सोमवार, ९ नोव्हेंबर, २०१५

पाहीजे…!

अर्धे आयुष्य सरले तरीही समज तशी कमीच आहे
जाणीवा प्रगल्भ असल्या तरीही जाण मला कमी आहे
'स्व'त्वाचा घोटून गळा, नाती सारी जपली पाहीजे
संवेदना मारून साऱ्या, दुनियादारी शिकली पाहीजे…

धार शब्दाला असली तरीही मनात प्रेमाचा आसरा आहे
राग रक्तात असला तरीही पिंडात क्षमेचा निवारा आहे
शब्दच नेहमी घात करतात, हे ध्यानात ठेवले पाहिजे
शब्दच्छल टाळून सारे, मौनात रहाण्या शिकले पाहीजे…

मनाच्या आत जे जे, तेच सारे बाहेर आहे
जगण्या-दाखवण्याचा चेहरा माझा एक आहे
करून मन मोठे, रित इथली जपली पाहीजे
कोंडून आतला आवाज, दांभिक होणे शिकले पाहीजे…

- दिनेश चंद्रात्रे, धुळे 


यंदाची दिवाळी बऱ्याच अर्थाने वेगळी आणि विशेष ठरणार हे निश्चित! मित्रांच्या भेटीगाठी आणि त्यांच्या सोबत बहरलेला क्षण अन क्षण (याला 'क्वालिटी टाइम' म्हणण्याचे फॅड आहे!) यापेक्षा वेगळा उत्सव, सोहळा किंवा मुहूर्त मला कधीही अभिप्रेत नव्हता, नाही आणि नसेल. दिवाळीच्या तोंडावरच सुहृदांची हृद्य (!) संगतच माझं आयुष्य काही वर्षांनी वाढवून गेली होती, त्यात सन्मित्र दिनेशने, माझ्या त्याच्याशी निरंतर चालू असलेल्या प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संवादातून जाणीवपूर्वक सहवेदनांनी टिपलेली स्पंदने, इतक्या समर्पक, प्रत्ययकारी आणि तंतोतंत काव्यात्म अभिव्यक्तीत शब्दबद्ध केली आहेत की त्यायोगे एका दगडात चार पक्षी उडाले ('मारले' वगैरे कविमनाला पचायला जरा जडंच!), ते असे -

१. मी यापुढे, आत्मकथन वगैरे तर दूर, कविताही करायची गरज नाही इतक्या नेमक्या आणि नेटक्या शब्दात दिनाने माझा आजवरचा जीवनपट आणि अवस्था उलगडली आहे. ('मांडली' म्हणणार होतो पण माझी अवस्था गुंतागुंतीची असल्याने 'उलगडली' जास्त सयुक्तिक आहे…!)
२. माझ्या आजवरच्या 'कोहSम' च्या प्रवासाचे इतके मुद्देसूद तथा आकलनीय ('सुलभ' शब्दाला विनाकारणच भलतेच परिमाण प्राप्त झालेय… निचऱ्याशीच संबंधित असले तरी नकोच ते!) निरुपण माझ्यासह कुणालाही जमलेले नाही आणि जमेलसे वाटत नाही. आता फक्त त्यातले जे जे करायला 'पाहीजे' ते किती साधते बघायचे!
३. माझ्या अवस्थेच्या आणि अस्वस्थतेच्या निमित्ताने का असेना, दिनाने त्याची आजवरची सर्वात सुंदर काव्यनिर्मिती केली आहे! हे मी, या कवितेचा विषयवस्तू अस्मादिक असल्याने (आहे ना, दिना?) म्हणत नाहीये, तर आजवरच्या दिनाच्या काव्यप्रवासाचा मी कायमच प्रथम वाचक, नि:स्पृह रसिक, विचक्षण समीक्षक आणि खंदा समर्थक राहिलो असल्याने माझ्याहून जास्त हे कुणी खात्रीपूर्वक सांगू शकत नाही.
४. आणि शेवटी, मला स्वछ प्रतीवर्ती आरसा दाखवून त्याबरोबरच मेक-ओव्हरची सडेतोड रेसिपीही सांगणारे हे 'हित'-गूज, सर्वांशी शेयर केल्याने इतरही अनेक 'तू भ्रमत आहासी वाया' अशा नि:श्राप जीवांना यायोगे स्व-प्रतीमेवरचे मळभ दूर होऊन तेजोत्सावाच्या मुहूर्तावर प्रकाश दिसेल अशी आशा…

दिनाचे आभार मानावे अशा असंख्य गोष्टी आहेत पण आभार'प्रदर्शना'ला उपचाराचे ओझे असते तर अव्यक्त ऋणांना शेवरीचा स्पर्श…! तेव्हा तत्सम काही न व्यक्तता 'गेले द्यायचे राहूनी…' ही हुरहूर मला जास्त प्रिय आहे… इतकेच! शुभम भवतु…

शनिवार, ७ नोव्हेंबर, २०१५

पहिली पणती...!


