हे ओरखडे कसले
अनुभवांनी जाणिवांवर घातलेले घाव
की मला घडवण्याचा आयुष्याचा प्रयत्न…?
आजच्या माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने नेहमीप्रमाणे कालपासूनच शुभेच्छांचा ओघ सुरु झाला. गुगल, जीमेलचे आपल्या लॉगीनला रंग उधळत शुभेच्छा देण्याचे पर्सनलाइज्ड जेस्चर असो, आपण ज्या ज्या गोष्टीत ‘इन्व्हेस्ट’ केले आहे त्या ‘म्युच्युअल’ रिलेशनच्या कराराला जागून आपल्या विशेष ‘फंडां’ची… आपलं, दिवसांची नोंद ठेऊन ऑटोमेटेड का होईना शुभेच्छा वेळच्या वेळी पाठवणारे अत्यंत व्यावहारिक संबंध असोत की कुठल्याच विधिनिषेध, नीतिनियमांची तमा न बाळगता थेट ‘मना’ला भिडणारे तरल भावगर्भ काव्यमय ऋणानुबंध असोत… कुठ्ल्याही सदिच्छांनी एक वेगळीच ताकद, एक अनामिक ऊर्जा, एक अक्षय्य उमेद आणि निखळ आनंद मिळतो हे निश्चित! एसेमेस, फोन आणि सोशल मीडियावरील संदेश हे औक्षणाचे तबक असले आणि त्यांना बर्थडे केकची गोडी असली तरी स्वहस्ताक्षरातल्या पत्ररूपी काव्यात्म शुभेच्छा या, औक्षणाच्या तबकातल्या तेज:पुंज दिव्यासारख्या मुहूर्ताचा क्षण अन क्षण झळाळून टाकतात… मंगल, उत्फुल्ल, प्रकाशमान करतात; केकवरल्या आईसिंग आणि चेरीच्या अवीट माधुर्यासारख्या!
सन्मित्र दिनाने आमच्या पत्रव्यवहारात पडलेल्या बऱ्याच काळाच्या खंडानंतर, मधली दरी सांधून घेण्यासाठी बर्थडे गिफ्ट म्हणून जो पूल बांधला त्यावर किती झुलावे आणि किती नाही असे झालेय. शिवाय हे त्याचे छापील हस्ताक्षरातले पत्र त्याने अगदी मुहूर्तावर स्वहस्तेच डिलिव्हर केल्याने त्याची खुमारी अधिकच वाढली. त्या पत्रात जागोजागी पेरलेल्या चारोळ्या माझ्याच काही जुन्या अभिव्यक्ती असल्याने त्या इथे पुन्हा उधृत करण्यात काही हशील नाही. तथापि दिनाने या निमित्ताने केलेली कविता नवी, कोरी-करकरीत आणि आस्वादनीय असल्याने तिचा उल्लेख इथे आवश्यक ठरतो…
पर्णहीन झाडाने अबोल गूढ संदेश दिला
जाताजाता शिशिराने वसंतास मार्ग दिला.
वसंताची खोड जुनी, आल्या आल्या जातो म्हणाला
प्रफुल्लीत मोहर सृष्टीला अन् मोगऱ्यास गंध दिला.
ग्रीष्म झळाळे शाश्वत, सूर्यास आकाशी नेमला
पारावरल्या सावलीने, उन्हास टेकण्या आधार दिला
बरसण्यास आतुर ढग, आभाळी तुंबला
रोमारोमात भरून घेण्या, वर्षावाने मग थेंब दिला
नवरात्र शरदाची रंगीत, उत्सवाचा भरवी मेळा
कोजागिरीच्या आभाळास, शुभ्र दुधाळ चंद्र दिला
हुडहुडीला उब शेकोटीची, पहाटेस उटणे अभ्यंगाला
फराळाच्या ताटासोबत, हेमंताने स्नेहभाव दिला
गुच्छ सहा ऋतूंचा असा, ‘मना’स मी अर्पिला
आनंदाच्या दिवसासाठी, कवितेत गुंफून शब्द दिला !
नेहमीप्रमाणे दिनाने प्रेरणा आणि क्ल्यू दिल्यावर मला कविता न रचून कसे चालेल…?
तेंव्हा आजच्या निमित्ताने आजवरच्या आयुष्याने दिलेली ही शहाणीव…
चिरंजीव…?
निरंतर वाहणे हेच जीवन
तुंबून साचण्याचा सोस कशाला,
सुख कुठलेच नसते चिरंजीव
गमावले त्याचा अफसोस कशाला!
जन्म-मृत्यू एका श्वासाचे अंतर
धरून ठेवण्याचा अट्टाहास कशाला,
‘मना’स रमण्याची साधने कितीक
जे न साधते त्याचा उपहास कशाला!
सृजन जर हे स्वान्त-सुखाय
हवी उसनी ती दाद कशाला,
भरभरून मिळता सौख्य जगण्याचे
जे निसटले त्याची मोजदाद कशाला…?
गेल्या रविवारी वयाची नव्वदी पूर्ण केलेल्या गुलझार सरांचे शब्द आठवून वाढत्या वयात उमेद जोपासावी हे उत्तम…
“थोड़ा सा रफू करके देखिये ना,
फिर से नयी सी लगेगी,
ज़िन्दगी ही तो है…”
आजच्या प्रसंगी आठवणीने मला शुभेच्छा देणाऱ्या साऱ्या स्नेही-सुहृदांचे 'मना'पासून आभार!
स्नेह आहेच, तो निरंतर वृद्धिंगत व्हावा हीच अपेक्षा...
शुभम भवतु !
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा