आमचे आजोबा, बा. के. पुराणिक उर्फ 'केशवतनय' अर्थात 'अण्णा' यांचा अत्यल्प परिचय 'कवित्व' (मंगळवार, ३० ऑक्टोबर, २०१८), 'श्री गुरुचरित्र' (रविवार, १२ डिसेंबर, २०२१), 'ओवी-गीता' (शुक्रवार, २१ जानेवारी, २०२२), या पोस्ट्समधून झाला. मीरा धाराशिवकर यांनी अनेक वर्षांच्या अथक परिश्रमाने आणि मोठ्या चिकाटीने साकारलेल्या खान्देशातील इ.स. १२ व्या शतकापासून थेट साल २०१४ पर्यंतच्या साहित्यिकांच्या योगदानाचा ग्रंथ राजवाडे संशोधन मंडळ, धुळे यांनी प्रकाशित केला. त्याची प्रत आम्हाला अलीकडेच प्राप्त झाली. त्यात चार विभांगामध्ये अण्णांच्या नावाचा आणि कार्याचा उल्लेख आला ही आमच्यासाठी मोठी गौरवाची बाब!
अण्णांचे ज्येष्ठ सुपुत्र म्हणजेच आमचे थोरले काका शामकांत पुराणिक यांचाही अत्यल्प परिचय 'गदिमा' (सोमवार, १ ऑक्टोबर, २०१८). या पोस्टमध्ये झाला. काकांची ज्येष्ठ सुकन्या सौ. विद्या मदन कुलकर्णी हिचा परिचय 'ओवी-गीता' (शुक्रवार, २१ जानेवारी, २०२२) या पोस्टमधून झाला आणि 'गीत ज्ञानेश्वर' कार्यक्रमाची प्रस्तावना करतांना आपण तिला पाहिले. थोरल्या काकांची पत्नी आणि विद्याताई, विनया आणि आमचा बंधुसखा कुमार यांची आई म्हणजे आमच्या थोरल्या सुशीला काकू!
गोष्टी-वेल्हाळ सुशीला काकू व्यावहारिक गृहकर्तव्ये नेमस्तपणे पार पाडतांना सतत जुन्या आठवणीत रमलेल्या असत आणि त्यांच्या गतायुष्यातील घटना, किस्से अतिशय रसाळपणे कथन करीत. गेल्या वर्षी काकू गेल्यानंतर, ताईच्या वहीत जपून ठेवलेल्या या मोरपिसांचा पिसारा फुलवून, काकूंच्या आठवणींची ऊब सतत सोबत रहावी या कल्पनेला, 'ती आई होती म्हणूनी...' या स्मरणरंजन पुस्तिकेच्या रूपात मूर्त स्वरूप आले.
अण्णांच्या साहित्यिक प्रतिभेपुढे आम्हां भावंडांचे लिखाण म्हणजे अगदीच 'मख़मल में टाट का पैबंद' (ताईच्या भाषेत 'थेंबुटा') असले तरी वारसा पुढे चालू राहिला आणि आता मैत्रेयीही हिंदी, इंग्रजीत तिच्या पद्धतीने तो पुढे नेतेय हेही नसे थोडके...
तसे पाहू गेल्यास, 'ती आई होती म्हणूनी...' हे एक अत्यंत खाजगी, वैयक्तिक आणि कौटुंबिक प्रकटन असले तरी, त्याचा सुमारे शतकभराचा पैस पाहता, त्यात मध्यमवर्गीय समाजमनाचे प्रतिबिंब उमटलेले दिसते. शिवाय, वपु म्हणतात तसे, 'As you write more and more personal becomes more and more universal', या न्यायाने प्रत्येक प्रकटन आपापल्या परीने वैश्विक असतेच.
कुठल्याही व्यवस्थेला नावे ठेवतांना, आपणही त्या व्यवस्थेचा भाग आहोत आणि त्यामुळे आपणही त्या अवस्थेस अंशतः कारणीभूत आहोत हे स्वीकारणे शहाणपणाचे लक्षण असते. 'समाज' तर माणसांनीच घडवलेला असल्याने त्याची दुरवस्था झाली असेल तर तो दोष कुणाचा? पूर्वीची माणसे, त्यांच्या जीवननिष्ठा, ध्येय-धारणा आणि मूलभूत जीवनमूल्ये यांना तिलांजली देऊन, 'पूर्वीचे दिवस राहिले नाहीत हो आता...' असे रडगाणे लावून आठवणींचे कढ काढण्यात काय हशील?
बदलत्या जीवनशैलीतील कालसापेक्ष आधुनिक गोष्टींचा विवेकी स्वीकार करतांना आणि पूर्वी होऊन गेलेल्या मोठया माणसांची स्तवने गातांना, त्यांच्या प्रतिमांचे पूजन करतांनाच, त्यांच्या संस्कारांचे जतन-संवर्धन, त्यांच्या उदात्त विचारांचे आचरण आणि त्यांच्या शिकवणुकीचे पालन केल्यास बिघडलेल्या समाजाची विस्कटलेली घडी पुन्हा बसविण्यास प्रत्यवाय नसावा.
'परिस्थिती बदलली म्हणून माणसाने बदलू नये, माणुसकी सोडू नये...' या दुर्दम्य आशावादाने हा उहापोह, आज सुशीला काकूंच्या प्रथम स्मृतिदिनी, त्यांच्या नेमस्त, प्रेरणादायी आयुष्यास समर्पित...
इतिश्री !