कितीही बदलू दे मनुष्य
वा होवो कठीण समय
एकच तत्व पुरे जगण्या
तमसो मा ज्योतिर्गमय…!

अंध:काराचे निर्दालन करणाऱ्या तेजोत्सवाच्या आगमनार्थ ज्योतिर्मय शुभेच्छा…!

शुक्रवार, ६ नोव्हेंबर, २०१५

सर्वव्याधिप्रमोचकं I


परिस्थितीची सम्यक जाण
सहजीवनाचा निकोप वसा
बहुतांच्या स्वास्थ्यावर दोघे
सोडत जाती निरामय ठसा…!

वैद्यकव्यवसायाप्रती माझ्या अस्वस्थ जाणिवांमध्ये वैद्यकशास्त्रायोगे मुलभूत परिवर्तनास कारणीभूत ठरलेल्या धुळ्याच्या डॉ. सचिन  डॉ. सौख्या चिंगरे (नावात अर्थाबरोबरच सौ. देखील अनुस्यूत असणे किती विलक्षण!) या सुविद्य वैद्यक दंपतीस सस्नेह. माझ्या शतायुषाच्या संकल्पास दृढ करणारा सचिन आपला वर्गमित्र आहे याचा अवर्णनीय आनंद आणि सार्थ अभिमान येथे प्रकट करणे प्रस्तुत ठरावे. शुभम भवतु…I

शनिवार, २४ ऑक्टोबर, २०१५

अडचण…!


असता सर्व भासे वांझोटी चणचण
नसता काही उरते एकाकी 'मी'पण…
अस्वस्थ जाणिवांचे भोग अभोगी
माझ्या असण्या माझीच अडचण…!


आर. के. लक्ष्मण सरांच्या ९४ व्या जयंती निमित्त 
'कॉमन मॅन'च्या स्मृतीस सादर अर्पण…!

गुरुवार, २२ ऑक्टोबर, २०१५

दसरा...!


अंब्याचे तोरण दारी रांगोळीची नक्षी…
सुगंधित शिंपणाने मांगल्याची चाहूल!
अवघ्या अनिष्टाचे करण्या निर्दालन…
तेजाच्या उत्सवाचे आज पहिले पाऊल!

दसऱ्याच्या तेजोमय शुभकामना…!

शनिवार, १७ ऑक्टोबर, २०१५

पणती जपून ठेवा...!



वाटेत फार काटे अंधार दाट दाट I
जाणे तुम्हांस पुढती शोधून त्यात वाट II १ II

म्हणुनीच लाविली मी पणतीत ज्ञानज्योत I
ही मार्गदर्शिका जी दावी तुम्हांस वाट II २ II

भडकावू नाही शकला भुरटा खट्याळ वारा I
विझवू बघे परंतु तिजला सुसाट वारा II ३ II

परि ना विझू दिली मी यत्ने कधी तियेला I
जपतो सदैव ज्योती देऊनिया निवारा II ४ II

देवो प्रकाश सर्वां पणती दिली तुम्हांला I
मंदावतेय ज्योती पणतीत स्नेह घाला II ५ II

वारा सुसाट सुटला हा दीप ना विझावा I
अंधार दाट आहे पणती जपून ठेवा II ६ II

टीप: गुरुवर्य डॉ. वि. ना. श्रीखंडे यांनी केलेल्या 'अंधार फार झाला - पणती जपून ठेवा'  ह्या काव्यमय उपदेशाचा काव्यमय कल्पना विस्तार.
                                                                   - डॉ. हेमंत विंझे, मुंबई

मंगळवार, १३ ऑक्टोबर, २०१५

खात्री…!


सजतील नाचतील
जागविण्या नवरात्री
तुझ्या जित्या रूपांना अंबे
हवी इथे सन्मानाची खात्री…!

शुक्रवार, २ ऑक्टोबर, २०१५

लकीरें...!


