रविवार, २६ नोव्हेंबर, २०२३

गंधार...!


एके दिवशी तानसेनाच्या कर्णमधुर संगीताने तृप्त होऊन अकबर शयनगृहाकडे निघाला असता काही विचाराने थांबून तानसेनाला म्हणाला, 'तुझे संगीत केवळ स्वर्गीय आहे. तुझ्या गायन-वादनाने साऱ्यांचे चित्त प्रफुल्लित होते, चराचर उत्फुल्लित होतात. तुझ्या दर्जाचा असा दुसरा कलाकार या धरतीवर असूच शकत नाही. तू अद्भुत, अलौकिक, एकमेवाद्वितीय आहेस यात शंकाच नाही. परंतु माझ्या मनात असे आले की ही कला तुलाही कुणी तरी शिकवली असणार ना? याची साधना करण्याची प्रेरणा देणारा कुणी असेलच ना? तू ही गुरु केला असशीलच ना?'

तानसेन उत्तरला, 'महाराज, अर्थात मला गुरु आहेत आणि त्यांची योग्यता एवढी थोर आहे की मी तर त्यांच्या पायाची धूळ देखील नाही. तुम्ही फक्त मलाच पाहिलं, ऐकलं आहे म्हणून तुम्हाला मी थोर वाटतो. उंट जोपर्यंत पर्वताजवळ जात नाही तोपर्यंत त्याला खऱ्या उंचीची जाणीव होत नाही...'

अकबर म्हणाला, 'असे असेल आणि तुझे गुरु जर हयात असतील तर आत्ता, या क्षणी त्यांना दरबारात हजर कर, त्यासाठी जे करावे लागेल ते कर, जे द्यावे लागेल ते द्यायची माझी तयारी आहे. पण मला आत्ता, या क्षणी त्यांना भेटलेच, ऐकलेच पाहिजे...!'

तानसेन  म्हणाला, 'महाराज तीच तर अडचण आहे! माझ्या गुरूंना कुणीही काहीही देऊ करू शकत नाही कारण त्यांना कसलीच अपेक्षा नाही आणि कुणीही त्यांना आपल्याला हवे तेव्हा हवे ते करण्याची आज्ञाही देऊ शकत नाही कारण त्यांना कसली भीतीही नाही. तुम्हाला त्यांना पहायचे, ऐकायचेच असेल तर ते जिथे असतील तेथे जाऊन आणि ते जेंव्हा गातील तोपर्यंत संयमाने वाट पाहूनच ऐकायला लागेल...'

हरिदास फकीर - तानसेनांचे गुरु, यमुना किनारी रात्री तीनच्या सुमारास गातात, नाचतात असे समजल्यावर अकबर तानसेनासह यमुना किनारी लपून बसला. एका संगीततज्ञाला ऐकण्यासाठी अकबराच्या दर्जाच्या सम्राटाने रात्री-अपरात्री लपून-छपून बसण्याचे जगाच्या ज्ञात इतिहासातील हे एकमेव उदाहरण असावे.

अकबर आणि तानसेन रात्रीच्या थंडीत एका झोपडीच्या आडोशाला लपून बसले. जवळपास पूर्ण रात्र सरत आल्यावर, पहाटेच्या सुमारास अकबराच्या कानावर अशी एक धून पडली की त्याच्या डोळ्यातून पाणी झरू लागले. हरिदास फकीर देहभान विसरून तन्मयतेने गाऊ लागले, नाचू लागले आणि अकबराच्या शरीरावर त्याने पूर्वी कधीही अनुभवले नव्हते असे रोमांच उभे राहिले. 

सकाळी मंत्रमुग्ध, भारावलेल्या अवस्थेत अकबर महालापाशी परत आला तेव्हा तानसेनाला म्हणाला, 'मी आजवर समजत होतो की तू जगातला सर्वश्रेष्ठ संगीततज्ञ आहेस, तो माझा भ्रम आज मोडला. तू म्हणालास तसे खरोखरच तुझ्या गुरूंच्या समोर तू काहीच नाहीस. पण मला एक सांग, तू तुझ्या गुरूंसारखे का गाऊ, वाजवू शकत नाहीस...?'

