गुरुवार, २१ मे, २०१५

इतिश्री...!


जगणे फुलून यावया
जाणिवांनी गहिरे व्हावे
विभ्रमांनी ऊन्मळून
विषादांना बहिरे व्हावे…!

मंगळवार, १९ मे, २०१५

अरुणाष्टके...!



जळत ह्रदय माझें कोट्यानुकोटी।
मजवरि करुणेचा राघवा पूर लोटीं॥
तळमळ निववीं रे राम कारुण्यसिंधू।
षड्‌रिपुकुळ माझें तोडि याचा समंधू ॥

जननिजनकमाया लेंकरूं काय जाणे।
पय न लगत मूखीं हाणिता वत्स नेणे॥
जळधरकण आशा लागली चातकासी।
हिमकर अवलोकी पक्षिया भूमिवासी ॥

विश्रांति देहीं अणुमात्र नाहीं।
कुळाभिमानें पडिलों प्रवाहीं॥
स्वहीत माझें होतां दिसेना।
तुजवीण रामा मज कंठवेना ॥

मानवतेच्या अविरत सेवेसाठी परिचारिकेचे असिधारा व्रत स्वीकारलेल्या पण बधीर समाजाच्या सडक्या मनोवृत्तीमुळे नरकयातना भोगणाऱ्या अरुणा शानभाग यांचे काल लौकिक अर्थाने निधन झाले…
मृत्यूशी ४२ वर्षे लढणाऱ्या आणि त्यांच्या त्या अवस्थेत समाजभान, सहानुभूती आणि विवेक जागृत ठेवून ऋणानुबंध जपणाऱ्या त्यांच्या सर्व परिचारिका भगिनींना… सलाम!

बुधवार, ८ एप्रिल, २०१५

कोहम्...!


मर्यादापुरुषोत्तम राम की
भोळा कोपिष्ट रुद्र मी…
दशांगुळे शेष वामन की
रज:कणासंम क्षुद्र मी?

भीष्म धर्म अभिमन्यू की
शापित धुरंधर द्रोण मी…
स्वच्छंदी की स्वपराजित
मलाच न ठावे कोण मी?

कृष्णाचा तो अर्जुन की
लक्ष्य त्याचे कर्ण मी…
वृक्षाचा घनगर्भ घेर की
लाजाळूचे तृणपर्ण मी?

स्थितप्रज्ञ योगी बुद्ध की
नुसताच हतबुद्ध मी…
भूतभविष्यात लोंबणारा
की वर्तमानी रुद्ध मी?

षडरिपूंचा जोखडी जीव की
अनादि अनंताचा प्रवासी मी…
धारणेची स्वयंभू नीव की 
नित्य इथलाच निवासी मी?

तर्कट स्खलनशील की
स्वाध्यायी कोहम मी…
प्रज्ञेने प्रकटलेला की
नि:संदर्भ सोहम मी?

सागर प्रपात ओहोळ की
मुक्त प्रवाही झरा मी…
ओसंडून वाहणारा की
शुष्क साचलेला खरा मी?

प्रतिमेत अडकलेला सिंह की
पानगळीस भ्याला ससा मी…
भासतो तसाच आहे की
आहे खरोखर कसा मी?

रविवार, २९ मार्च, २०१५

आपो'आप'...!


'आप'लीच यादवी
'आप'लेच भूषण
'आप'ल्या अविवेकाचे
लोकशाहीस दूषण…

'आप'लेच दात
'आप'लेच ओठ
'आप'लीच लाज
निघते काठोकाठ…

"'आप'ली माणसे
'आप'लीच नाती
तरी कळपाची
मेंढरास भीती…"

बुधवार, २५ मार्च, २०१५

सावध...!


जगण्याची सक्ती नाही
हसण्याची मात्र आहे…
दिवस काढायचा सावध,
हरवण्याची रात्र आहे…!

मंगळवार, २४ मार्च, २०१५

जगणे...!


घड्याळी आयुष्य कसे
क्षण क्षण सरते
रोज जन्मून जगणे
कण कण मरते…!

आले किती गेले किती
किती उरले शिल्लक
आकड्यांच्या जंजाळात
जगणे होते क्षुल्लक…

हिशेबच शिकायचा तर
दोन यत्ता पुरतात
जगणे समजण्यासाठी
खुळे इथे झुरतात…!

शनिवार, २१ मार्च, २०१५

नव-वर्ष...!

 
वसंताच्या हिरवाईला चैत्राचा स्पर्श
सृष्टीच्या नवलाईला सृजनाचा हर्ष 
आरोग्य यश सुख समृद्धीची गुढी 
सांगण्या उभी दारी 'आले नव-वर्ष'!

चैत्र शुद्ध प्रतिपदा (गुढी पाडवा) - अर्थात - हिंदू नववर्षाच्या मन:पूर्वक सदिच्छा 
हे वर्ष आपणा सर्वास सूज्ञ सौख्य-समाधानाचे आणि विवेकपूर्ण जाणिवेचे जावो...!

रविवार, १५ मार्च, २०१५

प्रवास...!


खुळावल्या दिसांची याद
रुक्ष जगण्यातील गम्मत
जगल्या क्षणांच्या शिदोरीवर
उरल्या प्रवासाची हिम्मत...!

शुक्रवार, १३ मार्च, २०१५

निश्वास...!


भोगण्याच्या भोगातून
सुटे ना देहभान माझे
मन शेवरी शेवरी अन
जगणे निश्वासांचे ओझे…!

बुधवार, ११ मार्च, २०१५

तेव्हा...!

 

तू हसायचीस तेव्हा
सारे कसे सोपे वाटायचे
भर उन्हाळ्याच्या दुपारी
रेशमी मेघ दाटायचे…!