उडते पंछीयोंके पर नही गिना करते

मिटते सायोंके हाथ नही थामा करते

उडानोंकी लकीरें नही होती आसमांमें

लहरोंके कोई ठिकाने नही हुआ करते…!

गुरुवार, १७ सप्टेंबर, २०१५

"ऎकतोयस ना…?"

ॐ गणानां त्वा गणपतिं हवामहे । कविं कवीनां उपमश्रवस्तमम् । 
ज्येष्ठराजं ब्रह्मणां ब्रह्मणस्पत आनः । शृण्वन्नूतिभिः सीद सादनम् ॥


"बाप्पा, आलास खरा पण मनाची तयारी केली आहेस ना…! 
आता १० दिवस हे मोठे लोक तुझे काय काय करतील माहितेय? 
दागिने वस्त्रे फुलं घालून तुझा श्वास कोंडतील, 
नाका-सोंडेत कशा कशाचा धूर सोडतील, 
तुला नैवेद्य म्हणून काय काय आणतील आणि स्वत:च फस्त करून तुला बनवतील, 
सकाळ संध्याकाळ तुझ्या आरतीच्या नावाने आणि एरवी उत्सवाच्या नावाने ढोल बडवून, सिनेमाच्या गाण्यांच्या गोंगाटाने उच्छाद मांडतील, 
त्यातून तुझे हे सुपाएवढे कान… बघ बाबा कसं सहन करायचं ते…! 
आणि हो बाप्पा, आम्हां मुलांना तुझ्याकडून काहीच नको. 
धम्माल करायला आणि मोदक खायला मिळतात ते बास आहे. 
परीक्षेत पास होण्यासाठी अभ्यास करायला लागतो, 
तो आम्ही करूच आणि छान मार्कांनी पासही होऊ… 
तुझा आशीर्वाद असतोच याची आम्हाला खात्री आहे. 
पण बाप्पा एक सांगू, तू ना या वर्षी जातांना या मोठ्या लोकांना जरा सुबुद्धी देवून जा.
नाही, तुम्हाला आवडतात आणि परवडतात म्हणून हव्या त्या वस्तू वापरा म्हणावं…
आणि कमवता तर खर्चही करा म्हणावं… चंगळ म्हणून का असेना…
पण याबरोबरच थोडासा विवेकही वापरा म्हणावं… 
लहान तोंडी मोठा घास… पण ही वेळ आणलीच मुळी या मोठ्या माणसांनी
भूक लागली की खाणे ही प्रकृती… भूक नसतांना खाणे ही विकृती आणि 
आपल्यातली अर्धी भाकरी उपाशी माणसाला देणे ही संस्कृती… 
हीच खरी संस्कृती… हा असा धांगडधिंगा म्हणजे संस्कृती नव्हे…
हे सांग त्यांना जरा समजावून… सांगशील ना…?
आम्ही तर बोलूच शकत नाही… आम्हाला काय कळतय? बच्चे आहोत ना आम्ही…!
पण तुझं तर ऎकतील. बाप्पा आहेस ना तू…?
ऎकतोयस ना…?"

मंगळवार, १५ सप्टेंबर, २०१५

बाप्पा रे …!


जमविल्या मायेचा सोडून मोह
देशांतरा धावती सारे सान थोर,
प्रवास जिकिरीचा, मुक्काम गूढ
मरण्याहून जीवा, जगण्याचा घोर...

'बाप्पा येणार बाप्पा येणार'
ओरडती सारे दांभिक जन,
भक्ती सरली सक्ती उरली
वर्गणी-खंडणीचे करती धन...

बळीराजा उपाशी म्हणून
'बाप्पा' ना खुश, ना राजी,
'मरणारे मरती आपल्या मरणे'
उत्सवे नाचती निर्ल्लज पाजी...

प्रत्येकाला हवी 'स्पेस' आणि
करमणुकीचे साधन स्वतंत्र,
आस्वादण्या आधी काहीही
'शेअर' करण्याचे अजब तंत्र…

माणसांच्या बेटांत हल्ली
नाही मने जोडणारे सेतू,
संभावित 'विवेकी'ही बघती
पत्रिकेतले मंगळ, राहू-केतू...

विकासाच्या विनाशकारी गप्पात
माणूसपण काय शिल्लक राहील,
मढविलेल्या सालंकृत बाप्पात
नवी पिढी कुठले 'मूल्य' पाहील…?