तानसेन म्हणला, 'अगदी सोपी गोष्ट आहे महाराज, मी काही मिळावे म्हणून गातो तर माझे गुरु त्यांना काही मिळालेय म्हणून गातात. मला जे साध्य करायचे आहे त्यात माझा जीव अडकतो म्हणून मी प्राणपणाने गाऊ शकत नाही. मी स्वत:ला झोकून देऊ शकत नाही. मला जे मिळवायचे आहे ते अन्य मार्गाने मिळाले तर मी संगीत सोडून तो मार्ग पत्करेल कारण संगीत माझ्यासाठी काही मिळविण्याचे केवळ एक साधन आहे. त्यात प्राण फुंकणे मला जमणारच नाही. कारण पुढे काही मिळवायचे आहे म्हणून माझी साधनेची धडपड आहे. पण माझ्या गुरूंना काही मिळाले आहे, साध्य झाले आहे म्हणून ते देहभान हरपून, तल्लीन होऊन गातात, नाचतात. त्यांची उन्मनी अवस्था पूर्णत्वातून, वर्तमान क्षणातून आली आहे, कुठल्याही भूत-भविष्यातून नाही. म्हणून त्यांची सर मला येणे कालत्रयी शक्य नाही...' 

'...पण त्यांच्या या अवस्थेचे कारण काय, कशामुळे ते असे भरून वाहू शकतात...?'

'नदी का वाहते आहे? फुलं का उमलताहेत? सूर्य-चंद्र का तळपत आहेत? जीवनप्रवाह का चालू आहे? कारण सारी सृष्टी आतून जगते, उमलते, फुलते. फुलं फुलतात कारण फुलण्यात आनंद आहे, सूर्य उगवतो कारण उदयात आनंद आहे, पक्षी कूजन करतात कारण गाण्यात आनंद आहे, हवा वाहते, वृक्ष डोलतात, नदी वाहते, झरे खळखळतात... सगळीकडे आनंदी, उत्सवी वातावरण आहे. केवळ माणूसच दगडासारखा निर्जीव झालाय. त्याला हे समजत नाही आपले अस्तित्व हाच आनंदाचा ठेवा आहे, हाच जीवनोत्सव आहे आणि हीच जगण्याची उर्मी आहे... आत्ता, इथे, या क्षणी...!'

-----------------------------------------------------------------------     

हरिदासाची ही कथा आज आठवण्याचे कारण ठरलेली आरती प्रभूंची ही कविता... 

तेव्हा मलाच माझा वाटेल फक्त हेवा
घरदार टाकुनी मी जाईन दूर गावा...


पाण्यांत ओंजळीच्या आला चुकून मीन
चमकून हो तसाच गाण्यांत अर्थ यावा... 

शिंपीत पावसाळी सर्वत्र या लकेरी
यावा अनाम पक्षी, स्पर्शू मलाच यावा... 

देतां कुणी दुरून नक्षत्रसे इषारे
साराच आसमंत घननीळ होत जावा... 

पेरून जात वाळा अंगावरी कुणी जो,
शेल्यापरी कुसुंबी वाऱ्यावरी वहावा... 

तारांवरी पडावा केव्हा चुकून हात,
विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडावा...


यातील घरदार टाकुनी दूर गावा जाणे म्हणजेच... लौकिकाचे स्तोम सोडून प्राप्त क्षणात उन्मनी अवस्थेला पोहचणे. ते साधले तरच विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडण्याची शक्यता... असे कवीच्या मनात असावे, असे मनाला वाटते!  

म्हणजे नक्की कसे हे सांगायचे तर, परवा कुठल्या एका टिपणासाठी काही संदर्भ शोधण्याचे रिकामे उद्योग करत असतांना, 'मोह मोह के धागे...' हाती लागले आणि, विस्तीर्ण पोकळीचा गंधार सापडणे म्हणजे काय याची प्रचिती तर आलीच पण त्या आधीच्या ओळींमधल्या तारा विजेच्या असाव्या असा जोरका झटका जोरसेच बसला जेव्हा वरुण ग्रोव्हरच्या मर्मग्राही शब्दांना आणि मोनाली ठाकूरच्या काळजात रुतणाऱ्या आवाजाला स्वरसाज, 'आग लगा दूंगा, आग लगा दूंगा...' वाल्या ज्वलनशील अन्नू मलिकने चढवलाय, हे समजले! अशा सटीसामाशी दिलेल्या मास्टरपीसमुळे या माणसाचे हजार गुन्हे माफ करावेच लागतात... 

मी म्हणतोय म्हणून नव्हे, स्वतः ऐकून ठरवा... 
'तू होगा जरा पागल तुने मुझको है चुना...' 
'के तेरी झूटी बातें मै सारी मान लुं...'
असले काळजात घुसणारे शब्द आणि तो मध्येच सनईचा पीस...
अरे देवा! डोळे मिटून ऐकले की होणारच अवस्था...
उन्मनी !

1 टिप्पणी: