध आणि सालस होता त्याला, 'दम मारो दम...' चा ठसका जसा झेपला नसता तशी 'रात अकेली है...' मधले उन्मादक आव्हानही पेलवले नसते आणि 'मेरा कुछ सामान...' च्या मुक्तछंदातला छांदिष्टपणाही मानवला नसता. या सगळ्यांना अक्षरश: पुरून उरणारा एकमेव आवाज म्हणजे आशा भोसले !

गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्समध्येही कदाचित गायन प्रकारात एकमेव असलेल्या या गांधर्वकन्येने सुमारे २० भाषांमध्ये ११,००० हून अधिक गाणी रेकॉर्ड केल्याची नोंद २०११ सालातील आहे. पुढील १२ वर्षात त्यात अजून किती भाषा आणि गाणी यांची भर पडली असेल हे एक तो मंगेशीच जाणे ! आजही स्टेजशो करण्याची उर्मी, ऊर्जा आणि उत्साह असलेल्या या चमत्काराचे नाव 'आशा' शिवाय निराळे काय असू शकले असते...! 

थेट सचिनदा, ओ पी नय्यर, खैय्याम पासून पंचम, इलायाराजा, ए आर रहमान पर्यंत अशी दिग्गज संगीतकारांची आणि, 'पिया तू अब तो आ जा...' अशा उन्मादक पासून 'इन आँखोंकी मस्ती...' अशा आव्हानात्मक, ते मराठीतील, 'जिवलगा राहिले दूर घर माझे...' अशा आर्ततेची रेंज पदरी बाळगणारी आणि तेवढ्याच डौलाने मिरवणारी आशा काल नव्वदीची झाली असे तिला बघून कुणालाही पटणार नाही ! म्हणूनच विंदांच्या शब्दात थोडा बदल करून सांगायचे तर,

'आशा'त आजच्या ही गाणे असे उद्याचे,
स्वप्न चिरंतनाचे इतकेच जाणतो मी...!'

बाय द वे, उडत्या, फिल्मी गितांशिवाय क्लासिकल अर्थात शास्त्रीय प्रकारात आशाने फार काही केले नाही असे मानणारे वेळ काढून वरील अल्बममधील चीजा जरूर ऐकतील ही...आशा !

आशा नाम मनुष्याणां काचिदाश्चर्यशृङ्खला । 
यया बद्धा: प्रधावन्ति मुक्तास्तिष्ठन्ति पङ्गुवत् ॥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा