शनिवार, ६ जानेवारी, २०२४

रहस्य...!


त्या दुकानदाराने आपल्या मुलाला जगाचे ज्ञान व्हावे म्हणून जगातल्या शहाण्या माणसाकडे पाठवले.

शहाणा म्हणजे ज्ञानी आणि ज्ञानी म्हणजे कुणी साधू-तपस्वी अशी अटकळ बांधून मुलगा त्याच्या शोधात निघाला.

वाळवंटातल्या ४० दिवसांच्या प्रवासानंतर मुलगा पोहोचला ती कुण्या साधूची कुटी नव्हती तर धनिकाचा प्रशस्त महाल होता. तिथे ध्यान-धारणा, मंत्र-जाप, पूजा-साधना असले काहीही चाललेले नव्हते तर खूप वर्दळ होती. लोक येत जात होते. सौदे ठरत होते, व्यवहार पार पडत होते. जगातल्या सर्वोत्तम खानपानाची रेलचेल होती. वातावरणात संगीत होते, सुगंध होता, उल्हास होता. शहाणा (आणि श्रीमंत) माणूस साऱ्यांशी आपुलकीने बोलत होता, हवे-नको बघत होता.

मुलाकडे लक्ष जाण्यास त्याला जवळपास दोन तास लागले. मुलाचा येण्याचा उद्देश त्याने समजून घेतला पण त्याला जे हवे होते ते, 'सुखाचे रहस्य' समजावून सांगण्यासाठी त्याच्याकडे वेळ नव्हता म्हणून त्याने मुलाला त्याचे घर पाहून दोन तासाने परत भेटू असे सुचवले. मुलाला फक्त एकच गोष्ट करायची होती, यजमानाने दिलेला चमचा आणि त्यातले तेलाचे दोन थेंब पूर्ण वेळ सांभाळत घर पहायचे होते.

मुलाने महालाचे संगमरवरी खांबांनी सजलेले रुंद वऱ्हांडे, मखमली पायघड्या घातलेले उंच जिने, फुलांच्या ताटव्यांनी सजलेले गवाक्ष, भरजरी रेशमी पडद्यांनी नटलेले नक्षिकाम केलेले भव्य दरवाजे खिडक्या या साऱ्यांच्या साक्षीने घराचा दौरा पूर्ण केला - सारे लक्ष हातातील चमच्यावर लक्ष केंद्रित करून दोन तासांनी शहाण्या माणसाकडे परतला!

शहाणा माणूस म्हणाला, 'मग, कसे वाटले माझ्या शयनगृहातील गालिचे, मुदपाकखान्यातील लाकडी कारागिरी, वाचनालयातील पुस्तके आणि कल्पकतेने सजवलेल्या भिंती, माळीबुवांनी १० वर्षांच्या अथक मेहनतीने फुलवलेला आणि निगुतीने राखलेला बगीचा आणि त्यातील थुई थुई नाचणारे कारंजे...?'

मुलगा फारच शरमला आणि वरमून म्हणाला, 'माझे सारे लक्ष चमच्यातील तेलाकडे असल्याने मी यातील काहीही बघू शकलो नाही, त्याचा सुखद अनुभव घेऊ शकलो नाही, मला माफ करा...!'

'मग पुन्हा एकदा जा आणि मी जगभरातून जमविलेल्या साऱ्या किमती, कलात्मक आणि सुंदर गोष्टींचा आनंद घेऊन पुन्हा मला भेट. ज्या माणसावर विश्वास ठेवायचा त्याचे घर नीट निरखून बघायलाच हवे, नाही का...?'

मुलाने समाधानाने पुन्हा चमचा उचलला आणि या वेळी साऱ्या गोष्टी नीट बघून, त्यांच्या सौंदर्याचे आस्वादन करीत घराचा फेरा पूर्ण केला आणि अतिशय सुखावत सुस्मित चेहऱ्याने शहाण्या माणसास सामोरा गेला.

'... पण चमच्यातले तेल कुठेयं...?' शहाण्या माणसाने मुलाच्या हाताकडे बघत विचारले. मुलाचे तिकडे लक्ष जाताच त्याचा आनंदाने फुललेला चेहरा क्षणार्धात खर्र्कन उतरला...

'असं बघ मुला, मी तुला एवढाच सल्ला देऊ शकतो..', शहाणा माणूस अत्यंय शहाणिवेने म्हणाला, 'तू शोधतोयस त्या सुखाचे रहस्य एवढेच आहे की जगातील साऱ्या चांगल्या, हव्याशा गोष्टींचा मनसोक्त उपभोग घ्या, रसास्वादन करा पण ते करताना हातातल्या चमच्यातील तेलाचे दोन थेंब कधीही विसरू नका, नजरेआड होऊ देऊ नका...!'

---------------------------------

पावलो कोएलो यांच्या 'दि अल्केमिस्ट' या अप्रतिम पुस्तकातील ही अत्यंत बोधप्रद गोष्ट आज नव्याने आठवण्याचे कारण म्हणजे नव्या वर्षाचा संकल्प नव्हे. असे काही संकल्प करायचे नाही असा संकल्प सोडण्याइतकी शहाणीव आम्हाला अल्केमिस्टच्या आधीच आली होती. तेव्हा तसे काही प्रयोजन नाही.

फक्त गेल्या वर्षाचा अखेरचा काळ खूपच घडामोडींचा, धावत्या का होईना गाठीभेटींचा आणि...
"कभी पास बैठो तो कहूं दर्द क्या है,
अब यूँ दूर से पूछोगे तो खैरियत ही कहेंगे..!"
याचा एहसास होण्याचा,
असा संमिश्र भावनांचा ठरला म्हणून पुन्हा एकदा 'पावलो'ची आठवण बाकी काही नाही... 

तेव्हां, मी माझ्या जीवनशैलीत सकृतदर्शनी कुठलेही बदल केलेले नसल्याने पण विचारशैली अधिक मुक्त, प्रवाही आणि चिंतनशील करण्याच्या धोरणामुळे बौद्धिकांसाठी, बुद्धिप्रामाण्यवादासाठी कायमच उपलब्ध आहे, राहीन...!

ताल्लुकात बढ़ाने हैं तो कुछ,
आदतें बुरी भी सीख ले गालिब,
कोई ऐब न हो तो लोग,
महफ़िलों में नहीं बुलाते...!

बस इतना ही...

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा